Goa Protest Dainik Gomantak
गोवा

Kolkata Doctor Case: कोलकाता घटनेबाबत गोव्यात नागरिक रस्त्यावर; निषेध मोर्चा, मेणबत्ती रॅली काढून जोरदार निषेध

Goa Protest: गोवा विद्यापीठातील सीसीटीव्ही यंत्रणा सुधारा ऋषभ फळदेसाईंची मागणी; निषेध मोर्चात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पश्‍चिम बंगालमधील कोलकाता शहरातील एका इस्पितळात सेवा देणाऱ्या डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून हत्या करण्याच्या प्रकारामुळे सारा देश ढवळून निघाला आहे. याचे तीव्र पडसाद गोव्यातही उमटले असून डॉक्टरांबरोबर आता राज्यातील सेवाभावी संस्था, कार्यकर्ते, महिला, विद्यार्थी तसेच अन्य नागरिक रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करू लागले आहेत. सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी निषेध मोर्चा, मेणबत्ती रॅली आदी काढून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.

महिलांच्या सुरक्षेचा विषय गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. गोवा विद्यापीठ हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे, परंतु या विद्यापीठात सीसीटीव्ही यंत्रणा नाही. विद्यापीठातील सीसीटीव्ही यंत्रणा सुधारावी, अशी मागणी एनएसयूआय गोवा विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस ऋषभ फळदेसाई यांनी केली.

कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अन्यायाविरोधात विद्यापीठात काढण्यात आलेल्या निषेध मोर्चावेळी ते बोलत होते. या मोर्चात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. विद्यापीठातील वाचनालय ते प्रशासकीय इमारत परिसरात हा मोर्चा झाला.

फळदेसाई पुढे म्हणाले की, कोलकाता येथे डॉक्टर महिलेवर झालेला अत्याचार ही निंदनीय घटना असून आम्ही विद्यापीठातील विद्यार्थी त्यांच्या कुटुंबीयांसोबत असून सरकारने तत्काळ न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

कोलकाता येथे घडलेली घटना ही अतिशय निंदनीय घटना आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध न्याय मागावा लागतो. महिलांना सुरक्षा कधी मिळणार? परदेशात जर महिलांवर अत्याचार केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येते, तसेच आपल्याकडे होणे गरजेचे आहे. महिलांनी सुरक्षेसाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे साक्षी गावकर यांनी सांगितले.

गोवा विद्यापीठात जर एखादी घटना घडल्यास न्याय मागण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती आहे, परंतु सद्यःस्थितीत ती निष्क्रिय झाली आहे. गोवा विद्यापीठाचे कुलसचिव तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबतीत लक्ष देणे गरजेचे असल्याचे ऋषभ फळदेसाई यांनी सांगितले.

कुडचडेत मेणबत्ती रॅली

पश्चिम बंगालमधील क्रूर घटनेचा निषेध करण्यासाठी कुडचडे येथील युवा संघाने मेणबत्ती रॅलीचे आयोजन केले. ही रॅली आंबेडकर चौकातून सुरू झाली. शेकडो युवक आणि महिला यात सहभागी झाल्या. यानंतर ही रॅली शिवाजी चौकाकडे मार्गक्रमण करून तिथे दोन मिनिटे शांतता पाळून आदरांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी युवा द कुडचडेचे अध्यक्ष रोहन गावस देसाई यांनी सांगितले की, महिलांच्या सुरक्षेची व्यवस्था करणे आता अत्यंत आवश्यक झाले आहे. दररोज अनेक महिला त्यांच्या कार्यस्थळावर जातात, परंतु त्यांची सुरक्षितता अजूनही मोठा प्रश्न आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी समाजाने आणि सरकारनेही पुढे येऊन कडक कायदे करायला हवेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक ऋचा वस्त आणि कुडचडेतील नगरसेवक प्रदीप नाईक यांनीही आपले विचार व्यक्त केले.

