Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; मिकी चक्‍क प्रमाेद सावंत यांच्यासोबत?

Khari Kujbuj Political Satire: सरकारने ॲप अग्रिगेटर धोरण अधिसूचना जारी करून त्यावर हरकती मागविल्यानंतर टॅक्सी चालक अधिकच आक्रमक झाले आहे.

Sameer Panditrao

मिकी चक्‍क प्रमाेद सावंत यांच्यासोबत?

मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांच्‍यावर जर कुणी विजय सरदेसाई यांच्‍या पाठोपाठ तोंडसुख घेतले असेल तर ते नुवेचे माजी आमदार मिकी पाशेको यांनी. संताजी-धनाजी जसे मुघलांना पाण्‍यात दिसायचे, तसे प्रमोद सावंत मिकीला पाण्‍यात दिसत असावेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी हे मिकी महाशय आपले आदरातिथ्‍य क्षेत्रात कार्यरत असलेले व्‍यावसायिक मित्र मॅथ्‍यू दिनीज यांच्‍याबरोबर चक्‍क मुख्‍यमंत्र्यांबरोबर दिसले आणि या भेटीचा फोटोही मिकीने व्‍हायरल केला आहे. असे काय झाले म्‍हणून मिकी यांनी प्रमोद सावंत यांच्‍याबरोबरचे आपले वैर संपुष्‍टात आणले? की मॅथ्‍यू दिनीज यांचे कोलव्‍यातील ‘केन्‍टूकी’ हे रेस्‍टॉरन्‍ट पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी अडचणीत आणले म्‍हणून त्‍यांची कैफियत घेऊन मिकी सावंत यांच्‍या दरबारी हजर झाले? ∙∙∙

आमदार लोबो ‘बॅकफूट’वर

सरकारने ॲप अग्रिगेटर धोरण अधिसूचना जारी करून त्यावर हरकती मागविल्यानंतर टॅक्सी चालक अधिकच आक्रमक झाले आहे. त्यांनी राज्यातील सर्व मतदारसंघातील आमदार वा मंत्री यांना त्या त्या भागातील टॅक्सी चालकांनी भेटून हे धोरणच रद्द करण्यासाठी पाठिंब्याची विनंती केली आहे. किनारपट्टी परिसरात हा टॅक्सी व्यवसाय जोरात असल्याने नेहमीच कळंगुटचे आमदार मायकल लोबो हे त्यांच्याबरोबर नेहमीच राहिले आहेत. त्यांच्या मतदारसंघातील काही टॅक्सी चालक काल लोबो यांना भेटले. यावेळी टॅक्सी चालकांनी मांडलेल्या भूमिकेवरून आमदार लोबो यांचाही आवाज वरच्या पट्टीत गेला. हा संवाद की वाद असे चित्र उभे राहिले. यावेळी मांद्रेच्या आमदार दिलायला लोबो याही उपस्थित होत्या. आमदार व टॅक्सी चालक यांच्यात ॲप अग्रिगेटरवरून बरीच तापातापी झाली. त्यामुळे यावर तोडगा काढण्याऐवजी टॅक्सी चालक आमदारांचे ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते. त्यामुळे आमदार लोबो यांनाही हा विषय न वाढवता त्यावर नमते घेत विचार करण्याचे सांगावे लागले. ∙∙∙

‘गोविंदा’ला उशीर का लागतोय?

गोविंद गावडे यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय दिल्लीत पक्षश्रेष्ठींनी घेतलाय, परंतु त्याची कार्यवाही होत का नाही, विलंब का लागतोय, याबद्दल गोव्यातील भाजपच्या नेत्यांमध्येही सस्पेन्स आहे. पण कोणी काही बोलत नाही. आधीच मतप्रदर्शन केल्यामुळे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अडचणीत आलेत. त्यामुळे पक्षाचे इतर पदाधिकारीही मौनात गेले आहेत. दिल्लीत असे काय घडलेय, ज्यामुळे हा निर्णय कृतीत येत नाही, याची माहितीही अचंबित करणारी आहे. हा निर्णय सध्या पंतप्रधानांच्या मान्यतेसाठी खोळंबून आहे. पक्ष पातळीवर निर्णय झाला. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा- जे असले सर्व महत्त्वाचे निर्णय स्वतः घेतात- त्यांनीही मंजुरी दिली. तेथून तो मुद्दा पंतप्रधानांकडे गेलाय. स्वाभाविकच प्रश्न पडतो तो, असले क्षुल्लक राज्यांचे राजकीय निर्णयही पंतप्रधानांकडे पाठवले जातात काय? सूत्रांच्या मते सध्या असे निर्णयही पंतप्रधानांकडे पाठवले जातात व त्यांचा ‘निर्णय’ होताच पक्षाध्यक्ष तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळवितात. निर्णयाला उशीर लागण्याचे कारण पंतप्रधानांची व्यस्तता हे आहे... भाजप कशी काम करते, त्याचे हे बोलके उदाहरण आहे. ∙∙∙

