Madhukar Zende Charles Sobhraj Dainik Gomantak
गोवा

Inspector Zende: साल 1986 ! चार्ल्स शोभराजला गोव्यात पकडले, पोलीस अधिकारी झेंडेंची गोष्ट; मनोज वाजपेयी साकारणार मुख्य भूमिका

Madhukar Zende Charles Sobhraj: मधुकर झेंडे यांनी 1986 यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुख्यात चार्ल्स शोभराज या गुन्हेगाराला गोव्यातील ‘ओ कोकेरो’ या हॉटेलमध्ये पकडले आणि लोकांना शोभराज ठाऊक झाला.

Sameer Panditrao

मुंबईचे पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांनी 1986 यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुख्यात चार्ल्स शोभराज या गुन्हेगाराला गोव्यातील ‘ओ कोकेरो’ या हॉटेलमध्ये पकडले आणि गोव्यातील लोकांना चार्ल्स शोभराज ठाऊक झाला. त्याचबरोबर पोलीस अधिकारी मधुकर झेंडे आणि ‘ओ कोकेरो’ हे रेस्टॉरंटही जगभर प्रसिद्ध झाले.

या रेस्टॉरंटमध्ये त्यानंतर मधुकर झेंडे यांच्या सन्मानार्थ 'झेंडे प्लेटर'ही सुरू झाली. त्यानंतर दशकभर मधुकर झेंडे आणि चार्ल्स शोभराज यांची चर्चा गोव्यात सुरूच राहिली होती.‌ पर्वरीच्या रस्त्यावरून येता जाता लोकांचे लक्षही ‘ओ कोकेरो’कडे आपसूकच वळायला लागले होते. 

त्या जुन्या प्रकरणाची चर्चा नेटफ्लिक्सवर लवकरच येणाऱ्या मधुकर झेंडे या सिनेमामुळे पुन्हा होऊ लागली आहे. या सिनेमातील काही भागाचे चित्रणही गोव्यात झाले आहे.  5 सप्टेंबर रोजी हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

मुंबई पोलीस आणि एक आंतरराष्ट्रीय  स्तरावरील गुन्हेगार यांच्यामधील एकेकाळचे हे प्रकरण गंभीर असले तरी सिनेमा मात्र विनोदी आणि मनोरंजक शैलीने सादर होणार आहे.‌

याबद्दल दै. गोमन्तकच्या प्रतिनिधीशी बोलताना या सिनेमाचे दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर म्हणाले, 'बिकिनी किलर या नामाने ओळखला जाणाऱ्या एका भयंकर अशा गुन्हेगाराला पकडायला मुंबई पोलिसांनी त्याकाळात जी मोहीम आखली होती तिचे स्वरूप पाहता 'अॅब्सर्ड' असेच तिथे वर्णन करावे लागेल.

पोलिसांकडे त्यावेळी शस्त्रेही नव्हती, पोलीस पहिल्यांदाच विमानातून प्रवास करत होते. अशा विसंगतीतून जो विनोद निर्माण होतो तोच आम्ही या सिनेमात दाखवला आहे. मुद्दाम विनोदासाठी विनोद पेरायचा प्रयत्न आम्ही या सिनेमात कुठेही केलेला नाही.

ज्यावेळी मधुकर झेंडे यांनी चार्ल्स शोभराजला गोव्यात पकडले, तेव्हा तिथे लग्नाचे रिसेप्शन चालू होते. रिसेप्शनमधील मंडळींनी त्यानंतर पोलिसांबरोबर फोटो काढून घेतले.‌ ही विसंगत आणि हसू येणारी गोष्ट नाही आहे का?'

ड्रग्स, माफिया, गुन्हेगार, पोलीस हे सारे घटक एकत्र आल्यामुळे गोव्याची प्रतिमा सिनेमातून पुन्हा कशी काही दिसेल याबद्दलच्या शंकेचे निरसन करताना चिन्मय मांडलेकर म्हणाले, 'सामान्यतः गोव्याची जी चुकीची प्रतिमा गोव्याबाहेरच्या लोकांच्या मनात आहे त्याबद्दल मला कल्पना आहे मात्र मला खरा गोवा ठाऊक आहे.

तिथल्या समृद्ध परंपरांची मला ओळख असल्याने 'गोवा' या घटकाचा उपयोग चुकीच्या तऱ्हेने करून घेण्याचा विचारही दिग्दर्शक या नात्याने माझ्या मनात आला नाही. कथेच्या अनुषंगाने जो गोवा चित्रपटात यायला हवा तितकाच तो आला आहे.'

प्रसिद्ध हास्य अभिनेते भाऊ कदम यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या भूमिकेबद्दल सांगताना ते म्हणतात, 'या चित्रपटातील विनोदी प्रसंग हे ओढून ताणून आणलेले नाही तर ते घटनाप्रधान आहेत त्यामुळे माझ्यासाठी ही वेगळी भूमिका होती. हसत हसत एक गंभीर प्रकरण सांगितले गेल्यामुळे हा चित्रपट लोकांना बघावासा वाटेल असे मला नक्कीच वाटते.' 

या चित्रपटात पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांची व्यक्तिरेखा करणारे प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांनीही गोव्याबद्दल यावेळी आपले विचार प्रकट केले. ते म्हणाले, 'मी दर सहा महिन्यांनी माझ्या कुटुंबाबरोबर गोव्यात येतो मात्र ज्या जाग्यांवर पर्यटक सर्वात जास्त जातात त्या जागांवर जाण्यापेक्षा गोव्यातील अपरिचित ठिकाणी जाणे मी अधिक पसंत करतो.

त्यामुळे गोव्याची सांस्कृतिक समृद्धता मी जाणून आहे. गोव्यातील लोक फार शांत प्रवृत्तीचे आहेत. गोव्याबद्दल ज्या (चुकीच्या) समजुती आहेत त्यापेक्षा मला गोवा वेगळा वाटतो. मात्र ज्या प्रकारे सध्या गोव्यात  कॉंक्रिटीकरण सुरू आहे त्यावर निर्बंध येऊन मूळ गोमंतकीय संस्कृतीचे संवर्धन होईल असेच प्रयत्न झाले पाहिजेत.  

मधुकर झेंडे हा चित्रपट क्राईम कॉमेडी प्रकाराचा आहे असे आम्ही म्हणू शकतो. मधुकर झेंडे हे या चित्रपटाचे नाव असले तरी तो त्यांचा चरित्रपट नाही. त्यांच्या आयुष्यातील 'चार्ल्स शोभराज' हे रोमांचक प्रकरणच या चित्रपटाचे केंद्र आहे. गोमंतकीय प्रेक्षकांनी आवर्जून हा चित्रपट पहावा असे मी म्हणेन.

- दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Railway Project: 'गोवा कोल हब बनणार नाही...'; रेल्वे दुहेरीकरणावरुन मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही, पण वाद कायम

High Court: गोवा सरकारला मोठा झटका; वैद्यकीय, दंत महाविद्यालयातील Sports Quota रद्द

Sara Tendulkar Goa Vacation: सारा तेंडुलकरचे गोवा व्हेकेशनचे फोटो व्हायरल! मिस्ट्री मॅनसोबतच्या जवळीकतेने सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कोण आहे तो?

Goa News: गोव्यात सरकारी कर्मचारी अजूनही Holiday च्या मूडमध्ये; जनतेची कामे ठप्प

Viral Video: 'पूर नव्हे, अल्लाहचा आशीर्वाद'! पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा पूरग्रस्तांना अजब सल्ला; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT