पणजी: गेल्या काही दिवसांपासून गोव्यात कोविडबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात ओमिक्रॉन व्हेरियंटची भर पडली आहे. रुग्णांमध्ये जरी लक्षणे सौम्य असली तरी प्रसार झपाट्याने वाढू लागला असल्याने प्रयोगशाळांवरील ताण देखील वाढत आहे. अशात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने माय लॅब कंपनीच्या अँटिजन कोविड टेस्टिंग किट वापरण्याला परवानगी दिली आहे. गोव्यात (Goa) गेल्या आठवड्यापासून होम टेस्टिंग किटची मागणी वाढू लागल्याचे अनेक फार्मसी कर्मचाऱ्यांनी सांगितले. (COVID-19 home testing kit in Goa Latest Updates)
गोव्यातील कोविड-19 (COVID-19) संक्रमित रुग्णांची संख्या वेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, हा किटच्या पाकीटावरील क्यूआर कोड स्कॅन करून आलेला निकाल किती लोक संकेतस्थळावर अपलोड करतात याबाबत शंका आहे. जर आलेला निकाल अपलोड करत नसतील तर ती एक धोक्याची घंटा ठरेल. दरम्यान, होम किट टेस्टिंग कीटच्या चाचणी निकालाच्या अचूकतेबद्दल मात्र लोकांच्या मनात साशंकता आहे. या किटद्वारे आलेले निकाल चुकीचे असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
दरम्यान, जर या किटचे निकाल अचूक आले तर राज्यातील जनतेसाठी ती मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे. कारण अगोदरच संक्रमित आहे की नाही ते समजणार आहे. होम टेस्टिंग किटची मागणी वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आरटीपीसीआर (RT-PCR) चाचणी तसेच रिपोर्टला वेळ लागतो. त्यापेक्षा या होम टेस्टिंग किटच्या साहाय्याने आपण स्वतः घरच्या घरी चाचणी करू शकतो. पंधरा ते वीस मिनिटांत रिपोर्ट समजतो, जेणेकरून आपण संक्रमित असल्याचे समजते.
किटचा वापर कसा करावा?
या किटमधील स्वॅब घेऊन तो दोन्ही नाकपुड्यांमध्ये घालून अनुक्रमे प्रत्येकी पाच-पाच वेळा फिरवावा. नंतर ते द्रावन कुपीत घालायचे व त्या कुपीतील दोन थेंब टेस्ट स्ट्रीपवर टाकायचे. त्यावर एक रेषा उमटली तर निगेटिव्ह जर दोन रेषा उमटल्या तर पॉझिटिव्ह समजावे. मात्र, या टेस्टच्या निकाल यायला वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागल्यास गाह्य धरू नका असे कंपनीचे म्हणणे आहे.
ही किट वापरण्यास सोपे आहे. पंधरा मिनिटांत निकाल समजतो. आपण स्वतः स्वतःच्या घरी बसल्या-बसल्या चाचणी करू शकतो. त्यामुळे या किटची मागणी वाढली आहे.
- प्रसाद तांबा, व्यवस्थापक, सितारा मेडिकल, पणजी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.