Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: तिसऱ्या जिल्ह्याची कथा

Khari Kujbuj Political Satire: ‘रेंट -अ- कार’ आणि ‘रेंट-अ-बाईक’ यांचा उद्रेक थांबण्याचे चिन्ह दिसत नाही

गोमन्तक डिजिटल टीम

तिसऱ्या जिल्ह्याची कथा

राज्यात तिसरा जिल्हा होणार अशी चर्चा गेले काही वर्ष ऐकीवात आहे. कृषिमंत्री रवी नाईक हे सातत्याने त्या विषयाचा पाठपुरावा करत असतात. रवी नाईक हे काँग्रेस मधून भाजपमध्ये आले तरी तिसऱ्या जिल्ह्याचा विषय चर्चेत पुढे काही सरकत नाही, हे तितकेच खरे आहे. आता तर सभापती रमेश तवडकर यांनी काणकोण, धारबांदोडा, सांगे, केपे तालुक्यांचा समावेश करून तिसरा जिल्हा आकाराला आणावा, असा विषय मांडला आहे. त्यामुळे फोंडा मुख्यालय असलेल्या तिसऱ्या जिल्ह्याच्या विषयाला आता स्पर्धा निर्माण झाली आहे. जिल्ह्याचे मुख्यालय केपे की फोंडा असा प्रश्न निर्माण झाल्याने सरकार कदाचित तिसऱ्या जिल्ह्याचा विषय लांबणीवर टाकण्याची शक्यता आहे. ∙∙∙

‘स्मार्ट’ तोडफोड

पणजी शहर सध्या चुकीच्या कारणांसाठी चर्चे असते. दर दिवशी शहरात काही तरी नवीन घटना घडते. काँग्रेस हाऊस समोर असलेल्या विभाजकाला लोखंडी रेलिंग घालून बंद करण्यात आले होते. कारण धोकादायक पद्धतीने क्रॉस करत येऊ नये, असा उद्देश होता. परंतु हे कोणाच्या पचनी पडले नसल्याचे दिसते.कारण एका व्यक्तीने रेलिंग कापून ते खुले करून ठेवले. यातून धोकादायकपणे सर्वजण शॉर्टकट मार्गाने रस्ता ओलांडतात. मात्र ‘स्मार्ट सिटी’ म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काय. एवढे मोठे रेलिंग कापताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात व्हीडीओ आला असेलच, काय सीसीटीव्ही कॅमेरेही ‘स्मार्ट सिटी’तल्या रस्त्यांप्रमाणे निकामी झाले आहेत, असे सवाल सोशल मीडियावर विचारले जात आहेत. ∙∙∙

‘टोल’वरून टोलवाटोलवी!

राज्यात टॅक्सी व्यावसायिकांच्या समस्या हे सरकारसाठी अवघड जागचे दुखणे बनले आहे. पर्यटनस्थळ असल्याने जगभरातील पर्यटक गोव्यात येणार हे गृहित धरून उत्तम गुणवत्तेच्या सेवा देऊन प्रवाशी आपल्याकडे खेचण्याऐवजी गोवा माईल्स रद्द करा, ॲप आधारित टॅक्सी सेवा नको, तसेच मोपा लिंक रोडवरील टोलही हटवा, असा आग्रह टॅक्सी व्यावसायिकांनी धरला आहे. काही अंशी हे रास्त जरी असले तरी, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी स्पर्धेला तोंड तरी देऊन पहावे, अशी अपेक्षा प्रवाशी बाळगून आहेत. आपणही स्वतःला अपग्रेड करण्याची गरज आहे, हे टॅक्सी व्यावसायिकांच्या गावीही नसते. म्हणूनच टॅक्सीचालकांनी टोल हटवा नाहीतर प्रवाशांना टोल गेटवरच उतरवून त्यांना विमानतळापर्यंत नेण्याला ‘टोलवाटोलवी’ करू,अशी धमकी दिलीय. ∙∙∙

ग्रामसभांना ‘सनबर्न’चं निमित्त!

सध्या सासष्टीतील ग्रामसभा होऊ घातलेल्या ‘सनबर्न’ महोत्सवामुळे गाजताना दिसत आहेत. या भागाची ती एक खासियत आहे. कोणीतरी एखादा विषय धरून त्या विरुध्द आवाज उठविला की, त्यानंतर एकजात प्रत्येक ग्रामसभा तसे ठराव संमत करत असतात. यापूर्वी मोपा विमानतळ, दुहेरी रेल्वे मार्ग याबाबत तोच अनुभव आलेला आहे, असे या घटनांकडे तटस्थतेने पहाणारे सांगतात. त्यांतून निष्पन्न काहीच झालेले नाही. पण या मंडळींना ते सांगणार कोण!, एरवी ग्रामपंचायतीसमोर चर्चा करून निर्णय घ्यावयासाठी अनेक विषय आहेत.पण त्याकडे गंभीरपणे पाहिले जात नाही. फार दूर कशाला ताज्या अतिवृष्टीमुळे प्रत्येक गावांतील रस्त्या बाजूची गटारे तुंबून रस्ते पाण्याखाली गेले; त्यांतून वाट काढत गेलेल्यांनी ग्रामसभेत ‘सनबर्न’वर राग काढला, पण तुंबलेली गटारे व अन्य समस्यांवर चर्चा करावी, असे कोणालाच वाटले नाही. ∙∙∙

बाबू गावकरची बक्षिसाची रक्‍कम गेली कुठे?

