केळबाय देवस्थान Dainik Gomantak
गोवा

मयेतील केळबाय देवीचा ‘पण’ अपूर्णच

‘माले’ अखेर पेटलेच नाही: अधिकाऱ्यांची शिष्टाई पुन्हा असफल

दैनिक गोमन्तक

डिचोली: मयेतील श्री माया केळबाय देवस्थानची प्रसिद्ध ‘माल्याची जत्रा’ झाली खरी; पण या जत्रेतील प्रमुख वैशिष्ट्य असलेले ‘माले’ अखेरपर्यंत पेटलेच नाही. अधिकारावरून वाद निर्माण झाल्याने शेवटपर्यंत माले मंदिराबाहेर काढले नाही. माले पेटले नसल्याने देवीचा ‘पण’ अपूर्ण राहिला. शिवाय माले नृत्याचा दैवी चमत्कार अनुभवण्यासाठी आलेल्या भक्तांचा भ्रमनिरास झाला.

दुसऱ्या बाजूने काही पारंपरिक रितीरिवाजांना फाटा देत मये गावात वास्तव्यासाठी आलेल्या मुळगावच्या श्री केळबाई देवीच्या पेठेचे मध्यरात्री मुळगावला प्रयाण झाले, तर आज पहाटे मयेतील पेठ केळबाय देवीच्या मंदिरात नेण्यात आली. गेली दोन वर्षे माल्याची जत्रा झाली नव्हती. यंदा ‘माले’ पेटले नसल्याने हजारो भक्तांचा भ्रमनिरास झाला.

माले मंदिराबाहेर काढलेच नाही

रात्री तरंगांसह वाजतगाजत केळबाय देवीच्या मंदिरातून ‘माले’ चव्हाटा येथे आणल्यानंतर जत्रेतील प्रमुख विधी होतात. शनिवारी रात्री माले आणतेवेळी माल्याला हात लावण्याच्या अधिकारावरून देवस्थान समिती आणि दुसऱ्या गटामध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर रात्रीच मयेत दाखल झाले. कुंभारवाडा येथे त्यांनी संयुक्त बैठकही घेतली. या बैठकीवेळी आमदार प्रेमेंद्र शेट हेही उपस्थित होते. मात्र, शेवटपर्यंत तोडगा न निघाल्याने माले मंदिराबाहेर काढलेच नाही.

जत्रेचा उत्साह कायम

गुरुवारी पहाटे मयेतील श्री केळबाय देवीची पेठ मंदिराबाहेर काढण्यावरून वाद झाला. मात्र, नंतर अधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा काढल्यानंतर १२ तासांच्या प्रतीक्षेनंतर पेठ मंदिराबाहेर काढून चव्हाट्यावर नेण्यात आली. पेठ मंदिराबाहेर काढल्याने ‘माल्याची जत्रा’ करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. तीन वर्षांच्या कालखंडानंतर शनिवारी माल्याची जत्रा होणार असल्याने यंदा भाविकांचा महापूर लोटला होता. सकाळी धार्मिक विधी झाल्यानंतर गावकरवाडा येथून श्री रवळनाथ आणि श्री भूतनाथच्या तरंगांचे वाजतगाजत केळबायवाडा येथील श्री केळबाय देवीच्या मंदिरात आगमन झाले.

मुळगावच्या पेठेचे प्रयाण

गुरुवारी पहाटे आगमन झालेल्या आणि गेले तीन दिवस मये गावात वास्तव्य केलेली मुळगावच्या श्री केळबाई देवीची पेठ नेण्यासाठी शनिवारी मध्यरात्री मुळगावातील भाविक मयेत आले होते. माले आणि तरंगांचे आगमन होताच निरोप घेऊन मुळगावची पेठ जाण्यासाठी मार्गस्थ होते. पण मध्यरात्र उलटून गेली तरी माले आणि तरंगे येण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट होताच मुळगावच्या भाविकांनी चव्हाट्यावरील पेठ बांधून सजवली. नंतर गाऱ्हाणे घालून अवसारी मोडासह ही पेठ मुळगावकडे मार्गस्थ झाली. पहाटेच्या सुमारास केळबाय मंदिरातून तरंगे परस्पर गावकरवाडा येथील मंदिरात नेण्यात आली. तर चव्हाट्यावरील मयेतील देवीची पेठ बांधून श्री केळबाय मंदिरात आणली.

माले नृत्याविष्काराला भाविक मुकले

गाऱ्हाणे घातल्यानंतर मोडाच्या अंगात अवसर संचारल्यानंतर डोक्यावरील पेटत्या माल्यासह चौखांबावर अवसारी मोडाकडून नृत्य करण्यात येते. श्री केळबाय देवीचा ‘पण’ पूर्ण करण्यात येतो. मात्र, माले पेटले नसल्याने ‘पण’ पूर्तीही झाली नाही आणि भाविकांना नृत्याचा थरारही अनुभवता आला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

Goa Opinion: ‘गोंयकारांनी’ घरांसाठी सरकारी दयेवर अवलंबून राहावे का?

Diwali In Goa: 'तिखशे फोव, वझ्या’त खाजीचे लाडू, फेणोरी, चुरमो'! गोव्यातील आगळीवेगळी दिवाळी

Ravi Naik: गोव्याच्या राजकारणाला वळण देण्याची हिकमत असलेला नेता 'रवी नाईक'

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

SCROLL FOR NEXT