Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat: 14 वर्षांनंतर मंत्री झालेले दिगंबर कामत मडगावात कोणते बदल घडवून आणू शकतील?

Goa Politics: २०१२ साली काँग्रेसला गोव्‍यात सरकार बनविण्‍यास अपयश आल्‍यानंतर सत्तेबाहेर गेलेले मडगावचे आमदार दिगंबर कामत तब्‍बल १४ वर्षांनंतर परत मंत्रिपदी आरुढ झाले आहेत.

Sameer Panditrao

मडगाव: २०१२ साली काँग्रेसला गोव्‍यात सरकार बनविण्‍यास अपयश आल्‍यानंतर सत्तेबाहेर गेलेले मडगावचे आमदार दिगंबर कामत तब्‍बल १४ वर्षांनंतर परत मंत्रिपदी आरुढ झाले आहेत. आज प्रसारमाध्‍यमांशी बाेलताना दिगंबर कामत यांनी सांगितले की, लोकांची सेवा करण्‍यासाठी मिळालेली ही एक नवीन संधी आहे.

कामत यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे यापुढे मडगाव आणि फातोर्डा या दोन्‍ही मतदारसंघांचे राजकारण वेगळे वळण घेणार का आणि मागचे चार टर्म मडगावात स्‍वत:च्‍या ताकदीवर नगरमंडळ घडवू न शकलेल्‍या भाजपला पुढच्‍या वर्षी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत त्‍याचा फायदा होईल का? सध्‍या मडगावात या दोन प्रश्‍नांची चर्चा होत असून १४ वर्षांनंतर पुन्‍हा मंत्री झाल्‍यावर दिगंबर कामत मडगावात कोणते नवे बदल घडवून आणू शकतील हाही प्रश्‍न विचारला जात आहे.

राजकीय विषयावरील भाष्‍यकार प्रभाकर तिंबले यांना यासंदर्भात विचारले असता, २०१२ सालापासून दिगंबर कामत हे मंत्रिमंडळाच्‍या बाहेर आहेत. त्‍यातला बराच काळ ते विरोधी पक्षात होते.

यामुळे लाेकांकडून त्‍यांच्‍यावर टीका होत होती. दिगंबर कामत हे मुख्‍यमंत्री असतानाही त्‍यांनी मडगावसाठी काहीच केले नाही, असा आराेप त्‍यांच्‍यावर केला जात होता. आता पुन्‍हा मंत्रिपद मिळाल्‍यानंतर मडगावसाठी काही केले नाही, हा त्‍यांच्‍यावर असलेला डाग धुवून काढण्‍याची त्‍यांना संधी प्राप्‍त झाली आहे. त्‍याचा ते कितपत फायदा करून घेतात हे पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.

२००७ ते २०१२ पर्यंत दिगंबर कामत गोव्‍याचे मुख्‍यमंत्री होते. मात्र, २०१२च्‍या निवडणुकीत काँग्रेसच्‍या हातातून सत्ता गेल्‍यानंतर २०२२ पर्यंत ते विरोधी पक्षातच होते. त्‍यांच्‍या कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत यासाठी त्‍यांच्‍यावर दबाव वाढत हाेता.

त्‍यामुळे १४ सप्‍टेंबर २०२२ रोजी त्‍यांनी काँग्रेसला राम-राम करून भाजपात प्रवेश घेतला; पण मंत्रिपद नसल्‍याने त्‍यांचा प्रभाव नाही म्‍हटले तरी कमी झाला हाेता. याचाच परिणाम २०२४ च्‍या लाेकसभा निवडणुकीत जाणवला हाेता.

दिगंबर कामत हे भाजपबरोबर असूनही भाजपला मडगावातून अपेक्षित आघाडी घेण्‍यास अपयश आले होते. त्‍यानंतर मडगावातील कामत यांचा प्रभाव कमी झाला, अशी हाकाटी सुरू झाली होती. त्‍या पार्श्वभूमीवर आता त्‍यांना मंत्रिपद मिळाल्‍याने पुन्‍हा एकदा त्‍यांचे राजकीय वजन वाढले आहे, असे सांगितले जाते.

राजकीय विषयावरील आणखी एक भाष्‍यकार असलेले ॲड. क्‍लिओफात कुतिन्‍हो यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना, २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर कामत यांचा मडगावातील राजकीय प्रभाव काही प्रमाणात कमी झाल्‍याचे दिसून आले होते.

