Goa Sunburn Festival 2024 Camurlim Location Dispute
योगेश मिराशी
म्हापसा: सध्या कामुर्ली गावात काहीजण सनबर्न नकोच या मतांचे आहेत. तर काहीजण थेट बोलण्यास धजत नाही, म्हणजे तळ्यातमळ्यात अशी काहींची भूमिका आहे. तर काहींना सनबर्न म्हणजे नेमके काय? याचाच थांगपत्ता नाही. अशा स्थितीत सनबर्न आयोजकांनी कामुर्ली कोमुनिदादशी जागेसंबंधी संपर्क साधला आहे. कोमुनिदादने या प्रस्तावावर चर्चेसाठी ६ ऑक्टोबरला सर्वसाधारण सभा सकाळी बोलावली आहे. सुमारे १.४० लाख चौरस मीटर जमीन या महोत्सवासाठी संभाव्य जागा म्हणून निवडली आहे. त्यामुळे ६ तारखेच्या सभेत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आणि याच बैठकीत कामुर्लीत डिसेंबरमध्ये सनबर्न ईडीएम पार्टी वाजणार की नाही, याचे भवितव्य ठरेल.
याविषयी स्थानिक राजश्री गावकर यांनी सांगितले की, मुळात आम्हाला ‘सनबर्न’सारखे गैरप्रकारांना चालना देणारे महोत्सव आमच्या गावात नकोच आहेत. ज्या कोमुनिदाद (Comunidade) जागेत हा सनबर्न आयोजनाचा प्रस्ताव आहे, तिथे आमची शेती आहे. म्हणजे आम्ही तिथे पूर्वापार शेती करत आलो आहोत. आता माझी सासू व मी तिथे शेती करतो. एकदा सनबर्नचा गावात शिरकाव झाल्यास ‘ते’ माघारी परतणार नाहीत.
यास्थळी वड आहे व तिथे जागृत गोबरेश्वर देवस्थान आहे. वटपोर्णिमेला आम्ही महिला याठिकाणी वडाकडे पूजेसाठी येतो. पावसाळ्यात इथे येण्यासाठी व्यवस्थित वाट नसते. आम्ही कोमुनिदादकडे वाट करून देण्याची मागणी केली. मात्र, कुणीच कानावर घेतले नाही. दुसरीकडे ‘सनबर्न’साठी सध्या समिती पुढाकार घेऊ पाहते. आमचा सनबर्नला विरोध असून, याठिकाणी सनबर्नसाठी काम हाती घेतले तर मी व माझी सासू हे काम अडवू. कारण आम्हाला सनबर्न नकोच आहे. सनबर्नचा आम्ही निषेध करतो.
त्याचप्रमाणे ६ ऑक्टोबरला कोमुनिदादच्या सभेत कोणता निर्णय होतो, त्यावर आम्ही पुढची दिशा ठरवू. गरज पडल्यास न्यायालयाची पायरी चढू, असा इशारा राजश्री तसेच त्यांची वयस्कर सासू भानुमती यांनी दिला. राखणदार गोबरेश्वर सर्वकाही बघून घेईल, असे भानुमती म्हणाल्या.
डेविड टी. ए. म्हणाले की, सनबर्न कामुर्लीत आल्यास येथील स्थानिकांना याचा उलट फायदा होईल, असे मला वाटते. कारण, पर्यटकांची रेलचेल असेल, ज्यातून लोकांच्या दुकानांना गिऱ्हाईक मिळेल. तसेच टॅक्सीकारांना चार पैसे जोडण्यास मिळतील. तसेही यास्थळी कुणी येत नाही. आता सनबर्नमुळे लोकांना काही दिवस व्यवसाय मिळेल. राहिला प्रश्न, ध्वनिप्रदूषणाचा तर इतर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवेळी मध्यरात्रीपर्यंत संगीत वाजतेच.
माजी सरपंच शरद गाड म्हणाले की, आम्हाला गावात ध्वनिप्रदूषण (Sound Pollution) किंवा महोत्सवस्थळी कथित गैरप्रकार चालणारे फेस्टिव्हल नको आहे. गावातील शांतता व गावपण हिरावून घेणाऱ्या महोत्सवांना आमचा नेहमीच विरोध असेल. आम्ही सनबर्नला पूर्ण ताकदीने विरोध करू; कारण हा गाव आम्हाला भावी पिढ्यांसाठी राखून ठेवायचा आहे. गावात आम्ही लोकांची स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. त्याअनुषंगाने निवेदनावर लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन हे निवेदन आम्ही सरकारला देणार आहोत.
