हणजूण पंचायत क्षेत्रातील रस्ता रुंदीकरणाच्या प्रकरणावरून सध्या कळंगुटचे आमदार मायकल लोबो व त्यांची पत्नी दिलायला लोबो हे पुन्हा चर्चेत आले आहेत. कारण, संबंधितांनी दादागिरीचा वापर व शासकीय परवानगीविना हे काम केले, असा दावा करीत काही स्थानिकांनी लोबो दाम्पत्याविरोधात पोलिस तक्रार केली आहे. अशातच, लोबोंनी सोमवारी आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली. दोघेही दाम्पत्य हे न्यूयॉर्कमध्ये असल्याचे यावरून स्पष्ट होते. एकीकडे, लोबोंवर टीका होत असताना, लोबो हे परदेश दौऱ्यावर गेल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यातच, उपसभापतींनी देखील म्हापशातील विकासकामे आम्ही इतरांप्रमाणे ओव्हरनाईट दादागिरीने करत नाही असे विधान केले आहे. त्यामुळे उपसभापतींचा हा अप्रत्यक्ष टोला लोबोंनाच होता, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. ∙∙∙
देशातील सर्व कामांमध्ये ‘मोदी की गॅरंटी’ सर्वत्र प्रसिध्द आहे. गोव्यातील भाजप नेते मुख्यमंत्रीही स्वतः ‘मोदी की गॅरंटी’वर भरभरून बोलतात, पण अटल आसरा योजनेचा लाभ घेण्यासाठी साखळीतील शिबिरात आलेल्या लोकांना ‘डॉ. प्रमोद सावंत की गॅरंटी’ ऐकायला मिळाली. पावसापूर्वी गरजू लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित शिबिरात मुख्यमंत्र्यांनी लोकांना ‘तुम्ही तुमच्या घराच्या कामाला सुरवात करा, गवंडीला, मजुरांना बोलावून दुरुस्ती करा. तुमच्या बँक खात्यात ३० मेपर्यंत ७५ हजारांचा पहिला व १५ जूनपर्यंत ७५ हजारांचा दुसरा हप्ता येणार ही ‘माझी गॅरंटी’ आहे’ असे म्हणताच लोकांमध्ये एकच हशा पिकला आणि टाळ्याही वाजल्या. ∙∙∙
गोव्याच्या राजकारण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले सध्याच्या घडीचे सक्रिय राजकारणी जर कोण असतील, तर ते माजी मुख्यमंत्री आणि माजी आमदार चर्चिल आलेमाव. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, तरी राजकारणातून त्यांनी अद्याप माघार घेतलेली नाही. अशा या चर्चिल आलेमाव यांचा काही दिवसांपूर्वी ७५वा वाढदिवस झाला. यावेळी त्यांनी आपला वाढदिवस धूमधडाक्याने साजरा केला नसला, तरी घरची मंडळी आणि निवडक मित्रमंडळींबरोबर त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी काही पत्रकारांनी त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल त्यांना प्रश्न केला असता, राजकारणी कधीही निवृत्त होत नाही असे उत्तर त्यांनी दिले. एका अर्थाने आपण वयाचे पाऊणशतक गाठले तरीही अजून राजकारणात ‘नॉटआऊट’ हेच जणू त्यांनी या उत्तरातून सांगितले, असे म्हणावे लागेल. ∙∙∙
राज्यात सध्या भाजप कार्यकर्ता मेळावा विविध ठिकाणी होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्या मतदारसंघात इतर पक्षांचे आमदार आहेत, त्या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आयोजित करणे तसे कठीणच, पण सत्ताधारी आणि विरोधातील मतदारसंघातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी अशा कार्यकर्त्यांत मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पहिल्यांदाच गोव्यातील एका सत्ताधारी राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाकडून नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना जवळ ओढण्याचे प्रयत्न सुरू असल्याने अशाप्रकारचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करणे कठीण असले तरी सोपे ठरत आहे, हे विशेष. ∙∙∙