विश्‍वजीत यांचा मोठेपणा

आज मडगावात सोनसडा कचरा प्रकल्पात जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात वनमंत्री विश्‍वजीत राणे उपस्थित होते. मडगावचे आमदार दिगंबर कामत सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते. प्रोटोकोल प्रमाणे कामत यांनी प्रथम बोलावे व नंतर मंत्र्यांनी बोलावे, असे असल्याने सूत्रसंचालकाने कामत यांना बोलण्यासाठी बोलावले. पण राणे यांनी स्वतः बोलणे पसंत केले व कामत यांनी नंतर बोलावे, अशी सूचना केली. नंतर बोलताना राणे म्हणाले की कामत, हे आपले मार्गदर्शक व आदर्श आहेत. ते वयाने मोठे व अनुभवी आहेत. त्यामुळे त्यांचा मान राखलाच पाहिजे. त्याचसाठी त्यांच्यापूर्वी आपण प्रथम बोललो. काही दिवसांपूर्वी मडगावातील आरोग्य शिबिरातही त्यांनी कामत यांची स्तुती केली होती. मात्र, त्यांनी आपल्या या वागण्याने स्वतःचा मोठेपणा दाखवला, असे उपस्थित बोलताना दिसत होते. ∙∙∙

दामू-बाबू यांच्यात शीतयुद्ध पेटणार?

बाबू आजगावकर यांनी गांधी मार्केट आपली मालमत्ता करून ठेवली आहे. त्या मार्केटमधील व्यापाऱ्यांची संघटना ते चालवीत आहेत. गत पावसामुळे गांधी मार्केटमध्ये पाणी साचले व दुकानदारांना त्रास सोसावा लागला. त्यांनी मडगाव नगरपालिकेवर तोंडसुख घेतले व नगराध्यक्ष दामू शिरोडकर यांच्याकडे होत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा इथपर्यंत प्रकरण पोहोचले. आता नगराध्यक्षांनी आपल्या देखरेखीखाली गांधी मार्केटमधील गटारे उपसून स्वच्छ केली आहेत. त्यातील प्लॅस्टिक, बाटल्या बाहेर काढल्या. बाबू जेव्हा मंत्री होते, त्याच बरोबर त्याचे भाऊ राजेंद्र बाबा नगरसेवक होते. राजेंद्र बाबांची कन्या आता नगरसेविका आहे. त्यांचा गांधी मार्केटवर कब्जा आहे. मग त्यांनी स्वच्छतेची मोहीम का राबवली नाही. तेव्हा ते गप्प का बसले, असे आता नगराध्यक्ष शिरोडकर बाबूवर पलटवार करू लागले आहेत. दामू व बाबू यांच्यामध्ये आता यापुढे शीतयुद्ध पेटणार, हे मात्र खरे. ∙∙∙

होड्या गेल्या कुठे?

मुर्डी - खांडेपार भागातील बेकायदा रेती व्यवसायावर सरकारी अधिकाऱ्यांनी छापा टाकला खरा, पण त्यांना होडी काही सापडल्या नाहीत. फक्त रेतीचा साठा तेवढा सील करण्यात आला. छापा टाकताना होड्या कुठे गायब झाल्या कळायला मार्ग नाही. असो... राज्यात सगळीकडे रेती उत्खनन बिनधास्त होत असून रात्रीच्या वेळेला हा खेळ चालतो, हे सर्वांना माहीत आहे, फक्त पोलिस तेवढे काणाडोळा करतात. आता हा बेकायदा व्यवसाय कसा चालतो, हे शेंबडे पोरही सांगू शकेल, अशी स्थिती आहे. ∙∙∙

बाबा अन् पात्रावची जवळीक

गोव्याच्या राजकारणातील रवी नाईक हे एक दिग्गज नेते असून भंडारी समाजाचे बडे नेते आहेत. त्यांनी राजकारणात दिलेले योगदान कुणीही विसरू शकणार नाही, त्यामुळे त्यांचे राजकारणातील योगदान पुढेही लाभायला हवे, असे मत विश्‍वजीत राणे यांनी व्यक्त केले. फोंड्यातील एका कार्यक्रमात विश्‍वजीत राणे यांनी बोलताना रवी पात्रावांची स्तुती केली, आपल्या वडिलांच्या आजारपणावेळी तत्कालीन मुख्यमंत्री असलेले रवी नाईक यांनी कशाप्रकारे सहकार्य केले ते सांगायलाही विश्‍वजीतबाब विसरले नाहीत. अलीकडच्या काळात रवी पात्राव आणि विश्‍वजीत बाबा यांचे बरेच जमते आहे, असे ऐकिवात आहे, त्यामुळेच...! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT