देशातील आघाडीची विमान सेवा कंपनी इंडिगो एअरलाईन्स पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली. गोव्यात राहणाऱ्या वैशाली शर्मा या महिलेने लिंक्डइनवर आपल्या विमान प्रवासाचा संतापजनक अनुभव शेअर केला. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले.
दरम्यान, वैशाली शर्मा यांनी 25 मे रोजी गोवा (Goa) ते दिल्ली या 6E-2195 इंडिगो फ्लाईटने प्रवास केला. दिल्ली विमानतळावर उतरल्यावर त्यांच्या सामानाची अवस्था बघून त्यांना धक्काच बसला. त्यांचे चेक-इन केलेले सामान पूर्णपणे खराब झाले होते. ते पाहून त्यांनी तात्काळ यासंबंधीची तक्रार संबंधित कर्मचाऱ्यांकडे केली. त्यांना फोटो देखील पाठवले. एवढचं नाहीतर कॉल्स आणि ईमेल्सद्वारे तक्रारीचा पाठपुरावाही केला. वैशाली यांच्या म्हणण्यानुसार, तीन दिवसांत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे आश्वासन देण्यात आले, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल कंपनीकडून उचलण्यात आले नाही.
वैशाली यांनी त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये लिहिले की, "त्याआधी आणि नंतर अनेक वेळा वेगवेगळ्या नंबरवरुन मला फोन आले. प्रत्येक वेळी सांगण्यात आले की, लवकरच या प्रकरणी ठोस पाऊले उचलली जातील. काळजी करु नका. पण आता आठवडा उलटून गेला. कंपनीकडून ना काही लेखी उत्तर, ना भरपाई, ना कोणतीही जबाबदारी घेण्यात आली."
आपल्या तक्रारीची तात्काळ घेतली जावी यासाठी वैशाली यांनी पोस्टमध्ये इंडिगोचे CEO पीटर एल्बर्स तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही टॅग केले.
वैशाली यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले की, "हे आता केवळ खराब सामानाबद्दल नाही राहिले. हे प्रवाशांबद्दल कंपनीच्या वागणुकीबाबतचा विषय झाला आहे."
दरम्यान, या वैशाली यांच्या तक्रारीवर प्रतिक्रिया देताना इंडिगोने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरुन म्हटले की, "श्रीमती शर्मा आम्हाला हे जाणून खूप वाईट वाटत आहे. आम्ही प्रकरणाची चौकशी करत आहोत. कृपया आम्हाला थोडा वेळ द्या. टीम इंडिगो."
वैशाली यांच्या मते, हा प्रतिसाद केवळ औपचारिक असून अजूनही कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाहीत. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रवाशांमध्ये (Passengers) पुन्हा एकदा विमाने आणि विमान कंपन्यांच्या ग्राहकसेवेबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. दररोज लाखो प्रवासी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करतात. अशा वेळी, प्रवाशांच्या वस्तूंची सुरक्षा आणि नंतर त्यांच्या तक्रारींचे गांभीर्याने निवारण करणे ही विमान कंपन्यांची नैतिक जबाबदारी असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.