Goa Politics: खरी कुजबुज; ‘या’ सरकारी जावयांना कोण हात लावणार?

Khari Kujbuj Political Satire: दिगंबर कामत देवभक्त आहेत, हे सर्वांना माहीत आहे. पण काही वर्षांपूर्वी आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे देवभक्त बनतील, हे कोणालाही वाटले नसेल.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

‘या’ सरकारी जावयांना कोण हात लावणार?

पाेलीस सेवेतील कर्मचाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली करावी, अशी प्रथा आहे. या मागचे कारण म्‍हणजे हे अधिकारी किंवा कर्मचारी एकाच ठिकाणी जास्‍त काळ काम करत असल्‍यास त्‍यांचे वायफळ तसेच विनाकारण काही प्रवृत्तींशी हितसंबंध, लागेबांधे तयार होऊ शकतात. आणि त्‍यामुळे संबंधित अधिकारी आपल्‍या अधिकारांचा तसेच पदाचा गैरफायदा घेऊ शकतात. त्‍यामुळे पोलिस अधिकाऱ्यांच्‍या बदल्‍या करण्‍यात आल्‍याचे आदेश वारंवार निघत असतात. पण असे जरी असले तरी काही पोलिस आपले राजकीय वजन वापरून आहे, त्‍या ठिकाणावरून किंवा पोलिस स्थानकातून दुसरीकडे जाणे टाळतात. यावर तोडगा काढण्‍यासाठी पोलिस महासंचालकांनी मोठ्या प्रमाणावर बदल्‍यांचा आदेश जारी करण्‍याची सूचना केली होती. त्‍यानुसार बदल्‍यांचे आदेशही जारी झाले. मात्र, अजूनही काही ठिकाणी दहा ते पंधरा वर्षे एकाच ठिकाणी चिकटून राहिलेले पोलिस पहायला मिळतात. हे सरकारी जावई आहेत का? ज्‍यांना कुणी हात लावू शकत नाही? ∙∙∙

विश्‍वजीत राणेही झाले ‘देवाचो मनीस’

दिगंबर कामत देवभक्त आहेत, हे सर्वांना माहीत आहे. पण काही वर्षांपूर्वी आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे देवभक्त बनतील, हे कोणालाही वाटले नसेल. आपण देवाची भक्ती करतो, ते पाहुन विश्‍वजीत कधी कधी आपल्यावर नाराज व्हायचे, असे कामत यांनी सांगितले. पण आता आपल्यापेक्षा विश्‍वजित जास्त देवस्की करीत आहेत, असे कामत यांनी सांगितले. तो आपल्यापेक्षा जास्त ‘देवाचो मनीस’ झाला, असेही कामत म्हणाले. ∙∙∙

किती गाड्यांवर येणार गदा?

रस्‍त्‍यालगत पदपथ हे लोकांच्‍या सुरक्षेसाठी बांधलेले असतात. वाहतुकीचा त्रास पादचाऱ्यांना होऊ नये यासाठी त्‍यांना कुठल्‍याही अडथळ्यांशिवाय चालता यावेत यासाठी ते बांधलेले असतात. असे हे पदपथ मोकळे ठेवावेत यासाठी मुंबई उच्‍च न्‍यायालयाने आदेश जारी करूनही काहीजणांनी राजकीय आशीर्वादाने या पदपथांवरच सामान विकण्‍याचे गाडे उभे केले. मडगावातही पदपथावर उभे झालेले गाडे सगळीकडे दिसतात. या गाड्यांच्‍या विराेधात वीज अभियंते काशिनाथ शेटये यांनी आवाज उठविल्‍यामुळे त्‍यांच्‍याकडे मडगाव कार्यालयाचा असलेला चार्ज काढून घेण्‍यात आला. पण म्‍हणतात ना, कोंबडे कितीही झाकले तरी सूर्य उगवायचा थांबत नाही. शेटये यांना बाजूला केले म्‍हणून गाड्यांवर होणारी कारवाई थांबेल का? आणि अशी कारवाई झाल्‍यास किती गाडे काढून टाकावे लागतील? असे म्‍हणतात, रस्‍ता रुंदीकरण जागेत आणि पदपथावर उभारलेल्‍या मडगावातील गाड्यांची संख्‍या हजारभर तरी असेल. या सर्वांवर सध्‍या टांगती तलवार आहे, असे म्‍हणायचे का? ∙∙∙

दिगंबर यांचे डोळे पाणावले!

दिगंबर कामत हे मुरलेले राजकारणी आहेत. आपल्या ३५ ते ४० वर्षांच्या राजकीय प्रवासात कोणीही त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिलेले नसावेत. पण आज आरोग्य मंत्री विश्र्वजीत राणे यानी केलेल्या भावनिक भाषणामुळे कामत यांना आपले अश्रु आवरता आले नाही. राणे यांनी कामत यांच्यावर स्तुती सुमनांची उधळण केली. ते मुख्यमंत्री असताना आपण आरोग्य मंत्री बनलो. त्यांनी आपल्या मागण्या कधीही नाकारल्या नाहीत. गोव्यात आज जी इस्पितळे, आरोग्य सेवा चालू आहेत त्याचे श्रेय केवळ कामत यांना जाते. ते आपल्याला पुत्रासमान लेखतात. ते आपले राजकीय आदर्श आहेत. त्यांच्यामुळे आपण राजकारणात पाय रोवून उभा आहे. जे आपल्यावर उपकार, मदत करतात त्यांचे सदैव स्मरण करणे. त्यांचे उपकार मानणे हे कर्तव्य असते. मात्र आपण त्यांना पुष्कळ त्रास दिला व कधी माफी मागितली नाही. मात्र आज मी त्यांची जाहीररित्या माफी मागतो, असे विश्‍वजीत राणे यांनी सांगितले. दिगंबर यांनाही भावना अनावर झाल्या व त्यांच्या डोळ्यात पाणी तरारले. सर्व उपस्थितांनी ही घटना पाहिली व एकच स्तब्धता त्यावेळी पसरली. विश्‍वजीत यांचे वडील प्रतापसिंग राणे यांनीही आपल्याला पुत्रासमान वागणूक दिली, असे सांगून दिगंबर यांनी वेळ मारुन नेली. ∙∙∙

