Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांनी पिळले कान...

Khari Kujbuj Political Satire: राजधानीतील सर्व सरकारी कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी पाटोवर भव्य टॉवर बांधण्याची घोषणा सरकारने यापूर्वीच केली आहे.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

मुख्यमंत्र्यांनी पिळले कान...

फोंड्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनीच कार्यकर्त्यांचे कान पिळले. मेळावा यशस्वी झाला. कार्यकर्त्यांची तोबा गर्दी झाली होती, पण फोंडा भाजपात सध्या गटातटाचे राजकारण सुरू असल्याने आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाने खांद्याला खांदा लावून काम करावे, असे प्रत्येकाचे नाव घेऊन सांगितले. फोंड्यात भाजपमध्ये आलबेल नाही, याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली असल्याने मुख्यमंत्र्यांनीच या काही लोकांचे कान टोचले. शेवटी सोनारानेच कान टोचले पाहिजेत, अशी म्हण आहे ना..! मात्र जो देखे रवी... याचा प्रत्यय या मेळाव्यात आला. ∙∙∙

बाबांचे बाबाकडून कौतुक!

शनिवारी मडगावात झालेल्या महाआरोग्य शिबिरात एक चमत्कारिक गोष्ट घडली व त्यामुळे मडगावकरांचे डोळे विस्फारले. कारण मडगावच्या बाबांचे विलक्षण कौतुक केले ते सत्तरीतील बाबाने. एरवी मडगावातील कोणत्याही कार्यक्रमात मडगावच्या बाबांचे तोंडभर स्तुती होतेच, पण ती मडगावकरांकडून व तेही बाबांच्या समर्थकांकडून. पण काल ही स्तुती केली ती सत्तरीच्या बाबांनी. त्याला कारणही तसे कोणतेच नव्हते व त्यामुळेच अनेकजण बुचकळ्यातही पडले. कारण सत्तरीचे बाबा तसे कारणाविना जास्त स्तुती करत नाहीत की कधी जास्त बोलतही नाहीत. त्यामुळेच त्यांच्या या मुक्त स्तुतीने अनेकजण कोड्यात पडले आहेत. तसेच मागे म्हणजे मडगावचे बाबा मुख्यमंत्री असताना त्यांनी कोणता त्रास दिला तेही उघड झालेले नाही. कारण त्या काळात वाळपईकडे मंत्रिपद होते व त्यावेळी मडगावच्या बाबांना खरा त्रास झाला होता तो दक्षिण गोव्यातील व खासकरून सासष्टीतील नेत्यांकडून. त्यामुळे त्या काळातील एका नव्याच चर्चेला छोट्या खाशांनी तोंड फोडले आहे खरे. ∙∙∙

ही व्यवस्था नेमकी कोणासाठी?

राजधानीतील सर्व सरकारी कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी पाटोवर भव्य टॉवर बांधण्याची घोषणा सरकारने यापूर्वीच केली आहे. त्यामुळे लोकांची चांगली सोय होणार आहे, पण आता सरकारी इमारतीत असलेले एकेक कार्यालय खासगी इमारत प्रकल्पांत स्थलांतरित करण्याचा जो प्रकार सुरू झालेला आहे तो नेमका कोणाचे खिसे भरण्यासाठी असे प्रश्न जनसामान्यांकडून केले जाऊ लागले आहेत. श्रमशक्ती भवन हा तसा पाहिला, तर पाटोवरील सरकारी इमारत प्रकल्प, तोही श्रम खात्याचाच, पण त्यात असलेली त्याच कामगार खात्याची दोन कार्यालये पाटोवरीलच एका खासगी इमारत प्रकल्पात स्थलांतरित करण्याची घोषणा सरकारने केली आहे व त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नवा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू असताना सरकारी कार्यालयांचे हे स्थलांतर नेमकी कोणाची व्यवस्था करण्यासाठी हा त्यांचा मुद्दा खरेच विचार करण्यासारखा आहे खरे ना रे भाऊ. ∙∙∙

दामूंच्या पायाला भिंगरी

गेले चार महिने भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत आहेत. शिरगाव येथील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचा दिवस वगळता त्यांचे सातत्याने राज्यभरातील दौरे सुरू आहेत. चेंगराचेंगरीच्या दिवशीही ते इस्पितळ आणि जखमींच्या घरी धावले होते. त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला रविवारी चार महिने पूर्ण झाले. रविवारी त्यांनी दिवसाची सुरवात खांडेपार येथील बैठकीने केली, त्यानंतर ते फोंडा येथील मेळाव्याला उपस्थित राहिले. कासार समाजाच्या बैठकीला कासारपाल येथे उपस्थित राहून ते सायंकाळी पेडणे येथील मेळाव्याला पोहोचले. सायंकाळी उशिरा मडगावला घरी परतण्यापूर्वी पणजीच्या भाजप कार्यालयात जाऊन त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या कामाचे नियोजनही तपासले. ही सारी धावपळ करत असताना जुन्या कार्यकर्त्यांच्या घरीही भेटी देणे त्यांनी सुरू ठेवले आहे. ∙∙∙

दिलखुलास विश्वजीत...

