गोव्यात अशी अनेक गावे आहेत, जिथे विविध प्रकारच्या प्रथा पूर्वापार जपल्या जातात. बार्देशातील सडये-शिवोली येथील डोंगराच्या कुशीत वसलेल्या निसर्ग संपन्न अशा गावात अशीच एक अनोखी प्रथा गेली 78 वर्ष जपली जात आहे.
गावसावाडा-सडये या भागात असलेल्या माय -दे- देऊश कपेलच्या आवारात दरवर्षी 1 मे रोजी ख्रिस्ती बांधव कुटुंबासह मोठ्या संख्येने जमा होतात. गावांतील ज्या तरुणीचा विवाहसोहळा सर्वांत आधी ठरलेला असतो, त्या तरुणीच्या हस्ते गावातील रीतीरिवाजाप्रमाणे कपेलाच्या आवारात असलेल्या देवी मारियाच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या डोक्यावर स्थानिक धर्मगुरू तसेच ज्येष्ठांच्या उपस्थितीत सर्वांसमक्ष टाळ्यांच्या कडकडाटासह डोक्यावरचा मुकुट चढवण्यात येतो.
यावेळी पारंपरिक रीतीरिवाजानुसार सिनीयर धर्मगुरुकडूंन कपेलात धार्मिक उपदेश केला जातो. ही प्रथा गेली 78 वर्षे ग्रामस्थांकडून जपली जात असून असे केल्याने गावांतील प्रत्येक नववधूला योग्य साथीदार मिळण्याबरोबरच लग्नसोहळा कुठल्याही विघ्नांशिवाय पार पाडला जातो आणि त्यांचा संसार कायम टिकून राहतो, अशी ग्रामस्थांची भावना आहे.
78 वर्षांनंतरही येथील सायबीणीच्या मस्तकावर मुकुट चढवण्याचा समारंभ आजही तितक्याच भक्तिभावाने आणि धार्मिकतेने साजरा केला जात आहे. सोमवारी दुपारी येथील सेरेमनी आॉफ झी क्राऊन स्थानिक धर्मगुरू तसेच उपस्थित ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.
बंधुभावासाठी प्रथेचा पालन
सडयेत गावस आडनावांची लोकवस्ती होती, यापैकी बरेच लोक ख्रिश्चन झाले. एकमेकांत सहकार्याने राहाण्यासाठी ख्रिस्ती धर्मगुरूंनी माय-दे-देऊश कपेलच्या आवारात उभारण्यात आलेल्या माता मारिया अर्थातच सायबीणीच्या पूर्णाकृती पुतळ्यापाशी जमा होऊन सायबीणीचे आशीर्वचन घेण्याचे फर्मान सोडले.
गावातील ज्या तरुणीचा विवाह सोहळा सर्वप्रथम ठरलेला असेल त्या तरुणीच्या (नववधुच्या) हस्ते सायबीणीच्या मस्तकावर (मुकुट)चढवण्याची प्रथा त्या दिवसांपासून सुरू झाली. तेव्हापासून गावांतील ख्रिस्ती समाज एकत्रित येऊ लागला व एकमेकांशी बंधुभावाने वागू लागला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.