Kala Academy School Of Drama Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: नाट्यविद्यालयातल्या समस्या म्हणजे 'ये रे माझ्या मागल्या'! विद्यार्थी स्वखर्चाने करतात प्रॉडक्शन, अकुशल शिक्षकांवर उधळपट्टी

Kala Academy School Of Drama: नाट्य महाविद्यालयाच्या सुरुवातीपासून त्यात अनेक गैरप्रकार झाले आहेत. सुरुवातीच्या काळात पात्र नसलेल्या (unqualified) शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिकून घ्यावे लागले आहे.

Sameer Panditrao

पणजी: कला अकादमीच्या गोवा'ज कॉलेज ऑफ थिएटर आर्ट मधील विद्यार्थ्यांसाठी 'नाट्य निर्मिती' ही नेहमीच समस्या राहिली आहे. हे नाट्य विद्यालय सुरू होऊन सुमारे सहा वर्षे लोटली आहेत. परंतु विद्यार्थ्यांची महत्त्वाची ऍक्टिव्हिटी असलेल्या 'थिएटर प्रॉडक्शन'साठी बजेटची तरतूद न होणे ही दर वर्षी नियमितपणे उद्भवणारी समस्या राहिली आहे.‌

गेली अनेक वर्षे स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून या महाविद्यालयातील विद्यार्थी आपले सेमिस्टर प्रॉडक्शन सादर करत आले आहेत. गेल्या वर्षी तर तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बजेट अभावी प्रॉडक्शन सादर करण्यास नकार दिला व विद्यापीठाला त्या संबंधाने पत्र पाठवले तेव्हा विद्यापीठाने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांचे थिएटर प्रॉडक्शन व्हायलाच हवे असा आदेश दिल्यानंतर त्यांचे थिएटर प्रॉडक्शन यावर्षी (म्हणजे ते विद्यार्थी चौथ्या वर्षात पोहोचल्यानंतर) झाले.‌  

विद्यार्थ्यांनी नाट्य महाविद्यालय करत असलेल्या अशा प्रकाराबद्दल तक्रार करणे हे पहिल्यांदाच होत नव्हते.‌ 2022 यावर्षी नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फोंड्याहून पणजीत येऊन कला अकादमीच्या कार्यालयात धरणे धरले होते.

कला अकादमीचे तत्कालीन सदस्य सचिव आर्लेकर यांनी त्यावेळी त्यांचे म्हणणे ऐकून सुद्धा घेण्याचे औचित्य दाखवले नव्हते परंतु विद्यार्थ्यांनी धरणे दुसऱ्या दिवशीही चालू ठेवल्यामुळे शेवटी अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे (जे कला आणि संस्कृती खात्याचे मंत्रीही आहेत) यांना विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकावे लागले व पुढील काळात सारे काही सुरळीत होईल व अशातऱ्हेच्या अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार नाही असे आश्वासनही द्यावे लागले.

परंतु दुर्दैवाने ‘ये रे मागल्या’ चालूच राहिले व त्या आश्वासनाची पूर्तता कधीच झाली नाही. विद्यार्थ्यांच्या नाट्य निर्मितीच्या मार्गात येणारे हे अडथळे गेल्या वर्षीपर्यंत चालू होते. 

गेल्या वर्षी कला अकादमीने 12 लाखांची तरतूद करून या नाट्य निर्मितीच्या निमित्ताने नाट्य महाविद्यालयाची जी उधारी थकली होती ती शेवटी कशीबशी फेडली. (अजूनही काही जणांचे मिळून दोन लाख देणे बाकी आहे असे ऐकिवात आहे.) मात्र पूर्वीची उधारी फेडली तरी तिसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या सेमिस्टर प्रॉडक्शनचा घोळ मात्र सोडवला गेला नव्हता. 

हे सारे कशामुळे होते? विद्यार्थ्यांच्या नाट्य निर्मितीसाठी रकमेची तरतूद का होत नाही हा प्रश्न कला अकादमीचे सध्याचे सदस्य सचिव अरविंद खुटकर यांना केला असता त्यांचे उत्तर होते, 'नाट्यमहाविद्यालयाचे गेल्या कित्येक वर्षांचे ऑडिट अजून तुंबून राहिलेले असल्यामुळे त्यांना पुढील निधी देण्यात अडचण निर्माण होते.'  सध्याचे प्राचार्य राजय पवार यांनी या महाविद्यालयाचा अधिभार गेल्या दोन वर्षांपासूनच स्वीकारला आहे. ते म्हणतात, 'माझ्या पुर्वी ऑडिटचे काम बाकी का राहिले याचे उत्तर मी देऊ शकत नाही.‌ 20-21चे ऑडिट झाले आहे. 21 नंतरचे काम चालू आहे.'

