म्हापसा: गणेशपुरी-म्हापसा येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाच अज्ञात दरोडेखोरांच्या एका टोळीने अक्षरशः धुमाकूळ घालत सलग दोन ठिकाणी घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. म्हापसा पालिकेच्या माजी नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांच्या बंगल्याला लक्ष्य करत या टोळीने लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला, तर त्याच रात्री परिसरातील शिरोडकर यांच्या फ्लॅटवरही डल्ला मारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
माजी नगराध्यक्षांचे कुटुंबीय कामानिमित्त परगावी गेले असल्याने बंगला बंद होता. रविवारी, सकाळी नेहमीप्रमाणे घरकाम करणारी महिला कामावर आली असता, बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडा आणि कुलूप तोडलेले दिसले.
तिने तत्काळ शेजाऱ्यांना व पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घराची झडती घेतली असता कपाटे उचकटून त्यातील रोख रक्कम आणि मौल्यवान ऐवज चोरट्यांनी पळवून नेल्याचे स्पष्ट झाले.
प्राथमिक तपासानुसार, ३० ते ४० वयोगटातील तोंडावर कापड अथवा मास्क बांधून आलेल्या ५ जणांच्या टोळीने मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरी केली. या टोळीने गणेशपुरीत केवळ माजी नगराध्यक्षांचा बंगलाच नव्हे, तर त्याच परिसरात राहणाऱ्या शिरोडकर यांच्या बंद फ्लॅटचेही कुलूप तोडून चोरी केल्याचे समोर आले आहे.
म्हापसा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात संशयितांविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदवला असून श्वानपथक व फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.