पाऊस ओसरताच, नवीन पर्यटन हंगामासह गोव्यात सनबर्नची चाहूल लागण्यास सुरवात होते. डिसेंबरच्या अखेरला म्हणजे २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव होतो. या सनबर्न महोत्सवाचा संबंध नेहमीच अमलीपदार्थांशी जोडला जातो. या सर्व पार्श्वभूमीवर सनबर्न आम्हाला नको, असे म्हणत दक्षिण गोव्यातील लोकांनी या फेस्टिव्हलला झिडकारले. अशातच, सध्या कामुर्ली कोमुनिदादकडे सनबर्न आयोजकांनी जागेसाठी मागणी केली आहे. परिणामी कामुर्लीतदेखील काही ग्रामस्थांनी एकत्रित येत, या सनबर्नला विरोध करण्यास सुरवात केली आहे.
स्थानिक महिला लक्ष्मी म्हणाल्या की, मुळात सनबर्नची संकल्पना मला माहिती नाही. कारण आम्ही कधी असले इव्हेंट पाहिले नाहीत किंवा रुची नाही. सनबर्न म्हणजे तिथे संगीत वाजते व गर्दीमुळे लोकांचे मोबाईल चारले जातात, एवढेच मला माहिती आहे. त्यामुळे सनबर्न होण्याने किंवा नाही होण्याने फरक पडत नाही. आता स्थानिकांना काय हवे, त्यानुसार लोक यावर अंतिम निर्णय घेतील.
स्थानिक संतोष नाईक गावकर म्हणाले की, आम्ही गावकर असून आमचा सनबर्नला विरोध आहे. आम्हाला गावात कुठल्याही परिस्थितीत सनबर्न नको आहे. एकदा सनबर्न आला की तो कामयचा इथे स्थिरावेल. जे सनबर्नला पाठिंबा देत आहेत, त्यांना दूरगामी परिणाम माहिती नाहीत. इतरांसाठी तीन दिवसांची ही मज्जा असली तरी त्यानंतर निर्माण होणारा त्रास स्थानिकांनाच भोगावा लागेल. जिथे सनबर्न व्हायचा तिथे हवे असल्यास करावा. गावात सनबर्न नको. सनबर्नमध्ये कुठले-कुठले गैरप्रकार चालतात, हे सर्वश्रुत आहे, वेगळे सांगण्याची गरज नाही. येत्या ६ ऑक्टोबरला कोमुनिदाद समितीने सभा बोलावली आहे, तिथे आम्ही सनबर्नला विरोध करू.
सनबर्न महोत्सवाच्या आयोजकांनी औपचारिक अर्ज करून कामुर्ली कोमुनिदादकडे संपर्क साधला आहे. कोमुनिदादने या प्रस्तावावर चर्चेसाठी ६ ऑक्टोबरला सकाळी १०.३० वा. सभा बोलावली आहे. या सभेत लोकांचा सनबर्नला पाठिंबा आहे की विरोध हे चित्र स्पष्ट होईल. तसेच वारा नेमका कुठल्या बाजूने वाहतोय, याला दिशा मिळेल.
आयोजकांनी जी संभाव्य जागा सनबर्नसाठी निवडली आहे, ती जागा म्हपसा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. तसेच कामुर्लीच्या बाजूने शिवोली, कोलवाळ, हणजूण, वागातोरला तसेच महामार्गच्या दिशेने जाण्यासाठी रस्ते जातात.
कामुर्ली हाऊसिंग बोर्ड शेजारीच ही कोमुनिदादची तीन सर्व्हे क्रमाकांत पसरलेली ही ओसांड मालमत्ता पसरली आहे. याठिकाणी तसे कुणीही शेती किंवा उत्पन्न घेत नाही. एका संभाव्य जागेच्या शेजारील सर्व्हे क्रमांकात एक कुटुंब शेती करत असल्याचा दावा करते. तिथे हळसांडे व भाजी पीक घेत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
सनबर्न आयोजकांना पार्किंगपासून इतर साधनसुविधा उभारण्यासाठी ही जागा पुरेशी आहे. मात्र, सनबर्नस्थळी जाणारा रस्ता हा वसाहतीमधून मार्गक्रमण करतो. हा मार्ग तसा अरुंद आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. महोत्सवस्थळी हजारोंच्या संख्येने लोकांची वर्दळ असते.
दरम्यान, आयोजकांनी कामुर्ली कोमुनिदादकडे पाच वर्षांच्या कराराच्या अनुषंगाने ही संभाव्य जागा मागितल्याची चर्चा आहे. परंतु सभेत प्रस्तावाविषयी स्पष्टता येईल. कोमुनिदादचे जवळपास ३००च्या आसपास गावकरी आहेत.
आशियातील सर्वात मोठा व जागतिक ११व्या क्रमाकांचा संगीत महोत्सव परत आला असून, त्यानुसार आयोजकांनी सध्या ऑनलाईन बूक माय शोवर जाहिरातबाजी करून तिकिट विक्री सुरू केली आहे. यंदा सनबर्नसाठी तारीख ही २८, २९ व ३० डिसेंबर निश्चित केली आहे. परंतु ठिकाण (व्हेन्यू) लवकरच घोषित केले जाईल, असे आयोजकांनी यावेळी म्हटले आहे
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.