Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; दिगंबरांचा व्हिडिओ

Khari Kujbuj Political Satire: राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनी मडगावमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट दिली. त्याचबरोबर त्यांनी नवनिर्वाचित मंत्री दिगंबर कामत यांची प्रशंसा सुद्धा केली.

Sameer Panditrao

दिगंबरांचा व्हिडिओ

मंत्री दिगंबर कामत यांच्या मंत्रिपदाच्या कामकाजाची सुरुवात जोरदार झाली आहे. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा ताबा घेतल्यावर लगेचच आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला. या व्हिडिओत त्यांनी मंत्रालयात प्रवेश केल्यापासून ते काम सुरू करेपर्यंतचा प्रवास दाखवला आहे. हा व्हिडिओ इतका उत्तम आणि व्यावसायिक आहे, की खुद्द मुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ देखील त्याच्यापुढे फिके वाटत आहेत. यामुळे, दिगंबर कामत यांच्याकडे नक्कीच एक उत्कृष्ट व्हिडियोग्राफर आहे, अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. आता हा व्हिडिओ त्यांनी मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे आव्हान देण्यासाठी अपलोड केलाय, की केवळ स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी, हे मात्र तेच जाणोत! ∙∙∙

कामतांचे मंत्रिपद ही गणरायाची कृपा!

राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी मडगावमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट दिली. त्याचबरोबर त्यांनी नवनिर्वाचित मंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांची प्रशंसा सुद्धा केली. १९९४ पासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत व मडगावकरांचे आशीर्वाद त्यांना लाभत आहेत, असे तानावडे यांनी सांगितले. त्यांना मिळालेले मंत्रिपद ही गणरायाची कृपा हे सांगण्यास ते विसरले नाहीत. एरव्ही स्वतः कामत हे देवभक्त आहेतच. त्यांची अजूनपर्यंतची राजकीय वाटचाल ही देवाचीच कृपा आहे, असे लोक म्हणतात. ∙∙∙

‘साबांखा’कडे मुख्य काम रस्त्याचेच!

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याची विभागणी केली आणि त्यातून गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाची निर्मिती केली. त्यामुळे निर्माण झालेल्या या महामंडळाच्यामार्फत सरकारी इमारती आणि इतर विकासकामे निर्मितीला सुरुवात झाली. त्यातून ‘साबांखा’कडे जाणारा विकासनिधी महामंडळाकडे वळला. आता सार्वजनिक बांधकाम खात्यात असणारा पाणी पुरवठा विभागही वेगळा करण्यात आला आहे. त्यामुळे साबांखाकडे जी काही मोजकीच कामे बाकी आहेत, त्यात रस्त्याची कामे करणे हाच महत्त्वाचा भाग राहिला आहे. अन्यथा इमारतींची दुरुस्ती कामे ‘साबांखा’कडेच आहेत. नवे मंत्री दिगंबर कामत यांनी या खात्याची सूत्रे स्वीकारली असल्याने राज्यातील रस्ते पुन्हा हेमामालीनीच्या गालासारखे गुळगुळीत होतील, असे भाजपचे जुनेजानते कार्यकर्ते म्हणू लागलेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली अपेक्षा कामत पूर्ण करतील, असंच आपण म्हणू शकतो नाही का? ∙∙∙

टीकेचे धनी होऊ नका!

राज्यातील जनतेला २४ तास पाणी देण्याची घोषणा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सध्याचे वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली होती. ती घोषणा ही केवळ घोषणाच राहिली, काही ठिकाणी नळ पोहोचले पण पाणी नाही, अशी स्थिती राज्यात झाली. तरीही ‘हर घर जल'' असे म्हणत राज्य सरकार केंद्रातील नेत्यांकडून पाठ थोपवण्यात धन्यता मानत आहे. जर खरोखरच ‘हर घर जल'' ही योजना यशस्वी झाली असेल तर राज्य सरकारला ‘पाणी पुरवठा’ म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्यातून वेगळे खाते निर्माण करावे लागले नसते, हे वास्तव नाकारता येणार नाही. या नव्याने निर्माण झालेल्या खात्याची जबाबदारी सरकारातील रोख ठोक बोलणारे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याकडे देण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यातील ‘पाणीबाणी’ सुरू झाली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी चार तास पाणी देण्याचे जाहीर केले होते, त्यामुळे किमान चार तास तरी पाणी मिळेल, अशी भावना अनेकांची झाली आहे. आता फळदेसाई यांनी बारा तास पाणी देण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे त्यांना ती सत्यात उतरवावी लागेल अन्यथा तुम्हीही टीकेचे धनी बनाल. तसं होऊ नये म्हणजे मिळवली! ∙∙∙

