Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: राज्यात मॉन्सूनचे 13 जूनला आगमन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon Update: बहुप्रतिक्षित मॉन्सून अखेर आज, गुरुवारी केरळात दाखल झाला. चार दिवस उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनने पहिल्याच दिवशी केरळातील बहुतांश जिल्हे व्यापले असून कर्नाटकचा शेजारही गाठला आहे.

मॉन्सूनची ही स्थिती पाहता राज्यात १२ किंवा १३ जूनला मॉन्सून दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने व्यक्त केली आहे.

हवामान खात्याने जाहीर केलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मॉन्सूनने दक्षिण अरबी समुद्राच्या उर्वरित भाग, मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप परिसर, केरळचा बहुतांश भाग, दक्षिण तामिळनाडूचा बहुतांश भाग, कोमोरिन क्षेत्राचा उर्वरित भाग, मन्नारच्या आखातीचा भाग व्यापला आहे.

मॉन्सूनची वाटचाल गतिमान होण्यासाठीची अनुकूल स्थिती असल्याने पूर्व भागात नैऋत्य, मध्य आणि ईशान्य बंगालचा उपसागर, मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, तमिळनाडू, कर्नाटकच्या काही भागात मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सर्व मापदंड अनुकूल राहिल्यास मॉन्सूनचा वेग वाढेल आणि वरून मॉन्सून येत्या चार-पाच दिवसांत गोव्यात दाखल होईल, अशी शक्यता आहे.

अल निनोचा प्रभाव कायम

विषुववृत्ताच्या खाली दक्षिण पॅसिफिक महासागरात निर्माण होणाऱ्या अल निनो आणि ला निना चा प्रभाव मॉन्सूनवर होत असल्याचे यापूर्वी शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. अल निनो सक्रिय असल्यास त्याचा विपरित परिणाम मॉन्सूनवर होतो.

मात्र, नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होणारा कमी दाबाचा पट्टा तीव्र असल्यास अल निनोचा प्रभाव निष्प्रभ होतो, असेही यापूर्वी अनेकदा अनुभवले आहे.

यंदाही अल निनो सक्रिय असल्याने मॉन्सूनला विलंब झाला आहे. याशिवाय मॉन्सूनपूर्व पाऊसही कमी झाला आहे. यामुळे यंदाचा मॉन्सून विस्कळीत असेल, असे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. रमेश कुमार यांनी सांगितले.

पर्यटकांना मज्जाव

आज, गुरुवारी कोलवा, उत्तोर्डा, बाणावली, माजोर्डा तसेच अन्‍य किनाऱ्यांवर समुद्राचे पाणी खूप दूरपर्यंत पसरले. त्‍यामुळे कित्‍येक ठिकाणी वाळूचे पट्टे ढासळले.

सध्‍या पर्यटन हंगाम नसल्याने दक्षिण गोव्‍यातील बहुतेक किनारे निर्मनुष्‍य झाले असले तरी कोलवा आणि बाणावली या दोन किनाऱ्यांवर काही देशी पर्यटक होते.

या पर्यटकांना पाण्‍यात जाऊ नका, असे जीवरक्षकांकडून वारंवार सांगण्‍यात येत होते, तरीही काही पर्यटक पाण्‍यात उतरताना दिसत होते.

शॅक्स गुंडाळले

पावसाची चाहूल लागल्याने दक्षिण गोव्यातील किनारपट्टीवर आता आवराआवर सुरू झाली असून काही ठिकाणी किनाऱ्यावर अजूनही असलेले शॅक्स काढण्याचे काम सुरू होते.यावेळी पर्यटन मोसम मंदीत गेल्याने काही शॅक्स यापूर्वीच काढले होते.

मात्र, काही शॅक्सचे साहित्य अजूनही तेथेच होते. ते आता काढण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत किनाऱ्यावरील होड्याही हलवणार असल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांनी दिली. मात्र, वादळ दूर गेल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

...अखेर ‘बिपरजॉय’ उत्तर-वायव्येकडे सरकले

पूर्वमध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ गेल्या ६ तासांमध्ये ५ कि.मी. प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. हे वादळ गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे ८५० कि.मी., मुंबईच्या नैऋत्येस ९०० कि.मी., पोरबंदरच्या ९३० कि.मी. दक्षिण-नैऋत्येस आणि कराचीच्या दक्षिणेस १२२० कि.मी. लांब समुद्रात आहे. पुढील २४ तासांत ते हळूहळू आणखी तीव्र होईल आणि पुढील तीन दिवसांत उत्तर-वायव्य दिशेने सरकेल. या चक्रीवादळाचा परिणाम होणार नसला तरी समुद्र खवळलेला राहील.

चक्रीवादळामुळे समुद्र खवळला

बिपरजॉय वादळाचा गोव्‍याला जरी प्रत्‍यक्ष फटका बसला नसला तरी गुरुवारी संध्‍याकाळी लाटांची उंची मोठ्या प्रमाणात वाढल्‍याने पाणी किनाऱ्यावर दूरपर्यंत पसरले. मात्र, किनाऱ्यावरील शॅक्‍स यापूर्वीच काढल्‍याने त्‍याचा फटका व्‍यावसायिकांना बसला नाही.

समुद्र खवळल्यामुळे पर्यटकांना समुद्रात जाण्यास मज्जाव केला आहे. मात्र, पर्यटक ना उमेद होऊ नयेत म्‍हणून त्‍यांना गुडघ्यापर्यंत पाण्‍यात जाऊ दिले जाते. मात्र, अधिक खोलवर गेल्‍यास त्‍यांच्‍या जीवाला धोका आहे, असे आमचे जीवरक्षक त्‍यांना पटवून सांगतात.

- ऑस्‍टीन कुलासो, सरव्‍यवस्‍थापक, दृष्‍टी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT