बेतोड्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या गोळीबाराच्या घटनेने गोव्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तेथील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचे उघड झाले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार केवळ इव्हेंटवर पैसा खर्च करीत असून गोमंतकीयांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.
गोव्यात ‘गोडसे’च्या अनुयायांचे ‘रावणराज्य’ चालू आहे असून गुन्हेगारी, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, जमीन बळकावणारे माफिया यांना प्रोत्साहन भाजप सरकार देत आहे. गोमंतकीय दररोज एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या बातमी ऐकतच जागे होतात, असा टोला युरी आलेमाव यांनी हाणला आहे.
राजकीय हस्तक्षेपामुळे कायद्याची अंमलबजावणी करणारी संपूर्ण यंत्रणाच डबघाईला आल्याने गुन्हेगारांच्या मनात अजिबात भीती नाही. गोव्यात भाजपच्या आशीर्वादाने माफिया कार्यरत आहेत, असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.
मीरामार येथे एका अर्भकाला कसे सोडून दिले आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नसल्यामुळे सदर महिलेचा माग काढण्यात पोलिस हतबल झाले, हे आपण काही महिन्यांपूर्वी पाहिले होते. पुन्हा एकदा सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याची घटना समोर आली आहे. भाजप सरकार मागील घटनांवरुन धडा घेत नाही, असे युरी आलेमाव म्हणाले.
या घटनेचा सखोल आणि निःपक्षपाती तपास करावा तसेच घटनास्थळी कार्यरत नसलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत सविस्तर अहवाल जारी करावा. जे सरकार नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्यात अपयशी ठरते, त्यांना शासन करण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही, असे युरी आलेमाव म्हणाले.
‘मुख्यमंत्री प्रचारात मग्न’
मडगाव (खास प्रतिनिधी) : बेतोडा येथे जो गोळीबार झाला, ते पाहिल्यास आता गोवाही गुन्हेगारीच्या मुख्य धारेत येत आहे की काय? अशी भीती वाटू लागली आहे. गोव्यातील कायदा व सुव्यवस्था पाहणारे - गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत मात्र भाजपच्या राष्ट्रीय प्रचारात मग्न आहेत. त्यांना गोव्याकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसावा, अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली.
काही दिवसांपूर्वी हरयाणातील एका राजकीय नेत्याची हत्या केलेल्या दोन शार्प शूटर्सना हरियाना पोलिसांनी गोव्यात येऊन अटक केली होती. याचा उल्लेख करत सरदेसाई म्हणाले, गोवा हे गुन्हेगारांचे आश्रयघर झाले आहे आणि गोव्यात काहीही केले, तरी चालते, अशी गुन्हेगारांची समज झाली असावी. यासाठीच हे गुन्हेगार गोव्यात येतात. त्यांना पाहिल्यावर गोव्यातील लोकांनाही आता आम्ही काहीही केले तरी चालते अशी भावना निर्माण झाली असावी, असे उद्गार सरदेसाई यांनी काढले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.