फोंड्यातील भाजप कार्यकर्ता मेळावा कमालीचा यशस्वी झाला. फोंड्यातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावून दणक्यात मेळावा यशस्वी करून दाखवला. हा मेळावा खरे तर रवी नाईक यांना आव्हानच होते. कारण फोंड्यात काहीजण गटातटाचे राजकारण करीत असल्यामुळे मेळाव्यात किती कार्यकर्ते येणार हा प्रश्न होता; पण रवी पात्रांव याबाबतीत चाणाक्ष. त्यांनी एक हाक दिली आणि शेकडो कार्यकर्ते जमा झाले. फोंडा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री असल्याने रवी पात्रांवना हा मेळावा यशस्वी होणे आवश्यक होते. कारण मेळावा यशस्वी झाला तरच आमदाराची ताकद कळते आणि ती ताकद रवींनी दाखवून दिली. एवढी वर्षे राजकारणात घट्ट पाय रोवून उभ्या असलेल्या रवींना अशा गोष्टी घडवून आणणे त्यामुळेच तर सोपे ठरले आहे. ∙∙∙
शनिवारच्या (ता. १७) दै. ‘गोमन्तक’मधून प्रसिद्ध झालेली ‘फोंडा भाजपमध्ये गटबाजीचे दर्शन’ ही बातमी बरीच गाजली. भाजप गोटात तर खळबळच उडाली. मुख्यमंत्र्यांनासुद्धा या बातमीची दखल घ्यावी लागली. परवा फोंडा येथे आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या गटबाजीवर तीर साधला. संबंधितांना कानपिचक्याही दिल्या, पण म्हणून ही गटबाजी संपणार आहे काय? दोन्हीही गटांच्या म्होरक्यांना भाजपची फोंड्याची उमेदवारी हवी असल्यामुळे ही गटबाजी संपणे केवळ अशक्य असा सूर मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर उपस्थित कार्यकर्त्यांत उमटत होता. त्यामुळे ‘परदे के पिछे’ तरी ही गटबाजी सुरूच राहणार असे चित्र सध्या तरी दिसते आहे. आता या गटबाजीचा निकाल काय लागतो हे मात्र सध्या सांगणे अशक्य आहे एवढे निश्चित. ∙∙∙
कला अकादमीतील त्रुटी दूर करण्याची जबाबदारी ‘त्याच’ ठेकेदारावर सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे जाहीर केले आहे. कला अकादमीची इमारत सुस्थितीत यावी, यासाठी ज्या कलाकारांनी आंदोलने केली, त्यांना यामुळे जरूर दिलासा मिळेल. परंतु, एवढ्याने कवित्व संपले, असे म्हणता येणार नाही. कामात त्रुटी आहेत त्या मान्य आहेत, तर त्या कामावर देखरेख ठेवणारे बांधकाम खात्याचे अधिकारीही दोषीच ठरतात. त्यांच्यावर कारवाई होणार की त्यांना वाचवणार, याचाही खुलासा व्हायला हवा, नाही का! ∙∙∙
गोव्यात विधानसभा निवडणुकीस दीड ते दोन वर्षे आहेत, तरीही भाजपाने मतदारसंघवार जे कार्यकर्ता मेळावे आयोजित करण्याचे सत्र सुरू केले आहे, त्यामुळे विरोधकांच्याच नव्हे, तर भाजपाच्या एका गोटात संभ्रमाचे वातावरण आहे. कारण नाही म्हटले तरी आत्तापर्यंत भाजपाने ३३ मतदारसंघात मेळावे घेतले आहेत व केवळ सात मतदारसंघात ते उरले आहेत. या मतदारसंघात कुडतरी, सांताक्रुज, बाणावली, कुठ्ठाळी यासारख्या मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे या मेळाव्यावेळी कुडतरीतील आलेक्स रेजिनाल्ड वा सांताक्रुजमधील फर्नांडिस हे आमदार काय करतात त्याकडे अनेकांचे लक्ष आहे. फर्नांडिस यांचा प्रश्न नाही. कारण सध्यातरी ते भाजपात आहेत, पण रेजिनाल्ड हे अपक्ष असल्याने त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सध्या भाजपात मूळचे व नवागत असे दोन गट विशेषतः नंतर भाजपावासी झालेल्या मूळच्या काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघात आहेत. कितीही सांगितले तरी ते एकसंध होत नाहीत. त्यामुळे या सात ठिकाणी काय होते ते महत्त्वाचे असेल असे राजकीय चिकित्सक म्हणतात. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.