

DJ Crispy Christina police abuse viral video: शिवोली-मोरजी मार्गावर मध्यरात्री वाहनांची तपासणी करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याला आणि आपल्या मित्रांना शिवीगाळ करून गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी डीजे क्रिस्पी क्रिस्टिना हिने सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे. या आरोपामुळे गोव्यातील पोलीस गैरवर्तनाबद्दल चिंता वाढली आहे.
डीजे क्रिस्पी क्रिस्टिना हिने केलेल्या पोस्टनुसार, त्या आणि तिचे मित्र मध्यरात्रीच्या सुमारास गाडी चालवत असताना पोलिसांनी त्यांना थांबवले. या तपासणीदरम्यान महिला पोलीस अधिकारी उपस्थित असूनही, एका पुरुष अधिकाऱ्याने त्यांच्याशी अत्यंत उद्धटपणे व्यवहार केल्याचा आरोप तिने केला आहे.
क्रिस्टिनाने सांगितले की, "त्या पुरुष अधिकाऱ्याने पहिल्यापासूनच अत्यंत कठोर भाषा वापरली आणि आम्हाला 'गो टू युवर कंट्री, यू आर नॉट इन युवर कंट्री' असे सुनावले."
पोलिसांनी त्यांच्या वाहन परवान्याची तपासणी केली आणि त्यांना जाण्याची परवानगी दिली. मात्र, क्रिस्टिना हिच्या म्हणण्यानुसार, त्यांची गाडी पुढे जात असताना त्या पुरुष अधिकाऱ्याने त्यांच्या मित्राला उद्देशून अश्लील शिवीगाळ केली.
या घटनेमुळे आपल्याला इतकी भीती वाटली की, आपण त्या क्षणी घटनेचे रेकॉर्डिंग करण्यासाठी आपला फोनसुद्धा बाहेर काढू शकलो नाही, असे क्रिस्टिनाने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. तिच्या मित्राच्या मालकीची ही गाडी असून, हा मित्र गोव्यात कर भरून आणि काम करून महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचेही तिने स्पष्ट केले.
डीजे क्रिस्टिना हिने या घटनेनंतर गोव्यातील पर्यटनावर आधारित व्यवस्थेवर थेट प्रश्नचिन्ह उभे केले आहे. "गोव्यासारख्या पर्यटनावर अवलंबून असलेल्या राज्यात अशा प्रकारे गैरवर्तन कसे होऊ शकते?" असा सवाल तिने केला आहे. तसेच, अशा प्रकारच्या अनुभवांबद्दल इतरांकडूनही तक्रारी ऐकल्याचे तिने म्हटले. पोलिसांचे हे वर्तन गोव्याची सुरक्षित पर्यटन स्थळ ही प्रतिमा खराब करणारी असल्याची भीती तिने व्यक्त केली आहे.
या गंभीर आरोपांनंतरही गोवा पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलीस या आरोपांची दखल घेऊन काय कारवाई करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक तपशील प्रतीक्षेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.