Kavale Math Land Scam Case
पणजी: कवळे मठाची जमीन विकताना झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी शिवानंद सरस्वती स्वामींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली आहे.
पोलिसांकडून कारवाई किंवा अटक केली जाऊ नये यासाठी अंतरिम निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेवरील प्राथमिक सुनावणीवेळी स्वामींतर्फे त्यांच्या वकिलांनी केली. परंतु त्यास खंडपीठाने नकार दिला. तसेच प्रतिवादी भूषण जॅक व डॉ. पी. एस. रामाणी यांना आज नोटीस बजावून त्यावरील पुढील सुनावणी २६ फेब्रुवारीला ठेवली आहे.
फोंडा पोलिसांनी शिवानंद सरस्वती स्वामींविरोधात चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कठोर कारवाई होण्याची किंवा त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यांना अटकेपासून संरक्षण देण्याची विनंती त्यांच्या वकिलांनी केली, मात्र न्यायालयाने त्याकडे दुर्लक्ष करत नकार दिला. याचिकेत गोवा सरकारसह फोंडा पोलिस निरीक्षक, भूषण जॅक व डॉ. रामाणी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. पोलिसांतर्फे सरकारी वकिलांनी नोटीस स्वीकारली तर इतर दोघा प्रतिवाद्यांना नोटीस जारी करून त्याला उत्तर देण्यासाठी २६ फेब्रुवारीपर्यंत मुदत उच्च न्यायालयाने दिली आहे. याचिकादाराला अटकेची भीती वाटत असल्यास त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करावा, असे मत सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी व्यक्त केले.
शिवानंद सरस्वती स्वामी यांनी जमीनविक्रीसंदर्भात केलेला व्यवहार दिवाणी स्वरूपाचा असताना फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे प्रकरण कवळे मठाअंतर्गत असल्याने फोंडा पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा.
या प्रकरणावर पडदा पडलेला आहे व जो जमीनविक्रीचा व्यवहार केला आहे, तो रद्द करण्यात आला आहे. हे प्रकरण सहा वर्षांपूर्वीचे आहे. स्वामी शिवानंद सरस्वती यांचे कुटुंबच नाही. त्यामुळे हा गैरव्यवहार करून पैसे जमा करण्यात त्यांचा कोणताच उद्देश नाही.
येत्या ९ फेब्रुवारीपासून काही देवस्थान समित्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे जाणूनबुजून ही तक्रार दाखल करून स्वामींना बदनाम करण्यासाठी हा खटाटोप कवळे मठाच्या काही अनुयायांनी केला आहे. जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा त्वरित विक्रीखत रद्द करण्यात आले. दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात आले आहे. देवस्थानच्याच काही अनुयायांकडून ‘राजकारण’ केले जात आहे असा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.
फोंडा पोलिसांनी भारतीय दंड विधान ४२०, ४१९ अन्वये तोतयेगिरी व फसवणूक, ४६५ अन्वये खोटारडेपणा आदी गुन्हे नोंद केले आहेत. एफआयआर १५ जानेवारी २०२५ रोजी नोंदविला आहे व मठाकडून तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपासंदर्भातचा दस्तावेज मागवण्यात आला आहे. या दस्तावेजांची पडताळणी केल्यानंतर पुढील कारवाईची शक्यता आहे, अशी माहिती पोलिससूत्रांनी दिली. शिवानंद सरस्वती स्वामी यांनी स्व. सच्चिदानंद सरस्वती स्वामी यांची सही करून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीद्वारे योग्य मान्यता न घेता, उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या नियमांचा भंग करून, मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांना अंधारात ठेवून हा व्यवहार करणे, मठाचे विश्वस्त मंडळ मनमानी पद्धतीने बरखास्त करणे, इतरही काही बेकायदेशीर जमीन व्यवहार करणे आदी गंभीर आरोप या तक्रारीतून स्वामींवर करण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.