तुंबलेल्या ऑडिटची ही स्थिती लक्षात घेतली तर 'ऑडिट पूर्ण नाही म्हणून निधी वेळेवर नाही' हे दुष्टचक्र एवढ्यात संपण्याचे चिन्ह दिसत नाही. यावर्षींच्या पहिल्या सेमिस्टरची प्रॉडक्शन मात्र (पन्नास हजार रुपये प्रत्येकी) पैशांची तरतूद होऊन सादर झाली आहेत. हा दिलासा असला तरी ऑडिटच्या अपूर्णतेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भविष्यात कशाला तोंड द्यावे लागेल याची शाश्वती नाही. 'समस्या आहेत' हे कला अकादमीचे सदस्य सचिव मान्य करतात व त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्नदेखील कशोशीने होत आहे असेही सांगतात. 

नाट्य महाविद्यालयाच्या सुरुवातीपासून त्यात अनेक गैरप्रकार झाले आहेत. सुरुवातीच्या काळात पात्र नसलेल्या (unqualified) शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिकून घ्यावे लागले आहे. अशा शिक्षकांवर वारेमाप खर्च झालेल्या रकमेबद्दल ऑडिटमध्ये प्रश्न उपस्थित झाले असतीलच.‌‌ ऑडिट अडून राहण्याचे ते देखील एक कारण असू शकते. नाट्य महाविद्यालयात शिक्षक नेमण्यासंबंधी 'यूजीसी'चे काही नियम आहेत‌‌ परंतु या नाट्यमहाविद्यालयात या नियमांना फाटा देऊन शिक्षकभरती केली गेली आहे व याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही निश्चितपणे झालेला आहे.

या महाविद्यालयासाठी नवीन अद्यावत अशी इमारत असणे गरजेचे आहे.  त्यासाठी कागदोपत्री हालचाली देखील सुरू झाल्या आहेत परंतु पुढील किमान चार ते पाच वर्षे ही इमारत बांधून पूर्ण होईल याची खात्री देता येत नाही. सध्या ज्या इमारतीत (राजीव गांधी कला मंदिर) या नाट्य महाविद्यालयाचे वर्ग भरतात तेथे सुविधांच्या उणीवा तर आहेच परंतु या इमारतीलाच अजून अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. (नगरपालिकेचे 'ओक्युपन्सी' प्रमाणपत्र इमारतीला नसल्यामुळे हे झाले आहे असे काही जण सांगतात.) त्यामुळे तिथे काही अनावस्था प्रसंग घडल्यास त्याची जबाबदारी कुणावर असेल? 

सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे सध्या या महाविद्यालयाची प्रशासकीय समिती (governing body) अस्तित्वात नाही. गेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळ संपून एक वर्ष उलटून गेले. नवीन समिती बनवण्याचे काम कला अकादमीचे आहे.‌

परंतु त्या दृष्टीने कुठलीही पावले उचलली जाताना दिसत नाही. प्रशासकीय समितीविना महाविद्यालय काम करू शकते अशीच कदाचित कला अकादमीची कल्पना असेल कारण जुन्या प्रशासकीय समितीची बैठक देखील तिच्या कार्यकाळात फक्त एकदाच झालेली होती व महाविद्यालयाचे कामकाजही आपल्या परीने चालूच होते. ते तशाच प्रकारे चालू राहावे अशीच कला अकादमीची कदाचित इच्छा असू शकेल.

कलाकार हा शेवटी चिवट असतो. कमतरतांची पर्वा न करता तो अनेकदा आपला मार्ग आक्रमक गेला आहे. नाट्य शाळेचे विद्यार्थीदेखील याला अपवाद नाहीत.‌ मात्र त्यांचे म्हणणे आहे सत्य स्थिती आमच्यापासून लपवून ठेवू नका. आम्हाला विश्वासात घ्या. मुख्य म्हणजे आमचे म्हणणे ऐकून घ्या. ‌‌एखादी गोष्ट ठामपणे मांडणाऱ्या विद्यार्थ्याला टार्गेट केले जात असल्यामुळे अनेकदा आम्ही आमचे म्हणणे मांडायला पुढे येत नाही.‌ पण याचा अर्थ सारे आलबेल असते असे नाही. या महाविद्यालयात तर नाहीच नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT