मंगेश बोरकर
सासष्टी, नुवे हा गोव्यातील अल्पसंख्याक मतदारांचा सर्वाधिक जास्त पकड असलेला मतदारसंघ. या मतदारसंघात काँग्रेसशिवाय दुसरा पर्यायच मतदारांच्या मनाला शिवत नाही. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे.
काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आलेक्स सिक्वेरा हे आता भाजपवासी होऊन मंत्रीसुद्धा बनले आहेत. सरकारच्या सर्व योजना ते लोकांपर्यत पोहोचवत आहेत. शिवाय त्यांनी एसटी समाजाच्या अनेक युवकांना अल्पावधीतच सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत.
शिवाय जे कोण कंत्राटी पद्धतीवर नोकरीत होते, त्यांना कायम केले आहे. त्यामुळे नुवे मतदारसंघातील लोक मंत्री आलेक्स यांच्या पूर्ण पाठीशी आहेत.
दुसरी गोष्ट भाजपच्या उमेदवार असलेल्या पल्लवी धेंपे या उद्योगपती तथा फुटबॉलप्रेमी श्रीनिवास (बाबा) धेंपे यांच्या पत्नी आहेत. नुवे मतदारसंघात बाबाविषयी आत्मियता, प्रेम आहे. कारण त्यांनी यापूर्वी या मतदारसंघातील कित्येकाची कामे केलेली आहेत.
त्यांनी येथील नागरिकांशी संपर्क अभियानही सुरू केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्ष न पाहता व्यक्ती म्हणून मतदान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नुवे मतदारसंघात ८८ टक्के लोक अल्पसंख्याक म्हणजे ख्रिश्चन, १० टक्के हिंदू व २ टक्के इतर समाजातील लोक आहेत. एकूण २८,३७४ मतदार या मतदारसंघात आहेत. त्यात १५,३४२ पुरूष मतदार व १३,०३२ महिला मतदार आहेत. महिला म्हणून पल्लवी धेंपे यांना महिलांची मते पडण्याची शक्यता जास्त आहे.
गत विधानसभा निवडणुकीत भाजपला नुवे मतदारसंघातून केवळ ५६९ मते पडली होती. आलेक्स सिक्वेरा, जे काँग्रेसच्या तिकिटावर लढले होते, त्यांना ८४५६ मते मिळाली होती. ‘आरजी’ला ४३४८, राष्ट्रवादी काँग्रेसला २०७३, अपक्ष उमेदवाराला २९६१ मते प्राप्त झाली होती.
अन्य ती जी ३ हजार मते इतरत्र वळली होती, ती सर्व काँग्रेसचीच होती. २०१४ साली जेव्हा दक्षिण गोव्यात भाजपचे ॲड. नरेंद्र सावईकर निवडून आले होते, तेव्हा त्यांना ६७०० मते पडली होती. पण मिकी पाशेको हे त्यावेळी भाजपबरोबर होते, हे विसरून चालणार नाही.
श्रीनिवास धेंपे यांच्याबाबत लोकांमध्ये आस्था
१ नुवे येथील काँग्रेसचे नेते पॉसिलिप दोरादो यांनी सांगितले की, काँग्रेसने दिलेला उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस हे नवखे आहेत. समाजकार्यकर्ता असणे व राजकारणी असणे वेगळे. शिवाय गिरीश चोडणकर व फ्रान्सिस सार्दिन यांना उमेदवारी नाकारल्याने पक्षात तीन ते चार गट पडले आहेत. त्याचा परिणाम या निवडणुकीवर होऊ शकतो.
२ दुसरीकडे नुवेत श्रीनिवास धेंपे यांच्या वावराचा परिणामही होणार आहे. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये आस्था आहे. समाजातील सर्व लोकांकडे त्यांचा संपर्क आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसचा असूनही यावेळी भाजपला मुसंडी मारण्याची संधी प्राप्त होऊ शकते, असेही दोरादो म्हणाले.
मी भाजपमध्ये आल्यापासून नुवे मतदारसंघात यापूर्वी झाली नव्हती एवढी विकासकामे झाली आहेत. सरकारने कधीही या मतदारसंघाकडे भेदभावाच्या नजरेने पाहिले नाही. मी लोकांच्या गाठीभेटी घेणे सुरू केल्या असून, चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- आलेक्स सिक्वेरा, आमदार
कॅ. विरियातो फर्नांडिस हे नवखे आहेत. समाजकार्यकर्ता असणे वेगळे व राजकारणी असणे वेगळे. गिरीश चोडणकर व फ्रान्सिस सार्दिन यांना उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसमध्ये तीन ते चार गट पडले आहेत. त्याचा परिणाम या निवडणुकीवर होऊ शकतो.
- पॉसिलिप दोरादो, काँग्रेस नेते
यावेळी आलेक्स सिक्वेरा हे भाजपसोबत आहेत. त्यामुळे कमीत कमी ९ हजार मते भाजपला मिळतील. मी गेली १६ वर्षे भाजपमध्ये आहे व एकदाही अल्पसंख्याक म्हणून पक्षात मला भेदभावाची वागणूक मिळालेली नाही.
- समीरा कार्दोझ, सचिव, नुवे भाजप
मी या मतदारसंघात स्वत: फिरले आहे. येथील लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रेम, आस्था व आपुलकी आहे. त्यांच्या कामाची त्यांना जाणीव आहे. काही लोक उघडपणे बोलत नाहीत, पण त्यांना भाजपने केलेला विकास माहीत आहे.
- रंजिता पै, माजी प्रभारी (भाजप)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.