Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; रामदेवबाबांचे कुंकळ्‍ळीतही कारनामे?

Khari Kujbuj Political Satire: राज्यात तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती व्हावी यासाठी फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांनी आवाज उठवला होता.

Sameer Panditrao

रामदेवबाबांचे कुंकळ्‍ळीतही कारनामे?

मडगाव पालिकेत ‘रामदेवबाबा’ या नावाने सर्वांना परिचित असलेले तांत्रिक विभागातील अधिकारी सध्‍या कुंकळ्‍ळीतील एका कारनाम्‍यामुळे पुन्‍हा एकदा चर्चेत येण्‍याची शक्‍यता सध्‍या व्‍यक्‍त केली जात आहे. कुंकळ्‍ळी पालिकेतील एक ‘प्रोटेक्‍शन मनी’चे प्रकरण सध्‍या उघडकीस आले असून मुंबई उच्‍च न्‍यायालयाने या संंबंधी चौकशी करण्‍याचे आदेशही दिला आहे. यामुळे कित्‍येकांचे धाबे दणाणले आहेत. त्‍यात रामदेवबाबांचाही समावेश असण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जाते. ज्‍या बेकायदेशीर बांधकामांकडे कुंकळ्‍ळी पालिकेने एवढा काळ दुर्लक्ष केले त्‍या बांधकामाच्‍या सुरुवातीच्‍या काळात याच रामदेवबाबाने काम पाहिले होते. त्‍यामुळे आता मुख्‍याधिकाऱ्यांबरोबरच ज्‍या सर्वांची चौकशीची लांबड सुरू होणार त्‍यात रामदेवबाबांचेही नाव असल्‍यास कुणी आश्‍चर्य मानू नये. ∙∙∙

रस्त्यांची वाताहत

राज्यातील रस्ते पुन्हा एकदा खराब होऊ लागले आहेत. गेल्या वर्षी सर्व रस्त्यांची पावसामुळे वाट लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित कंत्राटदार, अभियंत्यांवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते, पण नंतरच्या काळात तशी प्रभावी कारवाई झालीच नाही. त्याचाच परिपाक म्हणून की काय, यंदाही पावसाळ्यात राज्यातील रस्ते खराब होऊ लागले आहेत. गेल्या मे महिन्यात विविध ठिकाणी हॉटमिक्स डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडू लागल्याने सरकार तोंडदेखलेपणा करीत असल्याने नागरिकांच्या करातून येणारा घामाकष्टाचा पैसा सरकारकडून हपापाचा माल गपापा केला जात असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ∙∙∙

तिसरा जिल्हा होणार; पण...

राज्यात तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती व्हावी यासाठी फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांनी आवाज उठवला होता. फोंडा तालुक्यासह लगतच्या इतर भागातील लोकांना पणजी, मडगाव लांबचे पडत असल्याने फोंडा केंद्रस्थानी ठेवून तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती व्हावी यासाठी रवी पात्राव यांनी रेटा धरला, रवी पात्रावच्या प्रयत्नांना शेवटी यश आले आणि अखेर तिसऱ्या जिल्ह्याचा भिजत पडलेला प्रश्‍न मार्गी लागला. पण हाय रे दैवा...! तिसरा जिल्हा फोंड्यासाठी नव्हे तर केपे, कुडचडे व इतर भागासाठी करण्याचे सरकारने ठरवल्याने फोंड्यासाठी काय....! रवी पात्रावच्या प्रयत्नांना सरकार दरबारीच खो घालण्यात आला असून एवढी वर्षे आवाज उठवून शेवटी भलत्यालाच लाभ अशातला, हा प्रकार झाला असल्याच्या प्रतिक्रिया सध्या फोंड्यात व्यक्त होत आहेत. ∙∙∙

कुजबूज इम्पॅक्ट, अखेर ''तो'' सोफा हटवला!

‘ही लोकांना विजेचा शॉक येण्याची तरतूद’ ह्या मथळ्याखाली गुरुवारी ‘गोमन्तक’ मध्ये खरी कुजबूज छापून आल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झालेली पहायला मिळाली. कुजबूज प्रसिद्ध झाल्यानंतर २४ तासांच्या आत वीज ट्रान्सफॉर्मर आणि ‘आरएमयू’ या दोन उच्चदाबाच्या वीज उपकरणांच्यामध्ये नव्याने बांधण्यात आलेला सिमेंटचा सोफा अखेर हटविण्यात आला. या दोन उपकरणांद्वारे मधोमध ११ केव्ही उच्चदाबाचा वीज पुरवठा होत होता‌. वाडी तळावली पंचायत क्षेत्रात हा प्रताप घडला होता. फोटोसह ही ‘खरी कुजबूज’ प्रसिद्ध झाल्यानंतर म्हणे वीज खाते आणि पंचायतीची बरीच तंतरली. मात्र हा सिमेंट सोफा हटवल्याने भविष्यातील धोका टळला हे मात्र खरे. ∙∙∙

