जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी या तीन पक्षांच्या आघाडीची घोषणा झाल्यानंतरच तिन्ही पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करतील, असे सर्वांनाच वाटत होते. पण, आघाडीवर शिक्कामोर्तब न होताच काँग्रेसने अकरा उमेदवारांच्या नावांची यादी मंगळवारी जारी केली. काँग्रेसच्या या निर्णयामुळे आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे काहीच दिवसांपूर्वी मनोज परब आणि आरजीपी आमदार वीरेश बोरकर यांनी दिल्लीत जाऊन आपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस, गोवा फॉरवर्डला सोडून मनोज ‘आप’सोबत जाणार? युतीतील मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला साथ देणार? की स्वत:ची वेगळी चूल मांडणार? या प्रश्नांच्या उत्तरांची जनतेला प्रतीक्षा आहे. ∙∙∙
पूजा नाईक हिने आरोप करून मध्यंतरी खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी पैसे घेतलेल्या संबंधितांवर कायदेशीर कारवाईची भाषा तिच्या तोंडी होती. आता पोलिस तपासानंतर तिनेच हा सारा नोकरीच्या काळ्याबाजाराचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. तिने तशा पैशांतून घेतलेल्या मालमत्तेतून पैसे बुडालेल्यांचे पैसे परत देण्यासाठी पोलिस प्रयत्न करू लागले आहेत. पूजा हिने याआधी ८० जणांना या पद्धतीने नोकरी दिल्याचा दावा केला होता. तिने बनाव रचला तर या नोकऱ्या कशा मिळाल्या, हा प्रश्न आहेच. पूजा हिला खोटे ठरवले जाणार, अशी चर्चा होती त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. ∙∙∙
मडगाव पालिका क्षेत्रात कर न भरता व्यवसाय करणारे काही महाठग आहेत. नगराध्यक्ष दामू शिरोडकर यांनी अशा व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा देताना, वेळप्रसंगी या दुकानांना टाळे ठोकू, असे सुनावले आहे. या इशाऱ्याचे स्वागत होत असताना, खरोखरीच करवाई होईल का, हाही प्रश्न आहे. कारण असे व्यापार करणाऱ्यांचे हात वरपर्यंत पोहोचलेले असतात, त्यामुळे ‘वॉर्निंग’ देणे वेगळे व प्रत्यक्षात कारवाई करणे वेगळे असते. आता बघूया दामू पुढे कुठले पाऊल उचलतात ते! ∙∙∙
‘कॅश फॉर जॉब'' प्रकरणातील मुख्य संशयित पूजा नाईकने वर्षभराने या प्रकरणाला वाचा फोडली होती. तिने आयएएस अधिकारी निखिल देसाई, सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान कार्यकारी अभियंता उत्तम पार्सेकर आणि मंत्री सुदिन ढवळीकर यांची जाहीरपणे नावे घेतली आणि राज्यभरात खळबळ उडवून दिली. त्यामुळे हे प्रकरण या तिघांनाही शेकणार, असे सामान्यांना वाटणे साहजिकच आहे. परंतु या प्रकरणात ही मंडळी सहिसलामत बाहेर येणार, असेही ठामपणे त्यांचे समर्थक सांगत होते ते सरकारी यंत्रणा हातात असल्यानेच. भाजप काही केले तरी आपल्या मंत्रिमंडळातील नेत्याचा, अधिकाऱ्याचा बळी देणार नाही, त्याला बरेच कांगोरे आहेत. परंतु जेव्हा हे प्रकरण गुन्हे शाखेकडे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सोपविले होते, त्यातून काहीतरी बाहेर येणे आवश्यक होते, पण या सर्वांनाच ‘क्लिनचीट’ देऊन या शाखेने काखा वर केल्या आहेत. तपासाच्या झंजटमध्ये न पडता सरकार सांगेल तसे वागायचे, हे धोरण त्यांनी स्वीकारल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे गुन्हे शाखेने एक प्रकारे या प्रकरणात सरकारला पूर्णपणे ‘सुरक्षित'' ठेवण्याचेच काम केले आहे. ∙∙∙
