Indiranagar Slum in Goa Dainik Gomantak
गोवा

Indiranagar Slum in Goa : इंदिरानगर ही गोव्‍याची ‘धारावी’च!

गोव्यातील मोठी झोपडपट्टी; गटार, शौचालयांची दयनीय स्‍थिती; गुंडगिरीशी जवळचा संबंध

गोमन्तक डिजिटल टीम

Indiranagar Slum in Goa : चिंबल पंचायत क्षेत्रातील इंदिरानगर हा तसा मुस्लिमबहुल लोकसंख्या असलेला परिसर. परंतु येथे इतर धर्मीय लोकही राहतात आणि विशेष बाब म्हणजे या परिसरात मशीद आणि एक मंदिरही आहे. अकरा सदस्य असलेल्या चिंबल पंचायतीतील पाच सदस्य निवडून देणारा इंदिरानगर हा लोकवस्तीचा भाग काँग्रेसचा पाठिराखा राहिला आहे. माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांना येथील लोक आजही मानतात आणि या मतांवरच त्यांचा विजय निश्‍चित असायचा. आता काही प्रमाणात येथील मतांचे ध्रुवीकरण झाले असले तरी फार मोठा कायापालट या वस्तीने केला असेही दिसत नाही.

सुरेंद्र फुर्तादो सांगतात, तत्कालीन मुख्यमंत्री राणे यांनी त्यावेळी ठामपणे निर्णय घेत पोलिस बंदोबस्तात ही वस्ती हटविली. त्यावेळी आपल्या पाहण्यात पन्नासच्यावर घरे दाटीवाटीने सांतिनेज खाडीच्या भोवती व परेड मैदानाला लागून होती. केंद्र सरकारचा उपक्रम असलेले बालभवन कांपाल परिसरात उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर झोपडपट्टी हटविण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यावेळी या झोपडपट्टीत राहणारा आणि मिळेल ते काम करणारा मजूर वर्ग असल्याने त्यांचे स्थलांतर करावे म्हणून चिंबलमधील जागा स्थलांतरासाठी निश्‍चित केली. त्या वस्तीचे पुढे इंदिरानगरात रुपांतर झाले.

रुडॉल्फ फर्नांडिसना होतेय आईची आठवण

आपली आई आमदार होण्यापूर्वी ही झोपडपट्टी वसल्याची आठवण सांगताना आमदार रुडॉल्फ फर्नांडिस म्हणतात की, या मतदारसंघाला ज्या पद्धतीने विकासनिधी मिळायला हवा होता, तो मिळाला नाही. चिंबल परिसरात हा भाग येतो. या परिसरात पायाभूत सुविधाही उभारल्या गेल्या नाहीत. ज्या उभारल्या आहेत, त्या अपुऱ्या आहेत. याठिकाणी सर्वधर्मीय लोक राहतात. आई व्हिक्टोरिया फर्नांडिस यांच्यामागे इंदिरानगर परिसर सतत पाठिशी राहिला. त्यामुळे आजही या ठिकाणी आपल्या आईला मानणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. आपण दोनवेळा विधानसभेची निवडणूक लढविली, पण त्यात अपयश आले. परंतु 2022 मध्ये हा परिसर आपल्या पाठिशी राहिल्याने विधानसभेत पोहोचलो. या परिसराचा कायापालट करण्याचा संकल्‍प रुडॉल्फ यांनी सोडला आहे.

निकाल फिरविण्याची ताकद

1980 च्या दशकात ही वस्ती वसली. त्यावेळी सरकारी दप्तरी नोंद असल्याप्रमाणे केवळ 360 कुटुंबांना त्याठिकाणी राहण्याची सोय करण्‍यात आली होती. माजी सरपंच चंद्रकांत कुंकळकर यांनी सांगितले की, ही वस्ती अलीकडच्‍या काळात फारच वाढली आहे. सरकारने या वस्तीला जागा दिली आणि ती सरकारी मालकीची असल्याने घरांची संख्या वाढली. त्‍यामुळे ही वस्‍ती पंचायतीचा एक भाग बनली. सुमारे साडेचार हजारांवर याठिकाणी मतदार आहेत आणि पाच सदस्यांचे भवितव्य त्यांच्या हाती असते, असेही त्यांनी सांगितले. पंचायतीला ज्या पद्धतीने निधी मिळायला हवा होता, तो मिळत नसल्याने याठिकाणी विकासकामे झालीच नाहीत. मूलभूत सुविधांचा तर पत्ताच नाही. त्‍यामुळे हा परिसर बकाल बनला आहे. सरकारने त्‍याकडे आता तरी लक्ष देणे गरजेचे बनले आहे, असे कुंकळकर म्‍हणाले.

जलस्रोतांची मोठी हानी

दाटीवाटीने वस्ती असलेल्या भागात गटारांची आणि शौचालयांची काय स्थिती असेल हे सर्वांनाच माहीत आहे. ‘ग्राम स्वच्छता’ अभियानाअंतर्गत घरोघरी शौचालयाच्या उपक्रमांमुळे अनेकांनी घरातील काही भाग शौचालयासाठी उपयोगात आणला. परंतु येथील गटारांची अवस्था दयनीयच आहे. या वस्तीमुळे या परिसरातील मुख्य जलस्रोतांची मोठी हानी झाली आहे, असा आरोप तेथीलच लोक आजही करतात. वस्तीच्या बाजूला असलेल्या अनेक शेतकऱ्यांना या वस्तीचा फटका बसला आहे. निर्मळ पाणी वाहणाऱ्या ओढ्यांना आता गटारांचे स्वरुप या वस्तीमुळेच आल्याचे चिंबलमधील शेतकरी सांगतात.

बेकायदा घरे कायदेशीर करा

2012 मध्ये सांताक्रुझमधून बाबूश मोन्सेरात विधानसभेत पोहोचले. त्यावेळी इंदिरानगरातील घरे कायदेशीर करावीत अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली होती. हे लोक काही दशकांपासून तेथे राहत आहेत. त्यामुळे त्यांची घरे कायदेशीर करावीत, आपण आपल्या जाहीरनाम्यात ही घरे कायदेशीर करू, असे वचन दिल्याचे त्यांचे म्हणणे होते. सध्याच्या घडीला दोन हजारांवर असलेल्या घरातील 80 टक्के घरे बेकायदेशीर आहेत.

पोलिसांनाही होत नव्‍हती हिम्‍मत

काही वर्षांपूर्वी इंदिरानगरात कारवाईसाठी जाण्याचे धाडसही पोलिसांना होत नव्हते, एवढी तेथे दहशत वाटायची. एक प्रकारे इंदिरानगरची तुलना मुंबईतील धारावीच्‍या झोपडपट्टीशी केली जायची. पण आता स्‍थिती बदलू लागली आहे.

वस्तीचे नाते गुन्हेगारीशी

या वस्तीचा छोट्या-मोठ्या गुन्हेगारांशी संबंध आला आहे. काही गुन्हेगार या वस्तीत पकडले गेले आहेत. त्याशिवाय या परिसरात जे काही लोक राजकारण्यांच्या वरदहस्ताने मोठे झाले ते नंतर गुंडागर्दीत ओढले गेले. तेथे सतत भीतीचे वातावरण असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT