Kala Academy: '9 ते 5 वेळेत नाटक बसवा' ही प्रवृत्ती नाट्यमहाविद्यालयात काय कामाची?

Kala Academy School Of Drama: पेडणेपासून काणकोणपर्यंतचे आणि पणजीपासून केरीपर्यंतचे विद्यार्थी या नाट्यमहाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्याशिवाय परराज्यातील मुलेही या नाट्यमहाविद्यालयात शिकायला येतात.‌
Kala Academy School Of Drama
Drama School GoaDainik Gomantak
Published on
Updated on

कला अकादमीचे ‘गोवा’ज कॉलेज ऑफ थिएटर आर्ट’ हे गोव्यातील एकमेव नाट्यमहाविद्यालय आहे. पेडणेपासून काणकोणपर्यंतचे आणि पणजीपासून केरीपर्यंतचे विद्यार्थी या नाट्यमहाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्याशिवाय परराज्यातील मुलेही या नाट्यमहाविद्यालयात शिकायला येतात.‌

पणजी येथील कला अकादमीच्या वास्तुत जेव्हा हे नाट्यमहाविद्यालय सुरू झाले तेव्हा त्यात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी आतुर होते.‌ नाटकाचे शास्त्रशुद्ध आणि प्रगत शिक्षण या अद्ययावत वास्तुत मिळेल अशा अपेक्षेने ते या नाट्यमहाविद्यालयाकडे पाहत होते. दूर दूर ठिकाणाहून विद्यार्थ्यांनी या नाट्यमहाविद्यालयात प्रवेश घेतला होता.‌ त्यामुळे साहजिकच राहायची सोय हा त्यांच्यापुढील महत्त्वाचा प्रश्न होता.

इतर महाविद्यालयाप्रमाणे ‘नऊ ते पाच’ या वेळेत नाट्यमहाविद्यालयाचे कामकाज उरकले जाऊ शकत नाही.‌ नाटकाच्या तालमीना, इतर नाट्यप्रयोगांना हजर असणे या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय कला अकादमीच्या रिपर्टरी कंपनीसाठी/थिएटर फॅकल्टीसाठी असलेल्या हॉस्टेलमध्ये करण्यात आली. 

नाट्यमहाविद्यालयचे स्थलांतर फोंडा शहरातील राजीव गांधी कला मंदिरात होईपर्यंत विद्यार्थ्यांची हॉस्टेलसंबंधी काही तक्रार नव्हती.‌ मात्र नाट्यमहाविद्यालयाचे स्थलांतर झाल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला.

नेहमी फोंडा ते पणजी असा प्रवास त्यांना करावा लागायचा.‌ खरी अडचण तेव्हाच यायची जेव्हा त्यांच्या नाटकाच्या तालमी रात्री उशिरापर्यंत चालू राहायच्या. त्यामुळे फोंडा शहरातच आपल्यासाठी हॉस्टेल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी त्यांनी आपल्या महाविद्यालयाला केली.‌ त्यानुसार महाविद्यालयाने गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये रिकाम्या असणाऱ्या खोल्यात त्यांची राहण्याची व्यवस्था केली.

मात्र तिथल्या खोल्यांमध्ये पाणी आणि वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा पणजी येथील हॉस्टेलमध्ये जाणेच पसंत केले. पण त्यामुळे त्यांच्या राहण्याचा प्रश्न अधिकच जटिल होत गेला. आता तर अशी अवस्था आहे की या सध्या तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलच उपलब्ध नाही. हॉस्टेलची मागणी करून करून विद्यार्थी थकले आहेत.

या नाट्य महाविद्यालयाचे प्राचार्य राजय पवार यांच्याकडे चौकशी केली असता ते सांगतात की, गोवा इंजिनीयरिंग कॉलेजचे हॉस्टेल त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिले आहे.‌ मात्र या हॉस्टेलचा नियम आहे की विद्यार्थी हॉस्टेलमध्ये संध्याकाळी  ७.३० वाजेपर्यंत परतला पाहिजे.

नाट्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी हे सोयीचे नाही. त्यांचे म्हणणे आहे की कॉलेजची वेळ संपल्यानंतरही आम्हाला आमच्या तालमींसाठी अनेक वेळा उशिरापर्यंत कॉलेजमध्येच रहावे लागते.‌ त्यामुळे संध्याकाळी ७.३० वाजता बंद होणारे हॉस्टेल आम्हाला कसे काय उपयोगी पडू शकते? त्याशिवाय हे हॉस्टेल महागडे आहे (मेस धरून रुपये २०,०००/- प्रती सेमिस्टर) ही गोष्ट वेगळी.‌

संध्याकाळी ७.३० वाजता बंद होणारे हॉस्टेल नाट्यमहविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी कसे योग्य ठरू शकते हा प्रश्न प्राचार्य राजय पवार यांना विचारता असता त्यांनी दिलेले उत्तर हैराण करणारे होते. ते म्हणाले, ‘होस्टेलमध्ये ७.३० वाजता पोहोचणे ही समस्या असू नये कारण कॉलेज ५.३० वाजता सुटते.  मी माझ्या शिक्षकांना सांगितले आहे की बोर्ड ऑफ स्टडीजनुसार जी वेळ नमूद केली आहे त्यानुसारच आणि त्या तासांमध्येच जे काही बसवायचे आहे ते बसवा.

