Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; महेश मांजरेकरांचा गोवा

Khari Kujbuj Political Satire: गेल्‍या काही महिन्‍यांत राज्‍यात घडलेले दरोडे, खून, पर्यटकांना मारहाण अशा घटनांमुळे विरोधी आमदारांनी कायदा–सुव्‍यवस्‍थेवर प्रश्‍‍नचिन्‍ह उपस्‍थित केले.

गोमन्तक डिजिटल टीम

महेश मांजरेकरांचा गोवा

अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर अलिकडे पर्वरीत दिसू लागले आहेत. ते गोव्यात का असावेत, याचे कुतूहल अनेकांना होते. अखेर एका समाजमाध्यमावरील पोस्टने ते गोव्यात का, याची पोलखोल केली. त्या पोस्टनुसार महेश यांची लेक अश्वामी ही हॉटेल व्यावसायिक आहे. अश्वामीचं कळंगुटमध्ये 'आमची' नावाने रेस्टॉरंट आहे. स्वतः अश्वामीला महेश मांजरेकर यांच्याप्रमाणे जेवण बनवण्याची आवड आहे. त्याचमुळे महेश मांजरेकर अलिकडे गोव्यात वारंवार दिसू लागले आहेत. ∙∙∙

पुन्‍हा ‘तसेच’ होणार?

गेल्‍या काही महिन्‍यांत राज्‍यात घडलेले दरोडे, खून, पर्यटकांना मारहाण अशा घटनांमुळे विरोधी आमदारांनी कायदा–सुव्‍यवस्‍थेवर प्रश्‍‍नचिन्‍ह उपस्‍थित केले. राज्‍यातील गुन्‍हेगारीवर नियंत्रण आणण्‍यात अपयश येत असल्‍याचा ठपकाही त्‍यांनी सरकार आणि पोलिसांवर फोडला. त्‍यामुळे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी रात्री पोलिस महासंचालक अलोक कुमार यांच्‍यासह महानिरीक्षक, दोन्‍ही अधीक्षक तसेच निरीक्षकांची उच्चस्‍तरीय बैठक घेत त्‍यांना वाढत्‍या गुन्‍हेगारीवर नियंत्रण आणण्‍याचे आदेश दिले. त्‍यामुळे पोलिसांनी बैठक संपताच रात्रीची गस्‍त वाढवली. सराईत गुन्‍हेगारांवर पाळत ठेवण्‍यास सुरुवात केली आहे. याआधीही अशा घटना घडल्‍या की पोलिसांना जाग येते. चार–आठ दिवस ते दिवस–रात्र सक्रिय होतात. पण, त्‍यानंतर त्‍यांचे ‘ये रे माझ्‍या मागल्‍या’ सुरू होते. यावेळी तरी तसे होणार नाही ना? असा प्रश्‍‍न स्‍थानिकांना पडला आहे. ∙∙∙

मायकल लागले कामाला

गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मायकल लोबो यांनी कळंगुटवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांना सोबत घेऊन एक बैठक घेत कळंगुटमधील विकासकामांचा आढावा घेतला. विकासकामे मागे पडण्याची कारणे जाणून घेत ती पूर्ण करण्यासाठी गती देण्यासाठी काय करावे लागेल, हेही समजून घेतले आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने लोबो यांना आता कळंगुटमध्ये लक्ष द्यावे लागणारच होते. ते आता सरकारवर टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कामाला लागल्याचे दिसून येत आहे. ∙∙∙

दया गावकरला काँग्रेसची बस चुकली ?

‘काही मिळविण्यासाठी काही गमवावे लागते’ म्हणतात, त्याप्रमाणे गोवा फॉरवर्ड व आरजी पक्षाकडे सोयरिक जुळवण्यासाठी काँग्रेस पक्ष ‘झेडपी’च्या निवडणुकीत उतरण्यासाठी इच्छुक असलेल्यांना पक्ष प्रवेश नाकारत असल्याचे चित्र दिसत आहे. मांद्रे पंचायतीचे माजी सरपंच अमित सावंत व त्याच्या पत्नीला काँग्रेस पक्षात प्रवेश दिल्या नंतर ही गोवा फॉरवर्ड पक्षाने विरोध केल्याने अमित यांचा पक्ष प्रवेश रद्द झाला.आता काणकोण मतदार संघातील अनुसूचित जमातीचे नेते दया गावकर हे पैंगीण जिल्हा पंचायत मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणुकीत उतरण्यास इच्छुक होते. त्यांना काँग्रेस पक्षाने पक्षात आणण्यासाठी फिल्डिंग लावून आमंत्रण ही दिले होते. मात्र, इजिदोर फर्नांडिस यांना गोवा फॉरवर्ड पक्षाने प्रवेश दिल्यामुळे व गोवा फॉरवर्ड पक्षाने पैंगीण मतदारसंघात ‘झेडपी’ उमेदवार ‘शॉर्ट लिस्ट’ केल्यामुळे दया गावकर याचा काँग्रेस प्रवेश रोखण्यात आला. आता दया काँग्रेस सोडून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरणार. काँग्रेस पक्षाचे युरी युतीसाठी जो त्याग करा म्हणतात, त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला होतो की, इतरांना हे पुढे कळेलच! ∙∙∙

काँग्रेस आहे कुठे ?