मंत्री विश्वजीत राणे सार्वजनिक सभा, कार्यक्रमांमध्ये सध्या बिनधास्त वक्तव्ये करत आहेत. त्याची प्रचिती नावेलीतही आली. त्यांनी शेलक्या शब्दांत विरोधकांची अगतिकता अधोरेखीत करून भाजपची महती उद्‍घृत केली. ‘गोव्यात व देशातही भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. राज्यात व देशात यापुढे भाजपचेच सरकार असणार आहे. याची जाणीव विरोधी पक्षातील आमदारांनाही झाली आहे. आम्ही कधी कुणाला पक्षात या म्हणून बोलावलेले नाही. विरोधी आमदार होलसेलमध्ये येतात त्याला आम्ही काय करणार?’ असे राणे उद्‍गारताच एकच हशा पिकला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर ‘डॉक्टर जसे नस तपासून रुग्णाच्या आजाराचे निदान करतात त्याचप्रमाणे राजकारण्यांनी लोकांची नस ओळखणे गरजेचे आहे. लोकांच्या भावना समजून काम करणारे सरकार असायला पाहिजे. राजकारण्यांनी लोकांच्या हृदयात काय आहे हे ओळखले पाहिजे’ असेही ते म्हणाले. त्यावर हे विधान कोणासाठी होते? कशासाठी होते? यावर आता चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak

देशपांडेंची आठवण!

गोमंतकीय आयएएस अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांना राज्यसेवेतून मुक्त होऊन तत्काळ लडाखच्या प्रशासनात रुजू व्हावे म्हणून गृहमंत्रालयाने आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास संजीत यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईसह त्यांना बढतीपासूनही रोखण्यात येईल अशी ताकीदही गृहमंत्रालयाने दिली आहे. २०१३ च्या ॲग्मू केडरचे आयएएस अधिकारी असलेल्या संजीत यांच्याकडे इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) महत्त्वाचे काम आहे. स्मार्ट सिटीच्या कामांबाबत शंखनाद होत असताना त्यांच्याकडे व्यवस्थापनाची जबाबदारी आली होती. त्यासाठी त्यांना न्यायालयीन लढाईलाही सामोरे जावे लागले. अजूनही स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत आणि ३१ मे पर्यंत रस्त्याची कामे पूर्ण होतील, असे सांगितले गेले आहे. संजीत यांना काढलेला आदेश पाहिला तर माजी सनदी अधिकारी आत्माराम देशपांडे यांची आठवण झाली. कारण देशपांडे यांनाही असेच आदेश आले होते, पण केंद्रातील सरकारातील माजी संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी त्यांना कारवाईपासून वाचविले होते. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; तवडकरांची घोडेस्वारी!

मद्य चोरीची सुरस कथा!

गोव्यातील अबकारी खाते नेहमीच चर्चेत राहिले आहे. अबकारीसंदर्भात ‘खाते’चा नेहमीच शब्दछल केला जातो. अलीकडेच पत्रादेवी येथे पकडण्यात आलेल्या हरियाणातील दोन कोटींच्या मद्याचे कवित्व अद्यापही संपलेले नाही. ती कारवाई कोणी जाणूनबुजून केलेली नाही, तर त्या ट्रकचालकाच्या निरागसतेमुळे तो प्रकार उघडकीस आला. हरियाणातून गोव्यात येणाऱ्या मद्यासाठी गोवा अबकारी खात्याचा ना हरकत दाखल आवश्यक होता. चालक आपणहून कागदपत्रे द्यायला थांबला आणि चोरीचा मामला उघड झाला अन् झाले भलतेच. दारू पकडूनही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या! दारू कोणासाठी जात होती हे गुलदस्त्यातच राहिले. जाणकारांचा रोख मात्र मोपा - पेडणेकडे आहे. आरोप करणारे म्हणतात ‘समझनेवालों को इशारा काफी है’. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांचा करिश्मा?

अन्‌ चिंता फोल ठरली!

कुर्टी - खांडेपारचे सरपंच नीळकंठ नाईक यांच्या अध्यक्षतेखालील पंचायतीची ग्रामसभा सुरळीत पार पडली. एरव्ही गडबड गोंधळ, आरोप प्रत्यारोप अशा वातावरणात या पंचायतीच्या ग्रामसभा झाल्या आहेत. मात्र, ही ग्रामसभा शांततेत आणि उपस्थित काही प्रश्‍नांवर चर्चा करून पार पडली. सरपंचांनीही योग्य तऱ्हेने उत्तरे दिली. तसे पाहिले तर नीळकंठ नाईक हे शिक्षित आणि शांत स्वभावाचे व्यक्तिमत्त्व. त्यामुळे या ग्रामसभांच्या गदारोळात या माणसाचे कसे काय होईल, अशीच चिंता काहीजणांनी व्यक्त केली होती, पण त्याला छेद देत न भूतो न भविष्यती अशी शांत आणि चर्चेतूनच ग्रामसभा पार पडली. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com