विजयच्या शर्टाचे गुपित

प्रत्येक राजकारण्याचा आपला म्हणून पेहराव असतो. त्या प्रमाणे फातोर्डेचे आमदार विजयबाब सरदेसाई यांचा सुद्धा खास पेहराव आहे. ते युनिक शर्ट घालतात. या बद्दल त्यांना एका कार्यक्रमात विचारले असता, त्यांनी सांगितले की पूर्वी त्यांना पुष्कळ शर्ट विकत घ्यायची सवय जडली होती. नंतर खरेदीवर बंधन आणण्यासाठी त्यांनी चायनीज कॉलरचा शर्ट परिधान करण्यास सुरवात केली. नंतर त्यांनी स्वतः शर्टचा डिझाईन केला असे ते सांगतात. मिलिटरी टाईपचे फ्लॅप ठेवून शिवलेला हा शर्ट जो युनिक आहे व असे शर्ट बाजारात कुठेही मिळत नाहीत. सध्या विजयबाब मूळ माजोर्डा येथील पण मुंबईत स्थायिक झालेले डिझाईनर ट्रॉय कॉस्ता यांच्याकडून शर्ट शिलाई करून घेतो. ट्रॉय कॉस्ता हे सिने सृष्टितील अभिनेत्यांच्या कपड्यांची शिलाई करतात. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास कपड्यांची शिलाई सुद्धा त्यांच्या कडून केली जाते. विजयबाब व मोदी हे जरी वेगळ्या पक्षात असले तरी दोघांचा दर्जी असेच म्हणावे लागेल. ∙∙∙

चर्चा मंत्री खंवटेच्या भेटीची

मंत्री विश्वजित राणे यांच्याप्रमाणेच आता मंत्री रोहन खंवटे यांनीही दिल्ली आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. अलीकडेच, मंत्री खंवटे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणपती दर्शनासाठी भेट दिली. या भेटीचा फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर अपलोड करताच, वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. राणेंच्या पावलावर पाऊल ठेवत खंवटेही राजकीय वजन वाढवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, अशी चर्चा सुरू झालीय. या भेटीमागे राजकीय कारण आहे की, केवळ सदिच्छा भेट, हे तर खंवटेच सांगू शकतात. पण त्यांनी काही सांगितले नाही, तर सोशल मीडियावरचे जाणकार नेटकरी त्यांच्या परीने तर्क-वितर्क लढवून यावरचा निष्कर्ष काढतीलच. ∙∙∙

पणजी पोलिस स्थानकात बाबूश!

गणपतीच्या निमित्ताने महसूल मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पणजी पोलिस स्थानकातील गणपतीचे दर्शन घेतले. मंत्री असल्याने पोलिस निरीक्षकांना त्यांचे स्वागत करावे लागेल आणि प्रसादही दिला. दर्शनानंतर बाबूश यांनी दानपेटीत दानही केले आणि थेट पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकरांच्या कक्षात जाऊन बसले, त्यांच्याबरोबर त्यांच्या खात्याचे काही अधिकारी उपस्थित होते. मात्र, पणजी पोलिस स्थानकात बाबूश गेल्याची वार्ता, समाजमाध्यमांत तत्काळ फिरली. त्यामुळे बाबूश नक्की कशाला गेले, याची विचारणाही होऊ लागली. अखेर गणपती दर्शनासाठी बाबूश गेल्याचे कळाल्यानंतर त्यांच्याविषयी औत्सुक्याने विचारणा करणाऱ्यांचा संशय दूर झाला असावा. तसे पाहिले तर कारणही तसेच आहे, कारण पणजी पोलिस स्थानकावरील हल्ल्याचा आणि बाबूश मोन्सेरात यांच्यातील खटला सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्याचा निकाल काय लागायचा तो लागेल. परंतु मोन्सेरात यांनी पणजी पोलिस स्थानकाला दिलेल्या भेटीवरून बाबूश प्रेमींचा ठोका काहीसा चुकला होता,एवढं नक्की. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT