पणजी: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षात (आरजीपी) काही महिन्यांपूर्वी झालेल्या अंतर्गत धुसफुशीमुळे पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत, राजकीय संन्यासाची घोषणा केलेले मनोज परब पुन्हा राजकारणात ‘एंट्री’ करणार आहेत.
२ ऑक्टोबर रोजी परब आपली भूमिका स्पष्ट करणार असून, ‘आरजी’तच येऊन ते आमदार वीरेश बोरकर यांच्याविरोधात दुसरा गट उभा करणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली. यासंदर्भात, मनोज परब यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
आरजीपीतील अंतर्गत वाद उफाळून आल्यानंतर सुरुवातीला मनोज परब विरुद्ध वीरेश बोरकर असे दोन गट पडलेले होते. त्यातून निराश झालेल्या परब यांनी माजी सरचिटणीस विश्वेश नाईक आणि माजी खजिनदार अजय खोलकर यांच्या साथीने बोरकर यांच्या विश्वासातील पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा झपाटा लावला. त्यानंतर परब यांनी सोशल मीडियाद्वारे बोरकर आणि इतरांवर टीकास्त्र सुरू केले.
परंतु, बोरकर यांनी त्यांना कोणतीही दाद न दिल्याने आणि स्पष्टीकरणासाठी ते परब व इतरांसमोर उपस्थित न राहिल्याने परब यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शिवाय त्याचवेळी आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याचेही जाहीर केले होते. या घडामोडींनंतर आमदार वीरेश बोरकर यांनी आरजीपीची सर्व सूत्रे स्वतःच्या हाती घेत, स्वतःला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर केले.
त्यानंतर पक्षाच्या राज्य अध्यक्षपदी शविना शिरोडकर यांची नेमणूक करून त्यांनी विविध संघटना स्थापन करण्यास सुरुवात केलेली आहे. शिवाय आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेससोबत लढवण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. त्याचवेळी मनोज परब यांनी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे.
निलंबन खोलकरांना अमान्य?
आमदार वीरेश बोरकर यांनी प्रथम विश्वेश नाईक आणि त्यानंतर अजय खोलकर यांना पक्षातून निलंबित केले. स्पष्टीकरणासाठी उपस्थित राहण्याची नोटीस जारी होताच विश्वेश नाईक यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. परंतु, खोलकर यांनी मात्र खजिनदारपदाचा राजीनामा दिलेला नाही. गणेश चतुर्थी काळात खोलकर सोशल मीडियावरून ज्या पोस्ट प्रसारित करीत होते, त्यातही आरजीपीचे नाव होते.
कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानंतरच राजकीय पुनरागमनाचा निर्णय
पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केल्यानंतर आरजीपीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मनधरणी करतील, असे सुरुवातीला मनोज परब यांना वाटत होते. परंतु, त्यांची ही अपेक्षा त्यावेळी फोल ठरली होती. परंतु, चतुर्थी काळात पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी परब यांच्या घरी जाऊन त्यांना पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यानुसारच परब यांनी पुन्हा आरजीपीत प्रवेश करून वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
चतुर्थी काळात पोस्टद्वारे बोरकरांना केले लक्ष्य
मनोज परब यांनी गणेश चतुर्थीच्या काळात सोशल मीडिया पोस्टद्वारे आमदार वीरेश बोरकर यांना सातत्याने टार्गेट केले. आरजीपीच्या नेत्यांवर पूर्वी कधीही इतरांच्या यात्रांत सहभागी होण्याची वेळ आलेली नव्हती. परंतु, आता मात्र काही नेते काँग्रेसच्या यात्रांत सहभागी होत आहेत. यावरून या नेत्यांनी आरजीपीची परिस्थिती काय करून ठेवली आहे, हे लक्षात येते, असे म्हणत परब यांनी बोरकर यांना लक्ष्य केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.