दोन महिन्यांवर महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे. पणजीत महानगरपालिकेत बाबूश मोन्सेरात यांची सत्ता कायम राहिली आहे. आता ते भाजपात असले तरी त्यांनी ती पकड कायम ठेवली आहे. महानगरपालिकेत बाबूश यांच्या गटाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी सध्या अनेक माजी नगरसेवकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याशिवाय मध्यंतरी महानगरपालिकेत विरोधी बाकावर बसणारे पण पडद्याड संगत बांधून असणाऱ्या उदय मडकईकरांनी आपण बाबूश यांच्याबरोबरच असल्याचे सांगणे, म्हणजे ‘मिले सूर मेरा तुम्हारा‘ असाच हा प्रकार वाटतो. गेल्या विधानसभेत ताळगावातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात जे होते, ते सर्व अंतर्गत बाबूश यांच्याच छावणीतील प्यादी असल्याचे काही लपून राहिले नाही. त्यामुळे मडकईकर असो, नागेश करीशेट्टी किंवा दया कारापूरकर असो यांचा पत्ता बाबूश यांच्याशिवाय हलणार नाही, हेही त्रिकालाबाधित सत्यच. मडकईकर यांना मुलाला उमेदवारी मिळवून द्यायची आहे, त्यामुळे सध्यातरी हम साथ-साथ है म्हणायला काहीच हरकत नसावी. ∙∙∙
काही दिवसांपूर्वी इजिदोर फर्नांडिस यांना पक्षात घेतल्याने गोवा फॉरवर्डला मित्र पक्षांकडून रोष पत्करावा लागला. आज तर या पक्षाने चिंचोणे देवसुवाचे सरपंच फ्रॅंक व्हिएगस यांची पक्षातून हकालपट्टी करून गोवा फॉरवर्डचे नेते धाडसी निर्णयही घेऊ शकतात हे दाखवून दिल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटू लागल्या आहेत. फ्रॅंक व्हिएगस यांना वेळ्ळीत चांगले महत्व आहे. शिवाय ते खलाशी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे खलाशांचे प्रश्न सोडवताना ‘एनआरआय’ कमिशनर व भाजपचे प्रदेश सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांच्याशी दोस्ती जडली असावी. नाही तर सरपंच असताना एकदम जिल्हा पंचायत निवडणूक अपक्ष लढण्याची प्रेरणा त्यांना झाली नसती. वेळ्ळीत गोवा फॉरवर्ड कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे. फ्रॅंक हे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार झाले असते. त्यामुळे गोवा फॉरवर्डने घेतलेला हा धाडसी निर्णय, अशी चर्चा सुरू झाली आहे. वेळ्ळी गावात भाजपला काहीच स्थान नाही. त्यामुळे भाजपच्या उघड किंवा अप्रत्यक्ष पाठिंब्यावर फ्रॅंकने निवडणूक लढवली तर लोकप्रिय असूनही लोक त्याला किती पाठिंबा देतात, हेही पहावे लागेल. गोवा फॉरवर्ड त्यांना याच मुद्द्यावरुन खाली खेचण्याचा प्रयत्न नक्की करेल, अशीही चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (पीडब्ल्यूडी) मंत्रिपदाचा ताबा घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत मंत्री दिगंबर कामत मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणाबाबत तारखांवर तारखा देत आहेत. त्यांनी दिलेल्या तारखा ओलांडून गेल्या, तरीही अनेक भागांतील रस्ते जसेच्या तसे आहेत. मंगळवारी कामत यांनी जनतेला शनिवारची ‘डेडलाईन’ दिली. शनिवारनंतर मुख्य रस्त्यांवर एकही खड्डा दिसल्यास आपल्याला फोन करा किंवा फोटो पाठवा, असे आवाहनही त्यांनी केले. पण, कामत यांनी दिलेली ‘डेडलाईन’ येत्या शनिवारची की पुढच्या काळातील शनिवारची? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ∙∙∙
सांकवाळ येथील बेकायदेशीर ‘स्क्रॅपयार्ड’ला दोनदा आग लागली. तरी प्राणहानी झाली नाही, हे देवाचेच उपकार म्हणा. आता या प्रसंगानंतर सांकवाळ पंचायत जागी झाली आहे. म्हणे यापुढे बेकायदेशीर ‘स्क्रॅपयार्ड’ परिसरात होऊ देणार नाहीत. ज्या ‘स्क्रॅपयार्ड’ला आग लागली त्यांना कोणी परवानगी दिली. किंवा हे ‘स्क्रॅपयार्ड’ कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत. तेव्हा पंचायतीने डोळे झाकले होते का? हे प्रश्न कोणाच्याही मनात येणे साहजिकच. या पुढे बेकायदेशीर स्क्रॅपयार्ड उभे होऊ देणार नाही, अशी जी घोषणा करण्यात आली आहे, त्यावर कोणी विश्र्वास ठेवेल का? या पंचायत क्षेत्रात कित्येक बेकायदेशीर धंदे, व्यवसाय, भू रुपांतरण, वाढत्या झोपडपट्ट्या चालूच आहेत. त्यांना आवर घालण्याचे धाडस पंचायत दाखवेल का, असा प्रश्न केला जात आहे.∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.