सांगेतील नेत्रावळी या ग्रामीण भागातील बाबू गावकर याने राष्‍ट्रीय क्रीडा स्‍पर्धेत माॅडर्न पेंट्थॉलॉन या प्रकारात सुवर्णपदक प्राप्‍त केल्‍यानंतर त्‍याच्‍यावर या स्‍पर्धेत गोव्‍याचे सुवर्ण पदकाचे खाते त्‍याने उघडल्‍याबद्दल कौतुकाचा वर्षाव झाला. एवढेच नव्‍हे तर त्‍याच्‍यावर बक्षिसांची खैरात केल्‍याच्‍या घोषणाही झाल्‍या. सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी बाबू गावकर याने हा पराक्रम केल्‍यामुळे त्‍याला एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. तर अन्‍य दोन महिला नेत्‍यांनी प्रत्‍येकी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. सुभाषरावांनी दिल्या शब्दाप्रमाणे बाबूला बक्षिसाची रक्‍कम अदा केली. मात्र, त्‍या दोन महिलांना आपण कोणती घोषणा केली, याचा आता विसर पडला की काय माहीत नाही? पण त्‍यांनी जाहीर केलेल्‍या बक्षिसाची रक्‍कम अजून बाबूला मिळालेली नाही आणि ते केव्‍हा मिळेल याच प्रतीक्षेत बिच्‍चारा बाबू आहे. ∙∙∙

रेजिनाल्ड ‘पॉवर’मध्ये तरी कुडतरी ‘पॉवरलेस’ !

आज कुडतरीतील नागरिकांनी वीज खात्यात जाऊन मतदार संघातील वीज पुरवठ्यातील समस्यांबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पण, अधिकाऱ्यांनी परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली व वीज पुरवठ्यातील त्रुटी व्यवस्थित समजावून सांगितल्या. तरीही या नागरीकांनी आमदार रेजिनाल्ड यांनाच जबाबदार धरले. आमदार भाजप बरोबर ‘पॉवर’मध्ये आहे, मात्र कुडतरीत ‘पॉवर’ नाही. तात्पर्य काय तर या नागरिकांना कुठल्याही स्थितीत आमदारांना दोषच द्यायचा होता तो त्यांनी दिला, अशी चर्चा कुडतरीतच सुरू झाली आहे. ∙∙∙

मराठीसाठी ‘व्हेरी गुड’!

मुरगावचे आमदार संकल्प अमोणकर यांनी बुधवारी विधानसभेत चक्क मराठीतून लक्षवेधी सूचना मांडली. खाजन जमीन विषयक अशी ती सूचना त्यांनी वाचून दाखवल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बसल्या जागी टेबलावर थाप देत ‘व्हेरी गुड’ म्हणाले. त्यानंतर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्रीच उठले. त्यामुळे साहजिकपणे मराठीत चर्चा होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र अमोणकर यांचे मराठीप्रेम केवळ लक्षवेधी सूचना वाचण्यापुरतेच मर्यादित राहिले आणि ‘व्हेरी गुड’ म्हणणारे मुख्यमंत्रीही मराठीकडे वळले नाहीत. आपल्याला मराठी समजत नाही, अशी तक्रार मात्र या खेपेला कोणी केल्याचे दिसले नाही. या उलट पुरवणी मागण्यांच्या वेळी आपण एक चांगली मराठी कविता सादर करू, असे बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस म्हणाले. ∙∙∙

आता तरी कारवाई होणार ?

‘रेंट -अ- कार’ आणि ‘रेंट-अ-बाईक’ यांचा उद्रेक थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. सरकारकडून याच्यावर आळा घालण्यासाठी ठोस पाऊल उचलले जाईल, अशी आशा होती, परंतु तसे काही दिसत नाही. आज विधानसभेत आमदार कार्लुस फेरेरा यांनी हा विषय मांडून, कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात तरतूद करण्याची मागणी केली. सोशल मीडियावर हा विषय कित्येक वर्षांपासून सुरू असून फेरेरा यांना लोकांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, आता चेंडू सरकारच्या कोर्टात असल्याने आता तरी कारवाई होणार का ? असे प्रश्न विचारले जात आहेत. ∙∙∙

दयेश बॅक इन ॲक्शन!

‘दुःख भरे दिन बिते रे भैया’ हे मदर इंडिया या जुन्या चित्रपटातील गीत त्या काळी बरेच गाजले होते. केपे पालिकेचे माजी नगराध्यक्ष व बाबू कवळेकर कुटुंबाचे निकटवर्तीय व विश्वासू गणले जाणारे दयेश नाईक हे बाबू कवळेकर यांच्या पराभवानंतर मागे पडले होते. पालिकेतही दयेश यांचा दबदबा कमी झाला होता.मात्र, आता दयेशबाब पुन्हा एकदा ‘ॲक्शन मोड’ मध्‍ये आले आहेत. दयेश समर्थक नगराध्यक्ष खुर्चीवर असल्यामुळे दयेशची हजेरी आता पालिकेत जाणवू लागली आहे. दयेश यांना मॅडमचा ‘मेंटॉर’ मानले जात आहे. बाबू कवळेकर जरी सत्तेत नसले तरी सरकार दरबारी बाबू यांची कामे होतात. म्हणजे आता दयेश यांच्या कार्यकाळात हाती घेतलेल्या केपे मार्केट प्रकल्पाची बंद इमारत खुली होण्याची आशा वाढली.आहे. बघुया, ‘मॅडम चेअरपर्सन’ चे हात कुठपर्यंत पोहचतात.∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

IFFI 2024 मध्ये लोकसंस्कृतीद्वारे देशाची एकता, अखंडतेचे दर्शन! दवर्लीत होणार खुले फिल्म स्क्रिनिंग

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

SCROLL FOR NEXT