Margao Municipal Clerk Yogesh Shetkar Sopo Fraud
मडगाव: मडगाव पालिकेला सोपो करातून आलेले १७ लाख आपल्या घशात घातल्याने सध्या मडगाव पोलिस कोठडीत बंद असलेल्या ठकसेन योगेश शेटकर याने स्वतःची गुंतवणूक कंपनी उघडून अनेकांना गंडविल्याची बाबही आता पुढे आली आहे.
योगेश शेटकर याने ‘डेवरीच टेक्नॉट्रिक फ्युचरवर्ल्ड’ नावाची एक कंपनी उघडली होती व तो आपल्या ग्राहकांना या कंपनीचा आपण संचालक असल्याचे सांगत होता. या कंपनीत तो लोकांना पैसै गुंतवायला सांगायचा. एक लाख रुपये गुंतविल्यास एका वर्षानंतर हे पैसे परत करण्याबरोबरच त्या गुंतवणुकदारांना प्रत्येक दिवशी एक हजार रुपये देण्याचा वायदा त्याने केला होता.
शॅडो कॉन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी आज घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डिचोली येथील अर्जुन सुतार नावाच्या एका व्यक्तीने शेटकर याच्या या कंपनीत आपले पैसै गुंतवले होते ही माहिती आमच्याकडे आली आहे. इतर काहीजणांनी अशी गुंतवणूक करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. आता या प्रकरणीही शेटकर याच्या विरोधात पोलिस तक्रारी दाखल केल्या जातील, असेही कुतिन्हो म्हणाले.
मडगाव सोपो कर घोटाळा प्रकरणी मडगाव पालिकेने शेटकर याच्या विरोधात गेल्या जून महिन्यात तक्रार केली होती. मात्र, पोलिस त्याला सहा महिने पकडू शकले नव्हते. पोलिसांनी या प्रकरणात तपास करताना हलगर्जीपणा केल्याचा आरोप कुतिन्हो यांनी केला.
दरम्यान, या प्रकरणी पोलिस तपास कुठपर्यंत पोहोचला आहे हे जाणून घेण्यासाठी मडगाव पोलिसांशी संपर्क साधला असता आम्ही त्याची कसून चौकशी करत आहोत, अशी माहिती पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली. शेटकर याचा पोलिस कोठडीचा रिमांड उद्या संपत असल्याने उद्या पुन्हा त्याला न्यायालयात हजर करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
योगेश शेटकर हा मडगाव पालिकेत साधा लिपिक असताना त्याच्याकडे पैसै हाताळण्याचे काम दिलेच कसे असा सवाल ग्रीन गोवा फाउंडेशन या एनजीओने केला असून त्याला पैशाचा व्यवहार हाताळण्याचे अधिकार दिलेल्या पालिकेच्या ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांनाही अटक करण्याची गरज या संघटनेचे अध्यक्ष रेसन आल्मेदा यांनी व्यक्त केली आहे. या १७ लाखांच्या घोटाळ्यास ते दोन अधिकारी कारणीभूत असल्याने त्या दोघांना अटक केली नाही, तर आपण मडगाव पालिकेला कोर्टात खेचू असा इशारा त्यांनी दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.