
Kala Academy School Of Drama Updates
पणजी: कला अकादमीच्या नाट्यमहाविद्यालयाच्या संकेतस्थळावर जर तुम्ही गेलात तर त्यांच्या होमपेजवर एक जबरदस्त ब्रीदवाक्य दिसते... ‘लर्न टू परफेक्शन’ आणि पुढची ओळ आहे ‘फुली डेव्हलप्ड इन्स्टिट्यूशनल कॅम्पस विथ सेव्हरल थिएटर्स अँड स्टुडिओज फॉर बॅटर लर्निंग’ (उत्तम शैक्षणिक अनुभवासाठी अनेक नाट्यगृहे आणि स्टुडिओ असलेला पूर्णपणे विकसित परिसर).
त्यानंतर कला अकादमीच्या परिसराची सुंदर चित्रे एका मागोमाग एक होमपेजवर उमटत राहतात. आणखी एक ओळ म्हणते, ‘अत्याधुनिक पायाभूत सुविधा, पूर्णपणे प्रगत स्टुडिओ, हाय एंड उपकरणे आणि सुसज्ज असलेले बरेच काही’. पण ज्यांना सत्य परिस्थिती ठाऊक आहे त्याला हे माहिती आहे की ही सारी फसवणूक आहे.
कला अकादमीच्या वास्तुमधून हे नाट्यमहाविद्यालय सुमारे पाच वर्षांपूर्वी फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात हलवले गेले आहे. निमित्त होते कला अकादमीच्या वास्तूचे होणारे नूतनीकरण. त्यावेळी विद्यार्थ्यांना हे आश्वासनही देण्यात आले होते की नऊ महिन्यांनंतर हे महाविद्यालय पुन्हा कला अकादमीच्या वास्तूत परतेल.
हे आश्वासन कुठल्या भरवशावर दिले गेले होते हे फक्त आश्वासन देणाऱ्यांनाच ठाऊक होते कारण त्यानंतर पुढील तीन वर्षे कला अकादमीचे नूतनीकरण ताटकळत राहिले आणि आता तर अशी परिस्थिती आहे की हे महाविद्यालय तिथे पुन्हा परतणे शक्यच नाही.
मात्र ज्यांना या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे (विशेषत: परराज्यातील विद्यार्थी) त्यांच्यासमोर भ्रामक चित्र निर्माण करण्यासाठी कदाचित, नाट्यमहाविद्यालयाच्या संकेतस्थळावर कला अकादमीच्या वास्तूची सुंदर चित्रे अजूनही तशीच ठेवली गेली आहेत.
फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात हलवल्या गेलेल्या नाट्य विद्यालयाची स्थिती तरी काय आहे? काल तिथे घडलेला एक प्रसंगच तिथली स्थिती काय आहे याचे चित्र स्पष्ट करणारा आहे. परंतु हा प्रसंग काय आहे तो समजण्याआधी या नाट्यमहाविद्यालयाचे वर्ग तिथे कसे चालतात हे समजून घेणे रोचक ठरेल.
हे नाट्यमहाविद्यालय विद्यार्थ्यांना चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम देते. या चार वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी तिथे किमान चार व्यवस्थित वर्ग असणे जरुरीचे आहे. त्याशिवाय नाट्यमहाविद्यालयाच्या प्रोस्पेक्ट्समध्ये नमूद केल्याप्रमाणे मुलांनी जर ‘स्पेशिलायझशन’मधील वेगवेगळे विषय निवडले तर तिथे अतिरिक्त वर्गांची व्यवस्था करणेही आवश्यक आहे.
त्याशिवाय नाट्यमहाविद्यालय म्हटल्यावर तालमींसाठी जागा, वाचनालयाची सोय, नेपथ्य निर्मितीसाठी जागा, सादरीकरणासाठी नाट्यगृह या गोष्टीही गरजेच्या असतात. तसेच खेळ हा विषयही त्यात समाविष्ट असल्याने खेळासाठी मैदानाचीही गरज असते. या किमान सुविधा एका नाट्यमहाविद्यालयासाठी आवश्यक असतात.
वर्ग म्हटल्यावर एक विशिष्ट चित्र डोळ्यांसमोर येते. ज्यात शिक्षकाला शिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी योग्य अवकाश आणि योग्य सामग्री उपलब्ध करून दिलेली असते. राजीव गांधी कला मंदिरात विद्यार्थ्यांचे वर्ग ज्या जागेत चालतात त्यांची स्थिती पाहिल्यास या नाट्यमहाविद्यालयाने आपल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना ‘तडजोडी’ची हद्द गाठायला लावली आहे असेच दिसते.
राजीव गांधी कला मंदिराचा कॉन्फरन्स हॉल, रिहर्सल हॉल, एरिना थिएटर, जुनी लायब्ररीची जागा, ओपन एअर थिएटर या जागेत (त्या त्या जागेच्या उपलब्धतेनुसार) हे वर्ग घेतले जातात. जर एखाद्या कार्यक्रमासाठी या जागेचे बुकिंग बाहेरच्या कुणी केले असेल तर मग आयत्या वेळी दुसऱ्या जागाही शोधल्या जातात.
अशावेळी मग राजीव गांधी कला मंदिराच्या इमारतीबाहेर असलेले वडाचे झाड किंवा पार्किंगची जागा इथेही मुलांना एकत्र जमवून वर्ग घेतले जातात. त्याशिवाय जर घुमट आरती स्पर्धेसारखे कार्यक्रम या कला मंदिरात असतील तर तो सबंध दिवस विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीचा बनलेला असतो. कारण स्पर्धक मंडळी या इमारतीत अनेक ठिकाणी बसून आपला सराव, आपली तयारी करत असतात. असे अनेकदा घडले आहे की नाट्यमहाविद्यालयाचे वर्ग अशा कार्यक्रमांच्या वेळी घेणे दुरापास्तच ठरले आहे.
आज घडलेला प्रसंग अशाच तडजोडीतून उद्भवलेला होता. इमारतीतील कॉन्फरन्स हॉलमध्ये ठरलेला तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ‘प्रॉडक्शन’ वर्ग तिथं होणाऱ्या दुसऱ्या अन्य कार्यक्रमामुळे रद्द करावा लागला आणि विद्यार्थ्यांना जुन्या लायब्ररीच्या जागेत स्थलांतर करावे लागले. मात्र तिथं काम करत असताना या खोलीच्या छपराचा एक भाग निखळून पडला. सुदैवाने वर्गात असलेल्या मुलांना कुठलीच इजा न होता ती बचावली.
वर्गांची कमतरता किंवा वर्गांसाठी अयोग्य जागा हीच या नाट्यमहाविद्यालयाची समस्या आहे काय? विद्यार्थ्यांकडे या संबंधाने बोलल्यानंतर या महाविद्यालयाच्या संबंधात असलेल्या आणखीनही काही तीव्र समस्या समोर आल्या. त्या समस्या पाहता मुळातच हे नाट्यमहाविद्यालय विद्यार्थी केंद्रित आहे का, हाच प्रश्न उपस्थित होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.