

‘जो जिता वही सिकंदर’ असे म्हणतात ते खरे. विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव व केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्या पुढे आता त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या जिल्हा पंचायत मतदारसंघात काँग्रेस समर्थक ‘झेडपी’ निवडून आणण्याचे मोठे आव्हान आहे. युरी आलेमाव यांना गिरदोली जिल्हा पंचायत व कुडतरी जिल्हा पंचायतीच्या भाग लागतो. या दोन्ही पंचायतीत ‘झेडपी’ निवडून आणण्याचे दिव्य युरीला करावे लागणार आहे. सध्या दोन्ही ‘झेडपी’ गैरकाँग्रेसी आहेत. एल्टन यांना फातर्पा व खोला हे दोन झेडपी मतदारसंघ लागतात. या दोन्ही मतदान संघात विद्यमान ‘झेडपी’ बाबू समर्थक होते. आता एल्टन ने आपली शक्ती सिद्ध करून दाखविण्यासाठी दोन्ही ‘झेडपी’ निवडून आणावे लागणार आहेत. ज्या गतीने व ज्या उमेदीने काँग्रेस पक्षाने ‘झेडपी’ निवडणूक घेतली आहे, ते पाहता युरी व एल्टन यांना जिल्हा पंचायतीचे आव्हान पेलण्यासाठी बरेच श्रम घ्यावे लागणार. ∙∙∙
दिगंबर कामत हे भाजपात आल्यानंतर त्यांना कुणाचा विरोध असणार नाही असे एक गृहितक मांडले जात होते. पण आता मडगावात दिगंबर कामत यांना विरोधही होऊ लागला आहे आणि या विरोधकांमध्ये भाजपचेच जुने कार्यकर्ते सामील आहेत. मडगाव भाजप मंडळाचे माजी अध्यक्ष चंदन नायक हे त्यापैकीच एक. साध्या दिगंबर कामत यांच्या विरोधात समाजमाध्यमांवर अगदी तिरके कॉमेंट टाकणाऱ्यात चंदनचा क्रमांक बराच वरचा आहे. काल त्यांनी आपल्या फेसबुकवर ''राग येता, फुगार जाता , तर भितर कित्याक आयलो?'' अशी पोस्ट टाकली आहे. त्यात कुणाचे नाव नसले तरी चंदनरावांनी बाण कुणावर सोडला आहे ते सर्वांना कळते. येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मडगाव मधील भाजपात हेच वातावरण असेल की त्यात काही बदल होईल ते पहावे लागणार आहे? ∙∙∙
‘आप’ने तीन, तर भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आपण निवडणुकांकडे किती गांभीर्याने बघतो हे दाखवून दिले. आपने तर अनेक दिवसांपूर्वीच उमेदवार निश्चित करून त्यांचा प्रचारही सुरू केला. गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी या दोन पक्षांनी युतीचा निर्णय न झाल्याने उमेदवारांची घोषणा केलेली नाही. पण, त्यांचा प्रचार मात्र सुरू केला आहे. यात प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस मात्र नेहमीप्रमाणेच मागे राहिलेला आहे. युतीचा निर्णय न झाल्याने उमेदवारांची नावे घोषित केली नाहीत, असे प्रदेश काँग्रेसचे प्रमुख नेते सांगत आहेत. अर्ज भरण्यास सुरुवात झाली तरी युतीच्या चर्चा सुरूच असल्याचेही ते म्हणत आहेत. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात काँग्रेस गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीशी युती करून ‘आप’ नेत्या आतिषी यांचा ‘इतर पक्षांना युतीसाठी शेवटपर्यंत तळमळत ठेवून काँग्रेस जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेते’ हा दावा सिद्ध करून दाखवणार का? याकडे तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. ∙∙∙
बोलणे सोपे असते, मात्र प्रत्यक्षात काम करणे कठीण असते. हे सत्य राज्यातील काँग्रेस नेत्यांना अजून उमगले नसावे. काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते विरोधकांचे हात हातात धरून एक असल्याचे खोटे चित्र दाखविण्यातच धन्यता मानत असावेत. पक्षाचे प्रमुख नेते विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी राज्यात ‘ग्रँड ऑपोजीशन अलायन्स’ (गोवा) ची घोषणा केली होती. जिल्हा पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या, अर्ज भरण्यास सुरवात झाली. मात्र काँग्रेस पक्षाला युती साठी