पर्वरीत कँडल मार्च

पर्वरी येथील देवश्री ग्रीन्स कॉ ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या रहिवाशांनी कँडल मार्च काढला. तसेच एक मिनीट शांतता पाळून पीडितेला आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. अनंत रामाणी यांनी केंद्र सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी खास कायदा करण्याचे आवश्यक असल्याचे सांगितले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सर्व प्रकारच्या डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा असून यावर त्यांनी समाधानही व्यक्त केले. सध्या वैद्यकीय क्षेत्रात ७५ टक्के महिला डॉक्टर्स कार्यरत असून त्यांना सरकारने संपूर्ण सुरक्षा देऊन अशा प्रकारची नीच कृत्ये करणाऱ्यावर नजर ठेवण्याची आवश्यकता आहे.

डॉक्टरी पेशात काम करणाऱ्या डॉक्टरांना २४ तास सुरक्षा असणे आवश्यक असल्याचे मत डॉ. रामाणी यांनी व्यक्त केले.‌ तद्‍नंतर देवश्री ग्रीन्स ते डिफेन्स कॉलनी ते वर्षा कॉलनीपर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. यात देवश्री ग्रीन्सचे रहिवासी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

‘आम्हाला न्याय द्या, नारी शक्तीचा विजय असो’

कोलकाता येथील लैंगिक अत्याचार आणि हत्याप्रकरणाचा निषेध करीत डिचोलीत भव्य मशाल रॅली काढण्यात आली. या रॅलीत जवळपास ४०० नागरिक सहभागी झाले होते. रॅलीत युवतींसह महिलांची संख्या लक्षणीय होती. या रॅलीच्या माध्यमातून महिलांनी शक्तीप्रदर्शन केले. येथील शांतादुर्गा विद्यालयाकडून या रॅलीला सुरवात झाली. रॅलीत सहभागी नागरिकांनी हातात फलक घेऊन ‘आम्हाला न्याय द्या'', ''नारी शक्तीचा विजय असो'', आदी घोषणा देत शहरात रॅली काढली. समाजातील विकृती बंद झाली पाहिजे. तसेच महिलांकडे पाहण्याची मानसिकता प्रत्येकाने बदलली पाहिजे, असा संदेशही या रॅलीतून देण्यात आला. कोलकाता घटनेप्रकरणी न्याय द्या. अशी मागणी रॅलीत सहभागी महिला आणि युवतींनी केली.

होंडा येथे मेणबत्ती मोर्चा

होंडा येथील महिला व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कोलकाता येथील डॉक्टर हत्या प्रकरणी रविवारी रात्री मेणबत्ती मोर्चा काढून निषेध नोंदवला. हा मोर्चा होंडा बाजारातून सूरू होऊन पंचायत कार्यालयाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मोर्चाची सांगता कऱण्यात आली. यावेळी पत्रकार विठ्ठल गावडे पारवाडकर म्हणाले की, कोलकत्ता येथील डॉक्टर तरुणीचा खून करण्यात आला हे महाभयंकर पाप आहे. विद्यार्थी प्रांजल गावस यांनी आजही महिला सुरक्षित नाहीत, असा दावा केला.

‘अभाविप’तर्फे पणजीत निषेध मोर्चा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पणजी बसस्थानक येथे निषेध मोर्चा काढला. यावेळी संघटनेचे गोवा विभाग संयोजक अक्षय शेट म्हणाले, जी महिला डॉक्टर ३६ तास रुग्णांची सेवा करून थकली होती अशा अवस्थेत असताना तिच्यावर बलात्कार करून खून केला जातो. सर्व पुरावे मिटविण्याचा प्रयत्न केला जातो या घटनेचा आम्ही अभाविप संघटना निषेध करत असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना अंशुल सिनारी म्हणाले, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री या स्वतः महिला आहेत असे असूनही त्या पडित महिलेला न्याय मिळत नाही ही दुखत घटना असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT