मडगाव: शिरवई-केपे येथे साक्षी नाईक या युवतीवर सुरी हल्ला करून फरार झालेला संशयित अनंत ऊर्फ अजय कदम याला केपे पोलिसांनी गुरुवारी (15 मे) सांगली येथे अटक केली. साक्षी ही संशयिताची प्रेयसी होती. मात्र त्याला संशयाने ग्रासले होते आणि त्यातूनच त्याने हा हल्ला केल्याचे उघड झाले आहे. संशयिताविरोधात सध्या केपे पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेली साक्षी नाईक या युवतीवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
साक्षी नाईक ही युवती बोरी गावातील असून सोमवारी ती आपल्या मैत्रिणीबरोबर शिरवई येथे एका फार्मवर आली होती. तिथे तिचा प्रियकर असलेला संशयित अजयसुद्धा आला होता. तेथे त्यांच्यात अचानक वाद झाला आणि साक्षी फार्मवरून बाहेर पडली. अजयने तिचा कारमधून पाठलाग करत वाटेत गाठत तिच्या पोटात सुरा खुपसला.
त्यात ती गंभीर जखमी झाल्यानंतर त्याने तिला आपल्या गाडीने मडगावच्या जिल्हा इस्पितळात आणून दाखल केले. त्यानंतर तो तिला तिथेच सोडून पळून गेला होता. संशयित फरार झाल्यावर महाराष्ट्रात वावरत असल्याची माहिती केपे पोलिसांना मिळाल्यावर उपनिरीक्षक दिगंबर बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तेथे पाठविले होते. याच पथकाने गुरुवारी त्याला सांगली येथून अटक केली.
साक्षी अतिदक्षता विभागात
या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेली साक्षी हिची प्रकृती आता स्थिर असली तरी अजूनही ती अतिदक्षता विभागातच आहे. त्यामुळे केपे पोलिसांनी अद्याप तिची जबानी नोंदवून घेतली नाही, अशी माहिती या प्रकरणातील तपास अधिकारी उपनिरीक्षक योगेश गावकर यांनी दिली.
साक्षीमुळेच अर्धवट सोडले पोलिस प्रशिक्षण!
सोमवारी १२ मे रोजी हा खुनी हला करण्याचा प्रकार घडला होता. संशयित अजय कदम हा तळसांझर-बड्डे (मडगाव) येथे राहत होता. मागच्या वर्षी त्याला पोलिस शिपाई म्हणून गोवा पोलिसात भरती करून घेतले होते. मात्र त्याने पोलिसाचे काम करणे साक्षीला पसंत नव्हते.
त्यामुळे नवी दिल्ली येथे चालू असलेले पोलिस प्रशिक्षण अर्ध्यावर सोडून तो परत गोव्यात आला होता. मात्र एवढे करूनही प्रेयसीकडून आपली प्रतारणा होत असल्याचे त्याच्या मनात घर करून राहिले होते. याच नैराश्यातून त्याने हा हल्ला केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.