मुहूर्त मिळत नाही व स्वतःचे उमेदवार घोषित करण्याची धमकही दिसत नाही. आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड या विरोधी पक्षांनी व सत्ताधारी भाजपने जिल्हा निवडणुकीच्या कामास धडाक्यात सुरुवात केली आहे. भाजपाने आपले उमेदवार जाहीर केल्यावर काँग्रेस पक्ष तातडीने आपले उमेदवार जाहीर करणार, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला होता. कदाचित काँग्रेस योग्य मुहूर्ताची वाट पहात असावी. काँग्रेसला आपल्या मर्यादा माहीत असाव्यात, म्हणून काँग्रेस झेडपी निवडणुकीत उमेदवार उतरविण्यात घाबरत असावे, अशा प्रतिक्रिया आता सोशल मीडियात उमटू लागल्या आहेत. ∙∙∙
‘काही मिळविण्यासाठी काही गमवावे लागते’ अशा आशयाची हिंदीत एक म्हण आहे. गोव्यातील बहुतांश सरकारी कर्मचारी व अधिकारी ‘एसआयआर’ म्हणजे मतदार यादी दुरुस्ती मोहीम व जिल्हा पंचायत निवडणूक कामात व्यग्र आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच राज्यातील अनुदानित शाळांतील कर्मचारीही या कामात गुंतल्यामुळे राज्यातील व्यवस्थापकीय कामांना ब्रेक लागला आहे. कोणत्याही कार्यालयात कामाची फाईल पुढे सरकत नाही. कोणत्याच प्रकारचे दाखले व इतर सरकारी दस्तावेज मिळत नाहीत. कोणत्याही कार्यालयात गेल्यास साहेब निवडून ड्युटीवर क्लार्क ‘एसआयआर’ ड्युटीवर, अशी उत्तरे ऐकायला मिळतात. डिसेंबर महिन्यात सरकारी कार्यालयात रोजच्या कामास सुटी असणार, हे मात्र निश्चित. ∙∙∙
मद्यधुंद अवस्थेत आपण बस चालवू शकतो, याचा त्याला पूर्ण आत्मविश्वास होता. याआधी कितीतरी वेळा त्याने तसे केलेही असावे. सोमवारी मात्र पिलार येथे खासगी बस, कदंब-ईव्ही बसला धडकली आणि त्याची पोलखोल झाली. त्याला बसमधून खाली उतरता येईना. प्रवाशांना काय झाले त्याची कल्पना आली. कोणीतरी हळूच पोलिसांना फोन केला. पोलिसही आले आणि मद्यधुंद चालकाची धुंदी उतरली. तो गयावया करू लागला पण कारवाई थांबली नाही आणि त्याला मद्यपान करून बस चालवत अनेकांचे जीव धोक्यात घातल्याचा पश्चाताप करण्याची संधीही मिळाली नाही. ∙∙∙
पर्यटन हंगाम रंगात आला आहे; राज्यात परदेशी व देशांतर्गत पर्यटकांची गर्दी वाढत असताना किनारी भागांत पर्यटकांची सतावणूक होत असल्याच्या चर्चेला देखील ऊत येत आहे. काहीजण हातात ‘क्युआर कोड’ घेऊनच किनाऱ्यावर फिरतात आणि पर्यटकांकडून थेट मोबाईलवर पैसे मागतात, अशी चर्चा सध्या गाजत आहे. ही सतावणूक कशासाठी, कोणाच्या निर्देशावरून आणि पैसे नेमके कुठे जातात, याबद्दल स्थानिकांत मोठी उत्सुकता अन् शंका निर्माण झाली आहे. काही विदेशी पर्यटकही या साखळीमध्ये सहभागी होऊन पैशांची मागणी करत असल्याचे नागरिक सांगत आहेत. तसा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे वातावरण बिघडत असल्याने लोक स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत आहेत. किनाऱ्यावर फिरणाऱ्या या ‘क्युआर-स्कॅम’वर तातडीने कारवाई करा, अशी जोरदार मागणी सध्या चर्चेतून पुढे येत आहे. ∙∙∙
क्रीडामंत्री रमेश तवडकर हे फिडे विश्व करंडक बुद्धिबळ स्पर्धेच्या लोगो अनावरण सोहळ्यास उपस्थित होते. त्यानंतर ते त्या स्पर्धेच्या ठिकाणी फिरकले नसल्याने तो विषय चर्चेत आला आहे. ते या स्पर्धेवर का रागावले असतील, याची वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. त्यातील खरे कारण कोणते असावे याचाही अंदाज लावला जात आहे. त्या स्पर्धेच्या ठिकाणी फिरकू नका, अशी सूचना त्यांना कोणत्या उच्चपदस्थाने केली आहे का, असाही विषय खासगीत काहींनी चर्चेत आणला आहे. एवढी मोठी स्पर्धा राज्यात होताना क्रीडामंत्र्यांनी त्यात रस न घेण्याची ‘दखल’ अशा पद्धतीने घेतली गेली. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.