आता ते मंत्री झाल्‍यानंतर त्‍यांचा प्रभाव परत एकदा वाढणार हे निश्‍चित. याचा फायदा येणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजपला निश्‍चितच जाणवेल. दिगंबर कामत यांनी भाजपपासून फारकत घेतल्‍यानंतर राज्‍यात भाजपचे सरकार असतानाही विजय सरदेसाई आणि दिगंबर कामत यांचे एकत्रित पॅनलच मडगाव नगरपालिकेत सत्तेवर येत होते.

आता कामत मंत्री झाल्‍याने पुन्‍हा एकदा पूर्ण ताकदीने मडगाव पालिका काबीज करण्‍याचे मनसुबे भाजप आखू शकतो, असे सांगितले.

दिगंबर कामत मंत्री झाल्‍यामुळे फातोर्ड्याच्‍या राजकारणावर काही परिणाम होणार का, असे विचारले असता, सध्‍या तरी काही सांगता येत नाही. मडगावप्रमाणेच दिगंबर कामत फातोर्ड्यातही लक्ष घालतील का, यावर त्‍याचे उत्तर अवलंबून असेल, असे ॲड. कुतिन्‍हो म्‍हणाले.

आतापर्यंत एक गोष्‍ट लक्षात घ्‍यायला पाहिजे की, मागच्‍या तीन निवडणुकांत दिगंबर कामत यांनी फातोर्ड्यात विजय सरदेसाई यांना कधी विराेध केला नव्‍हता. २०१२ च्‍या निवडणुकीत विजय सरदेसाई अपक्ष म्‍हणून निवडणूक लढत होते आणि काँग्रेसने या मतदारसंघात आपला उमेदवार उभा केला होता. असे असतानाही दिगंबर कामत

यांनी त्‍यावेळीही सरदेसाई यांना विरोध केला नव्‍हता. त्‍यामुळे आता ते काय करतील ते पाहावे लागेल, असे ते म्‍हणाले.

दिगंबरसाठी हा ‘गाेल्‍डन शेकहँड’

दिगंबर कामत यांना मंत्रिपद दिले आहे ते पाहता भाजप पक्षाने त्‍यांना दिलेला हा ‘गाेल्‍डन शेकहँड’ आहे असे आपल्‍याला वाटते, अशी प्रतिक्रिया प्रभाकर तिंबले यांनी व्‍यक्‍त केली. दिगंबर कामत यांचे हे आमदार म्‍हणून मडगावातील शेवटचे टर्म असावे. यासाठीच निवृत्तीच्‍यावेळी कुणालाही काही भेट देतात तशातऱ्हेने दिगंबर कामत यांना हे मंत्रिपद दिले आहे.

त्‍यांच्‍यानंतर त्‍यांचे पुत्र योगीराज कामत यांना भाजप उमेदवारी देईल, अशी जी अपेक्षा व्‍यक्‍त केली जाते तीही चुकीची असून भाजपच्‍या सध्‍याच्‍या केंद्रीय नेतृत्‍वाची एकंदरच कार्यशैली पाहिल्‍यास येणाऱ्या निवडणुकीत भाजप मडगावातून नवा चेहरा पुढे आणणे पसंत करेल असे वाटते, अशी प्रतिक्रिया तिंबले यांनी व्‍यक्‍त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Digital Taxi Policy: गोव्यात लवकरच नवीन 'टॅक्सी धोरण', 10 सप्टेंबरपर्यंत मसुदा तयार करण्याचे मुख्यमंत्री सावंतांचे निर्देश; बैठकीनंतर अखेर तोडगा

Rohit Sharma: 'अनुभव हीच त्याची सर्वात मोठी ताकद, रोहित असा लीडर आहे...' राहुल द्रविडकडून 'मुंबईच्या राजा'वर स्तुतीसुमनांचा वर्षाव

Sachin Tendulkar In Goa: 'क्रिकेटचा देव' गोव्यात, काणकोणात क्रीडांगणाचं केलं उद्‌घाटन, विद्यार्थ्यांशीही साधला संवाद

काँग्रेस आमदाराच्या गोव्यातील कॅसिनोंवर ईडीचे छापे; पहाटे पाचपासून झाडाझडती सुरु

Navpancham Rajyog 2025: 27 ऑगस्टपासून 'या' राशींसाठी 'शुभ काळ' सुरू, शुक्र बनवणार शक्तिशाली राजयोग; आर्थिक लाभ होणार

SCROLL FOR NEXT