‘एनआयओ’ चे निमित्त

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञांचा शोधनिबंध सध्या राजकीय टीकेचे कारण ठरला आहे. याआधी त्या संस्थेने दिलेले किती अहवाल जनतेने गांभीर्याने घेतले हाही संशोधनाचा विषय आहे. शिंपले जास्त प्रमाणात खाल्ल्यास जे काही होते त्याविषयी या संस्थेचे संशोधनही मध्यंतरी बरेच गाजले होते. संशोधनातील निष्कर्षाला शास्‍त्रीय पद्धतीनेच उत्तर देता येते. तसे न करता यानिमित्ताने सरकारवर शरसंधान करण्याची संधी विरोधक घेत आहेत. म्हादईप्रश्नी आम्ही सरकारसोबत असणाऱ्यांची सध्याची भाषा तशी दिसत नाही, हेही तितकेच खरे! ∙∙∙

विश्‍वजीतकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

काजू महोत्सवात मंत्री विश्‍वजीत राणे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे केलेलं कौतुक पाहून मंत्रिमंडळात सर्व काही बरे चालले आहे, असे तिथे उपस्थित लोक चर्चा करू लागले. मात्र, काही लोकांना याचे आश्चर्य देखील वाटले. पण कौतुक करण्यामागचे कारण राणेंनी सांगितल्याने काही आश्चर्य वाटण्याचे कारण नव्हते. आजवर मुख्यमंत्र्यांनी अशा महोत्सवांना सहकार्य केले आहे आणि त्यामुळे लोकांचे भले झाले, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. पण आता लोकांच्या मनात जे चालते, ते कोण रोखेल बरे...! ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: "भाजपने गोव्याची 'फास्ट ट्रॅक' विक्री सुरू केलीय", युरी आलेमाव यांचा सरकारवर घणाघात

कायदा मोठा की लोकप्रतिनिधी?

हणजूण येथे रस्ता रुंदीकरणावरून सध्या नवीन वादाला तोंड फुटले आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी पुढाकार घेत या ठिकाणी हे रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले. असा आरोप काही स्थानिकांनी केला आहे, परंतु काही स्थानिकांच्या दाव्यानुसार या कामाची वर्क ऑर्डर नव्हती आणि आमदारांनी परस्पर दादागिरी करीत रस्ता रुंदीकरणाचा घाट घातला. याविषयी लेखी कागदपत्र विचारल्यानंतर आमदारांनी ते दाखविले नाही, असे त्यांचे म्हणणे होते. याविषयी जागृत नागरिकांनी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली आहे. मध्यंतरी शिवोलीतील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली, तेव्हा माध्यमांसमोर बोलताना एका लोकप्रतिनिधीने मीच पुढाकार घेऊन ही झाडे कापली असा दावा केला होता, परंतु कोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर आपला या प्रकरणाशी संबंध नाही, असे ते म्हणाले होते. या कटू आठवणीला पुन्हा सध्या शिवोलीतील वरील घटनेमुळे उजाळा दिला जात आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; तवडकरांची घोडेस्वारी!

बदली हा एकच पर्याय आहे का?

जेव्हा जेव्हा काही गोष्टी राजकारण्यांवर उलटतात, तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे हे आता नित्याचेच झालेय. मडगावात बेकायदेशीर गाडे, अतिक्रमणे वाढलेली आहेत. उच्च न्यायालयाने ही अतिक्रमणे हटविण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा मुख्याधिकाऱ्यांना अधिकार दिला आहे. वीज खात्यातील अधिकारी काशिनाथ शेटये यांची मडगावात बदली झाली व ही अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे येथील राजकारण्यांचे धाबे दणाणले. व काही दिवसांतच त्यांची बदली करण्यात आली. या बदलीमुळे बेकायदेशीर गाडे व अतिक्रमणात याच राजकारण्यांचा हात असल्याचे उघड झाल्याची चर्चा सुरू झालीय. काशिनाथ गेले तरी जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांनी मागे हटू नये व कारवाई करावी, अशी मागणी लोकांकडून होताना दिसत आहे. नाहीतर काही दिवसांनी रस्त्याच्या मधोमध गाडे उभारले गेले तर कोणीही नवल वाटून घेऊ नये. हल्लीच लईराई जत्रेच्या वेळी चेंगराचेंगरी झाली त्यावेळी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. अधिकाऱ्यांनी नेमके काय करावे?, कायद्यात बसत नाही तर कायद्यात बसवा व काम करा, असे सांगणारे मंत्री व आमदार आहेतच की. मग त्यांना कसे आवरावे, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com