मडगाव: मंगळवारी (ता.२०) रात्री उशिरा मडगावात पावसाचा जोर अकस्मात वाढल्याने मडगाव बाजारपेठेसह कित्येक ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्याने लोकांची दैना उडाली. यावेळी बाजारपेठेतही पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. मडगावच्या न्यू मार्केटमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी गडबडून गेले. शहरातील जुने स्टेशन रोड, रावणफोंड व रेल्वे स्टेशन व अन्य ठिकाणीही रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.
शहरातील काही ठिकाणांची गटारे अजूनही साफ न केल्याने आणि या गटारात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचून राहिल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप मडगाव न्यू मार्केट व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी केला. या बाजाराच्या परिसरात असलेली गटारे साफ करा म्हणून आम्ही पालिकेला निवेदन दिले होते; पण त्याची दखल कुणी घेतली नाही, असा आरोप
त्यांनी केला. आज बुधवारी हे पाणी ओसरले असले तरी लाेकांना चिखल तुडवत या मार्केटमधून फिरावे लागत होते.
मंगळवारच्या पावसामुळे रात्री उशिरा अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यांवर पडली. इंडोना-दवर्ली येथे मंगळवारी रात्री येथे एका घरात पाणी शिरले. अग्निशामक दलाचे अधिकारी गील सोझा यांच्या मार्गदर्शनाखाली नंतर जवानांनी घटनास्थळी जाऊन या घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविले.
मोतीडोंगर येथे देव नाईक यांच्या घरावर झाड उन्मळून पडले तर आके येथील व्हिक्टर इस्पितळ येथे रस्त्यावर एक झाड उन्मळून पडले. सेर्नाभाटीत एका घरावर झाड पडल्याने पाच हजारांची हानी झाल्याची माहिती मडगाव अग्निशामक दलाच्या कार्यालयातून देण्यात आली.
मंगळवारी जो पाऊस पडला तो मोठ्या प्रमाणात असल्यानेच रस्त्यावर व बाजारपेठेत पाणी साचले. वास्तविक मडगाव पालिकेने शहरातील बहुतेक गटारे साफ केलेली आहेत. एप्रिलपासूनच हे काम सुरू झाले होते. त्यामुळे पालिकेने गटारे साफ केली नाहीत. या आरोपात काहीच तथ्य नाही. काहीजणांना कुठल्याही बाबतीत मडगाव पालिकेला दूषण देण्याची सवय जडली आहे. आता होत असलेले आरोपही त्याचप्रकारचे आहेत. - दामोदर शिरोडकर, नगराध्यक्ष
ही वेळ टीका करण्याची नाही!
मडगाव शहराची आणि संपूर्ण गोव्याची मंगळवारी जी दाणादाण उडाली त्यासाठी सरकारला दोष देऊन चालणार नाही. वादळी स्थितीमुळे अवकाळी आलेल्या पावसामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे आणि तिला सर्वांनी एकत्रीतपणे सामोरे जाणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.
एरव्ही आपण सरकारवर टीका करत असतो; पण ही सरकारवर टीका करण्याची वेळ नाही तर सरकारला पाठिंबा देण्याची वेळ आहे. मे महिन्याच्या मध्याला असा पाऊस पडणार असे कोणालाच वाटले नसावे. शिवाय आम्ही फातोर्ड्यात पावसाळापूर्व कामांना सुरवात केली होती, ती पूर्ण व्हायला आणखी कमीत कमी दहा दिवस तरी लागतील.
बुधवारी (ता.२१) फातोर्डात वीज खात्याच्या उपविभाग कचेरीमागील नाल्याच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आला. जवळ जवळ २०० मीटर लांबीचा नाला बांधण्याच्या कामाला अंदाजे ८५ लाख रुपये खर्च येणार असून हे काम जलसंसाधन खात्यामार्फत केले जात आहे, अशी माहिती असे सरदेसाई यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.