Loksabha Election 2024  Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election 2024 : बी. एल. संतोष यांनी ठेवले प्रचारामधील त्रुटींवर बोटच; मतदानापर्यंत कष्ट घ्या

Loksabha Election 2024 : गुरुवारी सकाळी राज्यात दाखल झालेले संतोष हे सायंकाळी सव्वासात वाजता दिल्लीला रवाना झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election 2024 :

पणजी, अमूक मताधिक्य मिळेल, असे सांगत गाफील राहू नका. कागदावरील आकडेवारी फसवी असू शकते. प्रत्यक्षात मतदारांच्या मनात वेगळेच विचार असू शकतात. यासाठी लोकसभा निवडणुकीच्या मतदानापर्यंत प्रत्येकाने अधिक कष्ट करायला हवेत, असे भाजपचे राष्ट्रीय महासचिव (संघटन) बी. एल. संतोष यांनी सांगितले.

त्यांनी सुरवातीला पणजीत गाभा समितीची बैठक घेतली. त्यानंतर मडगाव आणि म्हापसा येथील कार्यालयांत बैठका घेतल्या आणि प्रचारात कोणत्या त्रुटी राहिल्या, यावर नेमकेपणाने बोट ठेवत भाजपची यंत्रणा गतिमान करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यामुळे उद्यापासून भाजप आक्रमकपणे कॉंग्रेसवर टीका करत प्रचाराची सुरवात करणार आहे.

गुरुवारी सकाळी राज्यात दाखल झालेले संतोष हे सायंकाळी सव्वासात वाजता दिल्लीला रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी भाजपच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला आणि प्रचार यंत्रणेचा नियमित आढावा घेण्याची सूचना त्यांनी केली.

भाजपचे प्रदेश पातळीवरील नेते ‘प्रचारात भाजपने आघाडी घेतली आहे, भाजपचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहेत’, असा दावा सातत्याने करतात. त्याची सत्यासत्यता आज संतोष यांनी पडताळून पाहिली. प्रदेश पातळीवरील नेत्यांची माहिती त्यांनी जिल्हा पातळीवरील नेत्यांशी ताडून पाहिली.

पणजीतील बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, निवडणूक प्रभारी आशिष सूद, केंद्रीय राज्यमंत्री तथा उमेदवार श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, सभापती रमेश तवडकर, गोविंद पर्वतकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर, दामू नाईक, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर,

आमदार नीलेश काब्राल, प्रदेश उपाध्यक्ष दत्ता खोलकर, खजिनदार संजीव देसाई आदी उपस्थित होते. मडगावच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह उमेदवार पल्लवी धेंपे, आशिष सूद, कृषिमंत्री रवी नाईक, दामू नाईक आणि आमदार उपस्थित होते. म्हापशातील बैठकीला तानावडे यांच्यासह उमेदवार श्रीपाद नाईक, आशिष सूद, दामू नाईक आणि आमदार उपस्थित होते.

‘लोक मते देतो असे सांगत असतील, त्याआधारे अमूक मतदारसंघात एवढी मते मिळतील, असे वाटून ढिलाई दाखवली जाऊ नये. एकेका मतदाराशी तीन तीनवेळा वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी संवाद साधून भाजपलाच मतदान होणार का, याची खात्री केली पाहिजे.

मतदार खासगीत मांडत असलेल्या मतांची दखल घेतली पाहिजे. अमूक एका भागात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने मतदान झाले म्हणून त्याची पुनरावृत्ती लोकसभेत होईल, असे मानून प्रचारात शैथिल्य आणू नये.

एकेक मत महत्त्वाचे मानून दरदिवशी प्रत्येकाने आपल्या संपर्कात येणाऱ्याचे मत भाजपकडे कसे वळेल, याचा प्रयत्न केला पाहिजे. मतदानाच्या दिवशीपर्यंत मतदाराशी सातत्याने संपर्कात राहिले पाहिजे. मतदाराने व्यक्त केलेल्या शंकेचे निरसन केले पाहिजे.

