

पणजी: तब्बल वर्षभराच्या खंडानंतर आज (शनिवारी) होणाऱ्या भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीकडे समस्त राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच होत असलेल्या या बैठकीत पक्षाच्या निवडणूक रणनीतीची प्राथमिक दिशा स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा, सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन तसेच आगामी काळातील संघटनात्मक आणि राजकीय उद्दिष्टे यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. शिवाय केंद्रातील मोदी सरकारच्या कामगिरीचा गौरव करणारा स्वतंत्र ठरावही बैठकीत मांडला जाणार आहे.
राज्यसभा सदस्य सदानंद शेट तानावडे हा ठराव सादर करणार आहेत. केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत राबविलेल्या विविध कल्याणकारी योजना, पायाभूत सुविधांच्या विकासाला दिलेली चालना, आर्थिक सुधारणा तसेच सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोंदविलेला राजकीय विक्रम यांचा या ठरावात उल्लेख असण्याची शक्यता आहे.
राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असताना आणि विविध पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असताना भाजपची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
त्यामुळे या बैठकीतून पक्ष कोणता राजकीय संदेश देतो, आगामी निवडणुकांसाठी कोणती भूमिका स्वीकारतो आणि राज्याच्या राजकारणात कोणते नवे संकेत देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राजकीय ठराव ठरणार ‘लक्षवेधी’
बैठकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरणार आहे तो राजकीय ठराव. हा महत्त्वाचा ठराव राज्य मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे मांडणार आहेत.
राज्यातील राजकीय घडामोडी, सत्ताधारी भाजपची कामगिरी, विरोधकांची भूमिका आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भविष्यातील वाटचाल यांचे प्रतिबिंब या ठरावात दिसून येणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या ठरावातील संदेशांकडे पक्ष कार्यकर्त्यांसह राजकीय निरीक्षकांचेही विशेष लक्ष लागले आहे.
...अशी असेल बैठकीची रूपरेषा
राज्य कार्यकारिणी बैठकीस केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन उपस्थित राहणार आहेत.
सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच या कालावधीत संघटनात्मक विषयांबरोबरच राज्यातील राजकीय समीकरणांचा आढावा.
राज्य कार्यकारिणीवर एकूण २०९ सदस्य असून त्यांच्यासमोर पक्षाची पुढील रणनीती मांडली जाईल.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचे निकष, सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा कार्यक्रम आणि विरोधकांबाबत भूमिका याचे संकेत मिळतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.