संतोष कुबल
माझे वय ७५ उतारवयात आरोग्याच्या समस्या असणारच. मलाही त्या होत्या. चालताना पाय दुखणे, पायांना सूज येणे, गुडघे दुखणे, मांड्या, भुजा दुखणे आदी. या दुखण्यांमुळे खूप त्रास होत होता. आड पडले की थोडे बरे वाटायचे; पण ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’. जगणे नकोसे झाले होते. त्यात हृदयविकार उद्भवला. अशा बिकट स्थितीत मला आधार मिळाला योगाचा, किंबहुना योग माझ्यासाठी, माझ्या जीवनासाठी ‘नवसंजीवनी’च ठरला. जयश्री कुरूप आपल्याबद्दल भरभरून बोलत होत्या.
मूळ गडहिंग्लज येथील; पण गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून गोव्यात सांताक्रुझ-बांबोळी येथे राहणाऱ्या जयश्री कुरूप यांच्या घरात पाऊल ठेवताच मन प्रसन्न झाले. छोटेसे देवघर आणि अगरबत्तीच्या सुगंधाचा दरवळ. जवळच योगा, प्राणायामाचे महत्त्व सांगणारी पुस्तके आणि अन्य गोष्टी. एकंदरीत आढावा घेतला असता हे सर्व कुटुंबच योगाकडे वळल्याचे दिसून आले.
जयश्री म्हणाल्या, १४-१५ वर्षांपूर्वी अचानक माझ्या पायांना सूज येऊ लागली. चालताना खूप त्रास व्हायचा. गुडघेही दुखायचे. डॉक्टर, औषधोपचार झाले. तेवढ्यापुरते बरे वाटायचे; पण पुन्हा दुखणे सुरू व्हायचे. जीव वैतागला होता, नकोसा झाला होता. अशा स्थितीत देवाने ‘देवदूत’ पाठवावा, तशी स्नेहा नाईक नावाची मैत्रीण माझ्या संपर्कात आली. तिने मला योगासने करण्याचा सल्ला दिला. योगाचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यासाठी सांताक्रुझहून बांबोळीला जाताना चढावाच्या ठिकाणी असलेल्या ‘रुग्णाश्रय’मध्ये जाण्याचा सल्ला दिला.
एवढे उपचार करूनही बरे वाटत नसल्याने योगाकडे वळले. सायं. ५ ते ७ वा. या वेळेत दररोज ‘रुग्णाश्रय’मध्ये योगासने करायला जाऊ लागले. तेथे शशी नावाच्या प्रशिक्षक महिलेकडून योगाचे धडे मिळाले. सुरुवातीला थोडा कंटाळा आला; पण नंतर न चुकता दररोज योगा करून लागले आणि काय आश्चर्य, माझ्या जीवनात बदल घडून येऊ लागले. पायांचे दुखणे कमी झाले. गुडघादुखीतूनही बऱ्यापैकी सावरले. आता मी वयाच्या ७५व्या वर्षीही निरोगी आहे. विशेषत: कोणत्याही दुखण्यापासून दूर.
दररोज सकाळी ५ वाजता उठते. योगासने करून झाल्यानंतर घराबाहेर जाऊन थोडा फेरफटका मारते. त्यानंतर घरातील कामांमध्ये मदत करते. भाजीपाला-कडधान्य निवडणे, कपडे वाळत टाकणे, झाडांना पाणी देणे, देवपूजा करणे आदी घरातील लहानसहान कामे आनंदाने करते. दुपारी जेवण झाल्यानंतर थोडी विश्रांती. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता ‘रुग्णाश्रया’त योगाला जाणे, असा आपला दिनक्रम असल्याचे जयश्री सांगतात.
तुम्ही लोकांना काय सल्ला द्याल? असा प्रश्न विचारला असता, जयश्री म्हणाल्या, प्रत्येकाने... मग ती व्यक्ती कुठल्याही वयोगटातील असो, त्याने योगासने, प्राणायाम केलेच पाहिजे. त्यामुळे आरोग्य निरोगी राहते आणि दिवसभर काम करण्याची उमेद, ऊर्जा मिळते. अलीकडचे बहुतांश युवक व्यसनांच्या आहारी गेल्याचे दिसून येते. त्यांना मी एवढेच सांगेन, व्यसनांत बरबटून आयुष्याची राखरांगोळी करण्यापेक्षा योगाकडे वळा. आपले जीवन सुधारा. कारण या देशाला जशी तुमची गरज आहे, तशीच तुमच्या कुटुंबालाही तुमची गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.