‘अंडे घालण्याची वेळ आली, की कोंबडी जागा शोधते’ अशा आशयाची ग्रामीण भागात एक म्हण आहे. काँग्रेस पक्षाला ही म्हण लागू पडते. विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी ‘नवी सुरवात’ ची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष सत्तेवर येण्यासाठी व आपली राजकीय स्थिती सुधारण्यासाठी गंभीर असल्याचे चित्र मात्र दिसत नाही. जिल्हा पंचायत निवडणुका जवळ आल्या. आम आदमी पक्षाने आपले उमेदवार घोषित केले. भाजपाने उमेदवारांची यादी म्हणे तयार ठेवली असून त्यांचे संभावित उमेदवार कामाला लागले आहेत. काँग्रेस पक्षाने मात्र अद्याप ‘झेडपी’ निवडणुकीची तयारी केल्याचे दिसत नाही. काँग्रेस पक्ष म्हणे भाजपची यादी जाहीर होण्याची वाट पाहत आहे. काँग्रेस बरोबर युती करण्याच्या तयारीत असलेल्या पक्षांनीही आपले उमेदवार तयार ठेवले आहेत. भाजप, आम आदमी पक्ष व गोवा फॉरवर्ड ज्याप्रमाणे ‘झेडपी’ निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत, तशी तयारी काँग्रेस गोटात दिसत नाही. युरीबाब केवळ घोषणा करून चालत नाही, युद्ध जिंकण्यासाठी रणभूमीत उतरावे लागते. ‘दर्यात आसा मासो आनी मोल करता पिसो’ ही म्हण आपण ऐकलीच असणार! ∙∙∙

उद्‍घाटन इफ्फीचे? की...!

जगभरात प्रसिद्ध असलेल्‍या आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवाचा (इफ्‍फी) उद्‍घाटन सोहळा यंदा प्रथम डॉ. श्‍‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्‍टेडियमवर न घेता पणजीतील जुन्‍या गोमेकॉच्‍या इमारतीबाहेर खुल्‍या जागेत आयोजित करण्‍यात आला. उद्‍घाटनासाठी थाटलेल्‍या भव्‍य मंचावर ९० टक्‍के राजकारणी आणि १० टक्‍के कलाकार उपस्‍थित होते. उद्‍घाटन सोहळ्यात मान्‍यवरांनी जी भाषणे केली, त्‍यांनाही चित्रपट कमी आणि राजकारणाचाच ‘वास’ अधिक दरवळत असल्‍याचे जाणवले. त्‍यामुळे हे उद्‍घाटन आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवाचे होते की राजकारणाशी संबंधित एखाद्या कार्यक्रमाचे? असा प्रश्‍‍न उपस्‍थितांमधून विचारला जात होता. ∙∙∙

मडगाव रवींद्र भवनाची काय दुरुस्ती केली?

करोडो रुपये खर्चून ही जर एखाद्या इमारतीची दुरुस्ती पूर्ण झाली नाही, तर लोक प्रश्न करणारच. मडगाव रवींद्र भवन सभागृहाची दुरुस्ती करण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी सरकारने लाखो रुपये खर्च केले. नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणही करण्यात आले. रवींद्र भवनाच्या अध्यक्षांनी व सरकारने रवींद्र भवनाचे धड दुरुस्त केले, मात्र चेहरा तसाच कुरूप ठेवल्याची टीका आता कलाकार व प्रेक्षक रवींद्र भवनाचा बाहेरील भाग पाहून करीत आहेत. रवींद्र भवनात आत शिरल्यावर प्रथम नजर पडते ती रंग गेलेल्या व चिखल माखलेल्या प्रवेश गॅलरीवर. रवींद्र भवनाच्या कॅन्टीनच्या उजव्या बाजूच्या भिंती पाहिल्यावर ही इमारत कला भवन असलेल्या व करोडो रुपये खर्च केलेल्या रवींद्र भवनाचीच आहे , असे म्हणण्याचे धाडस कोणी करणार नाही. जर सरकारने एवढा खर्च केलाच होता, तर संपूर्ण दुरुस्ती करायला काय हरकत होती? तालक साहेब ,‘बिट्स ॲन्ड पिसेस’ पद्धतीने काम केल्यावर टीका होणारच ना? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Captain: 'मिस्टर 360' च्या हाती कमान! सूर्यकुमार यादव करणार मुंबई संघाचे नेतृत्व

NEET PG Goa: गोव्यात पहिला, तर भारतात 212 वा क्रमांक! आंजनेयने उंचावली ‘गोमेकॉ’ची प्रतिष्ठा; नीट-पीजी परीक्षेत दैदिप्यमान यश

Goa Police Meeting: 'पोलिसांकडूनच लपविले जातात गुन्हे'! बैठकीत CM सावंतांनी सुनावले खडे बोल; बेफिकीरीबद्दलही केली नाराजी व्यक्त

Goa Live Updates: नावेलीत दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण

मडगावात दाखल होणार 'राम दिग्विजय रथयात्रा'! पर्तगाळ मठाच्या वर्धापन वर्षानिमित्त होणार आगमन; कुठे घ्याल दर्शन? वाचा माहिती

SCROLL FOR NEXT