Goa Sunburn 2024 google image
गोवा

Sunburn Festival 2024: ‘सनबर्न’ इथेच का हवा आहे? दबावामुळे स्थानिक संतप्त; बैठकीसाठी सरसावल्या बाह्या

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Sunburn Festival Camurlim Location Dispute Meeting

कामुर्ली : जमीन रूपांतरे, डोंगर कापणी, बेकायदेशीर व्हिला बांधण्याचे सत्र, पर्यटनातील अनागोंदी, स्थानिकांच्या अस्तित्वावर गदा, गोव्यातून दिल्लीत पोहोचलेले ड्रग्स यासारख्या प्रकारांमुळे सरकारच्या प्रतिमेला गालबोट लागत असतानाच वादग्रस्त ‘सनबर्न’ हा ईडीएम महोत्सव कामुर्ली गावात नेण्यासाठी सरकारने कंबर कसल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

‘‘गावातील लोकांचा तीव्र विरोध असतानाही नीळकंठ हळर्णकरांना ‘सनबर्न’ येथेच का हवा आहे, हे समजत नाही. कोमुनिदाद (Comunidade) जमिनीवरील घरे पाडली जातील, असा दबाव ते आणू लागले आहेत.’’ असा आरोप माजी सरपंच शरद गाड यांनी ‘गोमन्तक’शी संवाद साधताना केला.

भाजप संघटनेलाही ज्या पद्धतीने कामुर्लीत ‘सनबर्न’ रेटला जातोय, ते अजिबात आवडलेले नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ‘सनबर्न’ कामुर्लीत नको, या गावातील लोकांच्या आक्रंदनाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गावातील लोकांनी यापूर्वीच सरकारला निवेदन सादर केले असून अत्यंत छोट्या शापोरा नदीकाठी वसलेल्या या गावात - जेथे पर्यटनाचा मागमूस नाही, जेथे हॉटेल नाही की, रेस्टॉरंट नाही; रस्ताही अत्यंत अरुंद आहे. - ज्यावरून एकाचवेळी दोन मोटारी जाऊ शकत नाहीत. - तेथे ‘सनबर्न’- ज्याला हजारो लोकांची उपस्थिती असते, असा ईडीएम महोत्सव भरविला जाऊ नये, अशा लोकांच्या प्रामाणिक भावना आहेत.

‘‘ ज्या पद्धतीने ‘सनबर्न’ गोव्यात भरविण्यासाठी सरकारने आटापिटा चालविला आहे, ते पाहून आश्‍चर्य वाटते. सरकारी प्रतिनिधी आधी वेर्णा येथे जमीन शोधण्यासाठी फिरत होते. दक्षिणेतही त्यांनी जागा पाहिल्या. आता त्यांना कामुर्लीत तो भरविण्याचे वेध लागले आहेत.’’ अशी प्रतिक्रिया एका राजकीय निरीक्षकाने व्यक्त केली.

मंत्री नीळकंठ हळर्णकर आपल्या निवडणुकीच्या काळात जेवढे फिरले नसतील, तेवढे सध्या ‘सनबर्न’साठी फिरून लोकांना वश करण्याच्या कामी लागले आहेत, अशीही प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.

थिवी मतदारसंघातील हा गाव नदी काठावर वसला आहे. एका बाजूला नदी, दुसऱ्या बाजूला हिरवागार डोंगर आणि मध्ये गाव, असे विहंगम दृश्‍य येथे पाहायला मिळते. महत्त्वाचे म्हणजे, पर्यटकांना त्या गावचे कधीच आकर्षण राहिलेले नाही.

तीन माड मडये, या भागातून गावात यायला एकच मार्ग आहे व तो इतका अरुंद आहे की, एक अवजड वाहन आले तर दुसरे वाहन सहज ओलांडून जाऊ शकत नाही. पाच किलोमीटर लांबीचा हा अरुंद मार्ग असून पुढे हा रस्ता शिवोलीला पोहोचतो. फेरीबोटीने नदी ओलांडली की, तुये-पेडणेला पोहोचता येते. सात सदस्य असलेल्या पंचायत क्षेत्रात खारवी व मराठा समाजाची वस्ती आहे.

कामुर्लीतील लोक शेती व मासेमारीत गुंतले आहेत. येथील नदीतील ‘तिसऱ्या’ खूप रूचकर आहेत. कधीही गावात फेरफटका मारला तर डोक्यावर टोपली घेऊन लोक शापोरा नदीत डुबकी मारून तिसऱ्या काढतानाचे दृश्‍य नजरेस पडते. या शांत व कोलाहलापासून चार हात दूर राहिलेल्या गावात कानठळ्या बसविणाऱ्या व ड्रग्ससाठी बदनाम असलेल्या ‘सनबर्न’ची द्वाही फिरविण्यासाठी सरकारला अशी अशिष्ट घाई का, असा प्रश्‍न लोकांना पडला तर आश्‍चर्य ते काय?

