National Games In Goa: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप सोहळ्याला बहुतांश खुर्च्या रिकाम्या राहिल्याने क्रीडामंत्री गोविंद गावडे अडचणीत सापडले आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनकड या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून येणार हे निश्चित झाले असताना पाच हजार लोक या सोहळ्याला येण्याचे नियोजन भाजप संघटनेकडे का सोपवले नाही, भाजपच्या पणजी येथील मुख्य कार्यालयात केवळ 15 निमंत्रण पत्रिका पाठवल्या, हे कोणाच्या सांगण्यावरून केले, अशी विचारणा आता भाजपकडून सरकारला केली जाऊ लागली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मंत्रिमंडळ फेरबदल होऊ घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर या घडामोडी गावडे यांच्यासाठी कटकटी निर्माण करणाऱ्या ठरू शकतात. ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये भाजपने यापूर्वीही अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यावेळी हे स्टेडियम खचाखच भरून परिसरातही मोठी गर्दी जमवली होती. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा समारोपावेळी निदान सभागृहातील खुर्च्या भरण्याएवढे लोक आणण्यात
क्रीडा खाते अपयशी ठरले होते. उपराष्ट्रपतींना रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करण्याची वेळ आली. त्यावेळी खासदार म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे मंचावर उपस्थित होते. त्यांनी हा सारा प्रकार नजरेने टिपला. हाडाचे कार्यकर्ते असलेल्या आणि संघाच्या मुशीतून जडणघडण झालेल्या तानावडे यांना या प्रकार खुपला. त्यांनी त्याची नोंद घेतली. योग्य त्या व्यक्तीच्या कानी हा प्रकार घालण्यात आला. शुक्रवारी दिवसभर कालच्या समारंभाकडे लोकांनी पाठ फिरवल्याचीच चर्चा भाजपच्या वर्तुळात होती.
भाजपच्या कार्यक्रमांसाठी येणारा असा एक वर्ग राज्यात आहे. आमदार, मंत्र्यांकडे अशी गर्दी जमवण्याची जबाबदारी सोपवण्यात येते. या खेपेला पक्ष संघटनेला बाजूला ठेवले होते. मंत्री, आमदारांपर्यंत केवळ एकेकच निमंत्रण पत्रिका पोचली होती. प्रमुख आणि महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनाही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा समारोप कार्यक्रमाविषयी माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनीही लोक या कार्यक्रमासाठी येतील, अशी तसदी घेतली नाही. सरकारने गर्दी जमवण्याची जबाबदारी आपल्याकडे कशी घेतली, अशी थेट विचारणा पक्ष संघटनेकडून आज झाली.
सलग कार्यक्रमांमुळे मुख्यमंत्री व्यस्त
त्यातच गुरुवारी स्पर्धेच्या समारोप सत्राआधी राजभवनच्या नव्या दरबार सभागृहात राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होते. दुपारपासून मुख्यमंत्री त्या कार्यक्रमात अडकले. त्यामुळे स्टेडियम भरले नाही, ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचलीच नाही. ते उपराष्ट्रपतींसोबत थेट मंचावर आले, तेव्हाच रिकाम्या खुर्च्या त्यांच्या नजरेस पडल्या.
मुख्यमंत्री गाफिल
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्यावर होते. तेथून त्यांना तेलंगणच्या प्रचार दौऱ्यावर जावे लागले. त्यामुळे साहजिकच समारोप समारंभाच्या तयारीवर त्यांना प्रत्यक्षात नजर ठेवता आली नाही. एरवी सरकार आणि पक्ष संघटना मिळून काम करतात, तसेच याही वेळेला नियोजन असेल, असे मुख्यमंत्र्यांना वाटले असावे. साहजिकच त्यांनी समारोप सत्राचा तपशीलवार आढावा घेतला नाही.
मुख्यमंत्र्यांचे मौन कशासाठी?
एवढे सारे होऊनही मुख्यमंत्री सावंत हे गावडे यांना जाब का विचारत नाहीत, असा प्रश्न पक्ष संघटनेतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना पडला होता. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले नसते तर स्पर्धेचे आयोजनही फ्लॉप शो ठरला असता असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
अनुराग ठाकूरही नाराज
क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात राष्ट्रीय क्रीडा प्राधिकऱणाला बाजूला ठेवले होते. त्यामुळे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्यावर केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर सुरवातीपासूनच नाराज आहेत. उद्घाटन सोहळ्याला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याने ठाकूर गोव्यात आले होते.
पक्षाची अलिप्तता
१ राष्ट्रीय पातळीवरील कोणताही कार्यक्रम असला की, भाजपशासित राज्यांचे मंत्री, मुख्यमंत्री यांना निमंत्रित केले जाते. आम्ही तुमच्यासोबत आहोत, हा संदेश देण्यासाठी तेही कार्यक्रमांना उपस्थित राहतात. त्याला हा सोहळा अपवाद ठरला.
२ यापूर्वी ३६ व्या स्पर्धेवेळी गुजरातमध्ये विविध राज्यांच्या मंत्री, मुख्यमंत्र्यांची मांदियाळी होती. पुढील स्पर्धेचे यजमानपद स्वीकारण्यासाठीची अपरिहार्यता म्हणून उत्तराखंडच्या क्रीडामंत्री रेखा आर्य आल्या होत्या.
३ महाराष्ट्राचे क्रीडामंत्री संजय बनसोडे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) आहेत. त्यामुळे गावडे यांच्यापासून भाजप दूर राहिल्याचे चित्र राष्ट्रीय पातळीवरही निर्माण झाले आहे.
४ एरवी कार्यक्रमाची निमंत्रणे मंत्री, आमदार तसेच पक्ष संघटनेतील महत्त्वाचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवली जातात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.