प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Importance of Staying Active: जीवन म्हणजे वाळू आणि साखर या कणांचे समप्रमाणातील मिश्रण. वाळूचे कण वेचले तर दु:ख. साखरेचे कण वेचले तर गोडवा. मुंगीप्रमाणे साखरकण संकलीत करावे.
Importance of Staying Active
Healthy LifestyleDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मुकेश थळी

संत रामकृष्ण परमहंस यांच्या धर्मपत्नी व स्वामी विवेकानंद यांच्या गुरुमाता शारदा देवी या कायम कामात मग्न असत. निरांजनाच्या वाती वळणे, झाडलोट, स्वच्छता ही कामे त्या सेवारत होऊन करत. त्यांना इतर शिष्यांनी विचारले – माते, आम्ही मदत करू का, किंवा आम्ही भांडी धुण्याची कामे करू का? त्यांनी सांगितलं, धन्यवाद बाळांनो, तुम्हांला जी कामे दिली आहेत ती प्रामाणिकपणे करा. मलाही उद्यमी राहायला हवं. निष्क्रिय राहिले तर मन खाऊन टाकेल.

मानवाचे जीवन हे सतत प्रवाहमान असते. या प्रवाहात निष्क्रिय बसलो, तर मन आणि शरीर दोन्ही गंजतात. व्यस्त राहणे म्हणजे केवळ काम करणे नव्हे, तर जीवनाला अर्थ देणे. कामांत राहिल्यावर मनाची एकाग्रता व शरिराची हालचाल वाढते. माझा एक लेखक मित्र कायम बिझी असायचा. सृजनशील उपक्रमात. सत्शील, प्रामाणिक. मी घऱात सहज बोललो. हा भाई इतका आटापिटा का करतो कळत नाही. निवृत्त झाला तर बस ना घरी...सुसेगाद. मी हसलो. माईनं गंभीर होऊन स्पष्ट प्रकाश टाकला. अरे, तो जर घऱात बसला तर गोळा होऊन जाईल नुसता. तिचं सांगणं बरोबर होतं. आपल्या अनुभवाची शिदोरी तो समाजाला निस्वार्थीपणे वाटत होता.

Importance of Staying Active
Goa Weather: गोव्यात पावसाची जोरदार हजेरी! दाबोळीत 24 तासांत 4.62 इंच पाऊस; 2 दिवस यलो अलर्ट

क्रियाशीलतेने आपल्या आनंदाची बाग वसवत होता. साचलेपणाने मनुष्य निरुपयोगी गोळा होतो. मी बाजारात गेलो होतो. भाजी फळं घेतली. दोन पिशव्या घेऊन बाहेर येत होतो. एकात शेवग्याच्या शेंगा डोकं वर काढून बघत होत्या. नारळांमुळे पिशवीचं पोट तट्ट फुगलं होतं. एक मित्र भेटला. हसतमुख मुद्रेने म्हणाला - हे सगळं तूच डेली खरेदी करतो? मी त्याला न दुखवता सांगितलं, अरे, मला दैनंदिन लागणाऱ्या ह्या वस्तू कोण आणणार? माझं काम करण्यात मला आनंद आहे. एआय करणार नाही ते. माझ्यासाठी ही फक्त खरेदी नाही. मार्केटात माझ्यातला लेखक जीवनाला खोलवर भिडतो. त्यातून लेखनाला कच्चा माल मिळतो.

इथं विक्रेत्या बाईंमध्ये भांडणं होतात. त्या एकमेकींकडे शुद्ध कोंकणी बोलताना विशुद्ध कोंकणी शिव्या हासडतात. वाक्प्रचार, म्हणी कानावर पडतात. चांगुलपणाही दिसतोच. दयाळूपणा मिळतो. पांच रूपयांना घासाघीस करणारे ग्राहक दिसतात. उर्मट विक्रेते, भांडखोर ग्राहक भेटतात. हे घटना, प्रसंग, अनुभव लेखकाला समृध्द करतात. आणि विशेष - यार, तू भेटतो इथे. मित्र चमकला. मुलांनाही खेळ, अभ्यास, कला यांत गुंतवून ठेवले तर त्यांची ऊर्जा योग्य दिशेने वाहते. रिकामेपणात ते हट्टीपणा, आळस, चिडचिड किंवा चुकीच्या सवयींकडे वळू शकतात.

गुंतवून ठेवणे म्हणजे कल्पनाशक्तीला पंख देणे. सृजनोत्सव दर दिवशी असावा. सृजनात आनंदोत्सव सामावलेला असतो. तरुणाई हे उत्साहाचे ऊर्जेचे शिखर. अभ्यास, खेळ, सामाजिक कार्य, सर्जनशीलता यांत गुंतलेला तरुण समाजाला आधार ठरतो. कामकाज, जबाबदाऱ्या, कुटुंब यांत गुंतून राहणे हे प्रौढ जीवनाला स्थैर्य देते. निष्क्रियतेत मन कोमेजते, तर कामात गुंतलेले मन संतोषी राहते. आपले काम संपले असे वृध्दांना कधीही वाटू नये. खरे तर त्यांचा अनुभव हा समाजाचा खजिना असतो.

Importance of Staying Active
Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

वाचन, लेखन, मुलांना मार्गदर्शन, सामाजिक उपक्रम यात व्यस्त राहिल्यास त्यांना जीवनाचा नवा अर्थ मिळतो, इतरांना फायदा. कार्यशीलता जीवनात प्रकाश आणते. व्यग्र राहणे हे जीवनाचे औषध. ते मनाला निरोगी ठेवते, शरीराला ताजेतवाने करते, आणि आत्म्याला समाधान देते. आळस हा गंज, तर कार्यशीलता हे तेज. जीवन म्हणजे वाळू आणि साखर या कणांचे समप्रमाणातील मिश्रण. वाळूचे कण वेचले तर दु:ख. साखरेचे कण वेचले तर गोडवा. मुंगीप्रमाणे साखरकण संकलीत करावे. हा सारखा वागत नाही, सरकार ठीक नाही, हे असे करायला पाहिजे अशा तक्रारीवजा विचारांना आमंत्रण देणे म्हणजे वाळूचे कण चाखणे. साखर खावी. गोडच गोड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com