माजी सरपंच शरद गाड म्हणाले, गावात येणारा रस्ता एवढा अरुंद आहे की, उद्या सनबर्न महोत्सवात एखादी दुर्घटना घडली तर गावात अग्निशमन दलाचा बंब आणणेही शक्य होणार नाही. गावात ‘सनबर्न’साठी पाच हजार मोटारी येणार कशा? सरकारला झाले आहे तरी काय?

कामुर्लीतील कोमुनिदादच्या पठारावर ‘सनबर्न’ आणण्यासाठी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी खटाटोप चालविल्याचा आरोप गावातील अनेकजण करतात व गावातील चार हजार लोकांपैकी दोन हजार लोकांनी यापूर्वीच विरोधात सह्या केल्या आहेत.

‘‘गावात एकच रस्ता आहे, तोही अरुंद असून त्याच्या विस्तारासाठी मंत्री कधी वावरले नाहीत, शिवाय गोव्याची संस्कृती नसलेल्या महोत्सवाची त्यांना ओढ निर्माण झाली आहे ती का, हे सर्वांनाच माहीत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली.

गावचे माजी सरपंच विशांत नाईक जे ‘गावकार’ आहेत, ते म्हणाले की, उद्या कोमुनिदादची बैठक याच विषयावर बोलाविण्यात आली असून आम्ही हा प्रस्ताव फेटाळून लावणार आहोत. गावातील अर्ध्याअधिक लोकांनी तीन तासांत निवेदनावर सह्या केल्या व संपूर्ण गावाला ‘सनबर्न’ नको आहे, असे ते म्हणाले. कोमुनिदादने हा प्रस्ताव स्वीकारायला नको होता; परंतु कोणाला न विचारता दोन-तीन सदस्यांनी तो विषय कार्यक्रम पत्रिकेवर येऊ दिला, असे नाईक म्हणाले.

माजी आमदार किरण कांदोळकर यांनी कोमुनिदाद बैठकीत ‘सनबर्न’चा प्रस्ताव फेटाळला जाईल, असा विश्‍वास व्यक्त केला. लोकांवर मोठा राजकीय दबाव आहे; पण लोक तो झुगारून देतील, आम्हाला हा महोत्सव नको आहे, असे कांदोळकर म्हणाले.

‘सनबर्न’ हा महोत्सव तर अमली पदार्थांसाठी कुविख्यात आहे. शिवाय दिल्लीत पकडलेले ड्रग्स गोव्यात आणले जाणार होते, असे सांगण्यात येते. गावातील जागृत देवस्थान ‘गोबरेश्‍वर’ आणि ‘ग्रामदेवी सातेरी’ यांचा महिमा एवढा की, यापूर्वी कोलवाळ येथील मध्यवर्ती तुरुंग व कुचेली येथील कचरा प्रकल्प गावात आणला जाणार होता. तो लोकविरोधामुळे बारगळला. आजही गावातील लोकांचे ऐक्य अबाधित आहे आणि लोक पेटलेले आहेत, असे विशांत नाईक म्हणाले.

सरकारवर शिंतोडे

१) कामुर्ली ‘सनबर्न’विरोधात उभी ठाकली तरी मंत्री नीळकंठ हळर्णकरांना तो याच गावात का हवा आहे?

२) भाजप संघटना आणि सरकार आमने-सामने : पक्षाने सरकारला स्पष्टपणे विरोध कळवूनही मुख्यमंत्री स्पष्ट भूमिका का घेत नाहीत?

३) साडेपाच हजार कोटींच्या ५६२ किलो कोकेनची तस्करी दिल्लीत उघडकीस आली, त्याचा संबंध गोव्याशी लागला असूनही सरकार स्वस्थ कसे?

४) सरकारी प्रतिनिधी नागरिकांवर दबाव आणत असल्याचा आरोप, शिवाय कोमुनिदाद जमिनीवरील बेकायदा बांधकामे व खाणी नियमित करण्यावरून तेढ.

५) हा महोत्सव गावावर संक्रांत आणील : ग्रामस्थ म्हणतात, ग्रामदेवीचा प्रकोप होईल. महोत्सव गावच्या पावित्र्यावर घाला घालेल!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

Saint Francis Xavier पवित्र दर्शनात भ्रष्टाचार; प्रकल्पांमधले पैशे खिशात, जनतेचे पैसे बरबाद केल्याचा भाजप सरकारवर आरोप

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

SCROLL FOR NEXT