जीत यांचे अभिनंदन

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी विधानसभेत शून्य प्रहरात मराठी ही गोव्याची दुसरी राजभाषा करावी, असे मत मांडले. यामुळे शुक्रवारी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. मराठीप्रेमींनी त्यांचे मुक्त कंठाने कौतुक केले. जणू मराठी राजभाषा झालीच, असे वातावरण त्यानिमित्ताने तयार झाले होते. मराठीचा विषय घेऊन सध्या राज्यभर मेळावे आयोजित करून जनजागृती करणारे सुभाष वेलिंगकर यांनी सहकाऱ्यांना सोबत घेत आरोलकर यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. मराठीची पताका आरोलकर यांनी खांद्यावर घेतल्याने त्यांची जबाबदारी निश्चितच वाढली आहे. आता ते निदान मराठीसाठी खासगी ठराव कधी मांडतील, याची प्रतीक्षा आहे. ∙∙∙

सभापतींचा वाढदिवस अन् चर्चा!

नवऱ्याचा पगार व नवरीचे वय कोणी विचारू नये, असे म्हणतात. मात्र, येथे सभापती वयाची ५७ वर्षे शनिवारी की रविवारी पूर्ण करणार या बाबतीत घोळ चालू आहे. दोन्ही दिवशी विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. त्यामुळे शुभेच्छा देताना ५७ व्या वाढदिवसाच्या शनिवारी की रविवारी द्याव्यात, हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. त्याच बरोबर मंत्रिपदाची माळ वाढदिवसाच्या कालावधीत त्यांच्या गळ्यात पडेल, अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांना होती. मात्र ती अपेक्षा फलद्रूप झाली नाही, ‌राज्यपाल बदलले पण सभापती काही बदलले नाहीत. ∙∙∙

फोंड्याच्या लोकांची चांदी!

फोंडा मतदारसंघात आगामी निवडणुकीत कधी नव्हे एवढी चुरस निर्माण होण्याची शक्यता दिसायला लागली आहे. आतापासूनच इच्छुक उमेदवारांकडून मतदारांवर पैशांची, आमिषांची खैरात व्हायला सुरुवात झाली असून ‘देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी’ अशी मतदारांची स्थिती झाली आहे. पण मतदारही आता हुशार झाले असून ‘मिळते ते घ्या, नंतर काय करायचे ते बघू’ अशा भूमिकेत ते वावरताना दिसायला लागले आहेत. तशी शहरात चर्चाही सुरू झाली असून प्रत्येक इच्छुक उमेदवारांबाबत वेगवेगळे तर्क व्यक्त होताना दिसत आहे. यामुळे फोंड्यात सध्या रोचक परिस्थिती निर्माण झाली असून मतदार कोणाला ‘हात’ देतात आणि कोणाला ‘हात’ दाखवितात हे निवडणुकीपर्यंत कळणे कठीण झाले आहे. तोपर्यंत फोंड्यातील मतदारांची ‘चांदी’ होणार आहे एवढे मात्र निश्चित. ∙∙∙

न सुटणारे राजकीय कोडे

सासष्टींतील आठपैकी कॉंग्रेसचा एक बालेकिल्ला असलेल्या नुवे मतदारसंघातून निवडून आलेल्या सलग दोन आमदारांनी नंतर कॉंग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केला व त्यामुळे कट्टर कॉंग्रेसवाल्यांच्या भुवया नंतर उंचावल्या होत्या. आता तेथून निवडणूक लढविण्याची तयारी करत असलेल्या लिंडनबाबांनी एकप्रकारे त्या प्रवेशाचे समर्थन करताना मतदारांमुळेच म्हणजे त्यांच्या आग्रहावरून ते पक्षांतर झाल्याची मुक्ताफळे उधळली होती. महत्वाचे म्हणजे सरसकट कॅथलिक मतदार भाजपावर रुष्ट असल्याची भाकिते राजकीय विश्लेषक सतत करत असताना नुवेतून सलग पक्षांतर करून भाजपात जाणारे दोन्ही आमदार कॅथलिक होते. त्यांनी भाजपात जाण्याचे हे धाडस कोणत्या कारणास्तव केले असावे हे कोडे असून त्याचे उत्तर अजून अनेकांना मिळालेले नाही. त्यापूर्वी म्हणजे २०१७ मध्ये असाच भाजप प्रवेश केलेल्यांना २०२२ मध्ये मतदारांनी घरी बसविलेले असूनही अनेक मतदारसंघातही हा प्रकार घडलेला आहे, हे महत्वाचे आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT