

कौस्तुभ नाईक
‘जेएनयू वाले हे, जेएनयू वाले ते, ते दारू पितात, देशद्रोही, राष्ट्रविरोधी, अर्बन नक्षल, डावी वाळवी, दगड न धोंडे!’ पण विद्यापीठाच्या आत ह्या सगळ्या दुष्प्रचाराला पुरून उरणारी आणि नेहमीच अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारी एक वेगळी दुनिया आहे. नेहा बोराच्या रूपाने हे सगळे विषय पुन्हा चर्चेस आले आहेत.
२०१७ साली मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एमफिल करण्यासाठी दाखल झालो. २०१६ पासून बऱ्याच उलथापालथी तिथे घडून गेल्या होत्या. त्यानंतर जेएनयूच्या वातावरणात उत्तरोत्तर बदल होत गेले. त्या बदलांचा मी साक्षीदार आहे. एकेकाळी जगभर प्रतिष्ठेचं मानलं जाणारं हे विद्यापीठ एका हिंस्त्र टीकेचं शिकार बनवून तिथली व्यवस्था बिघडवून टाकली. तिथल्या विद्यार्थ्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. राष्ट्रीय पातळीवरच्या माध्यमांतून जेएनयूबाबतीत दुष्प्रचार केला गेला. तो आताही अव्याहत चालू आहे. ‘जेएनयू वाले हे, जेएनयू वाले ते, ते दारू
पितात, देशद्रोही, राष्ट्रविरोधी, अर्बन नक्षल, डावी वाळवी, दगड न धोंडे!’ पण विद्यापीठाच्या आत ह्या सगळ्या दुष्प्रचाराला पुरून उरणारी आणि नेहमीच अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारी एक वेगळी दुनिया आहे. नेहा बोराच्या रूपाने हे सगळे विषय पुन्हा चर्चेस आले आहेत. जेएनयूविषयी आम्हा विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नॉस्टॅलजिया आहे. ‘विश्वविद्यालय’ हि संज्ञा सार्थ करणारी ती एक वास्तू आहे. त्याविषयी, तिच्या इतिहासाविषयी मी फार काही लिहू इच्छित नाही पण तो इतिहास जरूर वाचावा. आलेफ बुक कंपनीतर्फे ‘जेएनयू स्टोरीज’ नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं आहे ते तर नक्की वाचा.
जेएनयूविषयी सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे तिथे तुम्हाला मिळत असलेलं समाजाचं, जगाचं एक व्यापक भान. मी गेल्या दहा वर्षात संशोधनानिमित्त जगभरातल्या बऱ्याच विद्यापीठांना भेट दिली आहे. त्यात दोन गोष्टी ठळक जाणवल्या. पहिली म्हणजे ह्या विद्यापीठांच्या तुलनेने जेएनयू कुठेही कमी नाही. कमीतकमी संसाधनांमध्ये आंतरराष्ट्रीय तोडीचं शिक्षण तिथं मिळतं आणि असं विद्यापीठ आपल्या भारतात आहे हे खरंतर आपलं भाग्य समजलं पाहिजे. जगभरातल्या तुम्ही जेएनयूचे विद्यार्थी आहेत हे कळल्यावर तिथे तुम्हाला आदराने वागवतात हे मी स्वतः अनुभवलं आहे. मी सद्या अमेरिकेतल्या एका प्रतिष्ठित खाजगी विद्यापीठात पीएचडी करतो आहे. इथे पैसे, संसाधने इत्यादींची कमतरता नाही.
मागाल ते मिळतं. कोव्हीड काळात घरी बसून ऑनलाईन क्लासेस नीट अटेंड करता यावे म्हणून मी घेतलेल्या खुर्चीचे सुद्धा पैसे माझ्या विद्यापीठाने दिले होते. अमेरिकेतली सात जुनी आणि प्रमुख विद्यापीठांचा एका समूह आहे ज्याला ‘आयव्ही लीग’ असे म्हणतात. ह्यात हार्वर्ड, कोलंबिया, कॉर्नेल, प्रिन्स्टन, ड्यूक, ब्राऊन आणि मी शिकत असलेल्या पेन ह्या विद्यापीठांचा त्यात समावेश आहे. पदवीच्या मुलांना शिकवण्यासाठीची पात्रता व तयारी मी कुठे आत्मसात केली असेन तर जेएनयूमध्येच. आज अमेरिका, ब्रिटन, युरोप ह्यासारख्या प्रदेशांतल्या विद्यापीठांमध्ये भारताविषयी खूप महत्वाचे संशोधन चालू आहे. हे करणारे आणि अश्या विद्यापीठात शिकवणाऱ्यांपैकी बरेचसे लोक हे जेएनयूचे माजी विद्यार्थी आहेत.
तात्पर्य, कोणी कितीही दुष्प्रचार केला तरी ज्ञाननिर्मितीतला जेएनयूचा जागतिक दबदबा हा अढळ आहे. इथे शिकवणारेही लोक मातब्बर - रोमिला थापर, गोपाळ गुरु, सुखदेव थोरात, प्रभात पटनाईक, जयती घोष, सौम्यव्रत चौधरी! चौधरी हे माझ्या विभागातले प्राध्यापक. त्यांच्या तासाला तर जेएनयूतल्या इतर विभागातूनच नव्हे तर आयआयटी, दिल्ली विश्वविद्यालय सारख्या इतर संस्थातूनही विद्यार्थी येत असत. जयती घोष ह्या जेएनयूतल्या एक प्राध्यापिका.संयुक्त राष्ट्राच्या समित्यांवर वगैरे त्यांची नेमणूक असे.
ज्यांनी आमचं विद्यार्थी जीवन समृद्ध केलं. एकदा मी आणि माझा अमेरिकेतील रूममेट नझर खालिद फिलाडेल्फियातल्या फार्मर्स मार्केटमध्ये फिरत होतो. आम्ही दोघेही जेएनयूचे विद्यार्थी. तिथे एका तरुणाशी बातचीत करता आम्ही भारतीय आहोत हे कळल्यावर तुम्ही प्रभात पटनाईक ह्यांना ओळखता का असा प्रश्न त्याने केला. नझर इकोनॉमिक्स शिकता असताना जेएनयूत त्यांचा विद्यार्थी होता हे ऐकल्यावर त्याने नझरला मिठीच मारली. प्रभात पटनाईक, जयती घोष आदी लोकांनी परदेशातील संधी सोडून जेएनयूत येऊन शिकवले व नवीन विद्यार्थी घडवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.