त्या तासांतच तुमच्या कंटेँटला न्याय द्यावा लागेल. कॉलेज सुटल्यानंतरही कॉलेजमध्ये तालमी वगैरे होत असतील तर कुणाचे तरी पोर्शन पूर्ण झाले नाही म्हणून तसे होत असेल. आम्ही जेव्हा दुसऱ्यांचे हॉस्टेल वापरतो, तेव्हा त्यांच्या नियमाप्रमाणे वागायला नको का?’ 

कला अकादमीचे हे नाट्यमहाविद्यालय जगातील एकमेव नाट्यमहाविद्यालय असेल की जे आपल्या विद्यार्थ्यांना सकाळी १० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून नाट्यशास्त्राची पदवी मिळवण्याचा सल्ला देत असेल.

अत्यंत हास्यास्पद अशा या नियमातून‌ हे नाट्यमहाविद्यालय कुठल्या प्रकारच्या नाट्यकलाकारांची निर्मिती करू पाहात आहे? अभ्यासक्रमाच्या विषयाचा आणि गरजेचा विचार न करता केवळ प्रशासनिक शिस्तीचा हट्ट बाळगून या महाविद्यालयाला केवळ पदवीबहाद्दर (कलाकार) तयार करायचे आहेत काय?

महाविद्यालयाच्या प्रोस्पेक्ट्समध्ये नमूद केलेला  खुद्द त्यांचाच अध्यादेश  सांगतो की या परफॉर्मिंग आर्ट्समध्ये ‘पूर्णवेळ’ व्यावसायिक प्रशिक्षण देणे आणि नाटकाला समर्पित परफॉर्मिंग प्रशिक्षित पदवीधर तयार करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. या ‘पूर्णवेळे’चा अर्थ प्राचार्य राजय पवार यांना समजला नसेल काय?

Kala Academy School Of Drama
Kala Academy: अपुरे वर्ग, सुविधांची वानवा! ‘तडजोडी’ची हद्द गाठलेले कला अकादमीचे नाट्यमहाविद्यालय

नियोजनात नाट्य निर्मितीसाठी वर्षाला १२० तास ठरवले गेले आहे. ज्याने कोणी हे ठरवले आहे त्यांना नाट्य विद्यालयाच्या नाटकाची निर्मिती १२० तासात होणे कठीण आहे हे ठाऊक नसेल काय ? स्पर्धेसाठी नाटक बसवणार्‍या संस्था देखील नाट्यनिर्मितीसाठी १२० तासांपेक्षा अधिक काळ घेत असतात आणि इथे तर विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा प्रश्न आहे.‌

त्यात त्यांना नाटकाचा आशय समजून घ्यायचा आहे,  वेशभूषा/नेपथ्य रचना करायची आहे, त्याची निर्मिती स्वत: करायची आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना नाट्यनिर्मिती करताना (रात्री उशिरापर्यंत काम करून) १२० तासांपेक्षा अधिक काळ काम करण्याबद्दल अजिबात तक्रार नाही. तक्रार जर कुणाला असेल तर ‘आशयपूर्ण नाट्यनिर्मिती’ कशी होते याची प्रक्रिया न जाणणाऱ्या नोकरशाही प्रवृत्तीलाच. जे काही करायचे असेल ते ‘तासांमध्ये बसवा’ असली ही प्रवृत्ती एका नाट्यमहाविद्यालयात काय कामाची? 

Kala Academy School Of Drama
Kala Academy: कला अकादमीची 'रंगमेळ' रॅपटरी बंद; कलाकार संतप्त

सध्या नाट्यमहाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांसाठी हॉस्टेल नाही हे वास्तव आहे. ‘सात वाजता घरी’ हे अगदी कौटुंबिक जिव्हाळ्याचे धोरण स्वीकारल्यामुळे नाट्यमहाविद्यालयाला हॉस्टेलचा प्रश्न तळमळीने हाताशी घ्यावा असे वाटत नाही. ‘आम्ही खूप ठिकाणी हॉस्टेलसाठी प्रयत्न केले’ असे जरी त्यांचे म्हणणे असले तरी कला अकादमीसारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या एका प्रतिष्ठित सरकारी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल सापडू नये ही नामुष्कीची गोष्ट नाही आहे काय?  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com