ते न केल्यास त्या शंकेचा प्रवास सार्वत्रिक होऊन भाजपविरोधी वातावरण तयार होण्यास वेळ लागणार नाही. हा धोका पत्करता कामा नये. शंकानिरसन वेळेत झाले तर शंका उपस्थित करणारी व्यक्तीच आपली प्रचारक होईल, असे त्यांनी नमूद केले.

आक्रमक प्रचाराबाबत ढिलाई

कॉंग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस आणि ॲड. रमाकांत खलप यांच्यावर जबरदस्त आरोप केले जात नसल्याच्या मुद्यावरही त्यांनी नेमकेपणाने बोट ठेवले.

खलप आणि फर्नांडिस यांच्याविरोधात कोणते मुद्दे जनतेसमोर ठेवता येतील, याचा अभ्यास स्थानिक पातळीवर केला का? समाज माध्यमांचा त्यासाठी सक्षमपणे वापर करण्याची योजना तयार करण्यात आली का, हेही संतोष यांनी जाणून घेतले आहे.

विरोधकांना प्रत्युत्तर कसे देणार?

दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकतील, असे चित्र संतोष यांच्यासमोर उभे करण्याचा प्रयत्न आज स्थानिक पातळीवरून झाला. मात्र, भाजपच्या विरोधात जाणारे काही घटक असतील तर त्यांना प्रत्युत्तर देण्याची कोणती योजना तयार आहे, याची विचारणा संतोष यांनी केली.

उत्तरेत श्रीपाद नाईक यांना सहाव्यांदा उमेदवारी तर दक्षिण गोव्यात पल्लवी धेंपे या नव्या चेहऱ्याला उमेदवारी दिल्याबाबत सर्वसामान्य जनतेचे मत काय हे जाणून घेतले आहे का? या सर्वेक्षणातून समोर आलेल्या मुद्यांना उत्तर देण्यासाठी कोणते प्रयत्न केले, याची माहिती त्यांनी घेतली.

गतवेळच्या त्रुटींवरही चर्चा :

सरकारने केलेल्या कामांच्या आधारेच दोन्ही उमेदवार जिंकणार असतील तर अन्य मुद्यांची गरज का आहे, अशी विचारणाही करण्यात आली. गत निवडणुकीत दक्षिणेत कोणत्या त्रुटी राहिल्या होत्या, त्या कशा दूर केल्या याचा आढावाही संतोष यांनी घेतला.

मतदान कोणत्या मुद्यांवर होणार?

लोकसभा निवडणुकीत मुद्यांच्या आधारे मतदान होणार की अस्मितेच्या आधारे याची चाचपणी भाजपचे दिल्लीतील नेते गेले काही दिवस करत होते. त्यातून ते एका ठरावीक निष्कर्षाप्रत पोचले आहेत.

संतोष यांनी पणजीतील पक्ष कार्यालयात बैठक घेऊन प्रचाराची तयारी आणि विरोधकांकडून केले जाणारे प्रयत्न, याविषयी या नेत्यांना असलेली समज जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील नेत्यांचे गोव्याच्या राजकारणाविषयी असलेल्या आकलनावर आधारित मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Exam: आधारकार्ड तपासले आणि सापडले बोगस परीक्षार्थी! NIO परीक्षेत ‘डमी’ उमेदवार; दोघांना अटक

NFF Meeting: पाक, श्रीलंकन तुरुंगातील मच्छिमारांना सोडवा! ‘एनएफएफ’ची मागणी; 6 किनारी राज्यांशी चर्चेअंती विविध ठराव

Chorla Ghat Accident: ..चालकाने मारली उडी, ट्रक गेला दरीत! चोर्ला घाटात दाट धुके, दरड कोसळल्याने दुर्घटना; लाखोंचे नुकसान

Sunburn Dhargalim: धारगळवासीयांचा ‘सनबर्न’ला विरोध, सुनावणीला मात्र गैरहजर; न्यायालयाकडून याचिका निकाली

Goa Politics: ..हा तर लोकशाहीचा खून! विधानसभा रणनीतीच्या बैठकीच्या जागी सभापती तवडकर; विरोधकांचे टीकास्त्र

SCROLL FOR NEXT