...म्हणून लोबो कचरामंत्री होते: भारतीय जनता युवा मोर्चा

लोबो यांच्या नाराजीनाट्य व राजीनाम्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष समीर मांद्रेकर यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली.
Michael Lobo
Michael Lobo Dainik Gomantak

म्हापसा: कळंगुटचे माजी आमदार तथा माजी मंत्री मायकल लोबो यांचा बेकायदा तथा नियमबाह्य व्यवसायांत सहभाग असून त्यांची हॉटेल्स सीआरझेड नियमांचा भंग करीत असल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष समीर मांद्रेकर यांनी केला आहे. (Bharatiya Janata Yuva Morcha attacks Michael Lobo)

Michael Lobo
गोव्यात भाजपचेच होर्डिंग्‍स निवडणूक आयोगाच्‍या कचाट्यातून कसे काय सुटले?

आमदार ज्योशुआ डिसोझा तसेच भाजपचे पदाधिकारी नारायण मांद्रेकर यांच्या उपस्थितीत म्हापसा येथे उत्तर गोवा भाजप (BJP) कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मांद्रेकर म्हणाले की, लोबो यांचे आतापर्यंतचे कारनामे आम्ही टप्प्याटप्प्याने उघडकीस आणणार आहोत. लोबो भाजप नेत्यांकडे सुरुवातीला बार्देशमधील सात उमेदवारींची मागणी करीत होते व नंतर त्यांनी स्वत:ची मागणी कळंगुट व शिवोली अशा केवळ दोन जागांपुरतीच सीमित ठेवून वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांची तीही मागणी पक्षाने धुडकावल्यानेच त्यांनी भाजपचा राजीनामा दिलेला आहे.

मांद्रेकर पुढे म्हणाले, की लोबो यांनी वर्ष 2012 मधील निवडणुकीच्या (Election) वेळी कळंगुट मतदारसंघातील गुरुदास शिरोडकर यांच्यासारख्या प्रामाणिक भाजप कार्यकर्त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. 2017 मधील निवडणुकीत तर त्यांनी साळगावमधील दिलीप परुळेकर, शिवोलीतील दयानंद मांद्रेकर, मांद्रेतील लक्ष्मीकांत पार्सेकर इत्यादी भाजप उमेदवारांना पाडण्याचे काम केले. त्या ज्येष्ठ नेत्यांचा पराभव झाला तर स्वत:ला मंत्रिपद मिळू शकते असा त्यांचा स्वार्थ होता. यापूर्वी लोबो यांनी केदार नाईक, सुधीर कांदोळकर यांच्यासारख्या नेत्यांचा अप्रत्यक्षरीत्या प्रचार केला होता, हे तर जगजाहीरच आहे. पर्रीकर हयात असते तर लोबो यांना मंत्रिपद मिळालेच नसते, असेही मांद्रेकर यांनी स्पष्ट केले.

लोबो अक्षरश: ‘कचरा’मंत्रीच!

मायकल लोबो हे भाजपमधील कचऱ्यासमानच होते व त्यामुळेच त्यांची पात्रता पाहून त्यांना कचरा व्यवस्थापनासंदर्भातील खाते दिले होते. आमच्यासाठी लोबो हे साक्षात कचरामंत्री होते, अशा शब्दांत समीर मांद्रेकर यांनी लोबो यांची खिल्ली उडवली. भाजपमध्ये राहूनही पक्षाविरोधात सातत्याने वक्तव्ये करीत असल्याने लोबो हे आम्हाला कचरामंत्रीच भासायचे, असा टोलाही मांद्रेकर यांनी हाणला.

कळंगुटचे माजी आमदार तथा माजी मंत्री मायकल लोबो यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्‍यास तेथील कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध आहे. कळंगुट काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष बेनेडिक्ट डिसोझा यांनी तर लोबोंना पक्षात घेतल्यास स्थानिक नेते पक्षाचा त्याग करतील, असा इशारा दिला आहे. त्‍यामुळे पक्ष श्रेष्‍ठींवर त्‍यांचा प्रवेश लांबणीवर टाकण्‍याची वेळ आली.

Michael Lobo
गोव्यातील 4 मोठ्या नेत्यांचे भाजपला राम राम

दरम्‍यान, लोबो यांच्‍या खाली झालेल्‍या जागेवर आता कळंगुट भाजपचे अध्यक्षपद भूषविलेले गुरुदास शिरोडकर दावा करण्‍याच्‍या तयारीत आहेत. लोबोंचे एकेकाळचे जवळचे मित्र मानले जाणारे तसेच सध्या आम आदमी पक्षातर्फे कळंगुट येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सुदेश मयेकर यांनी लोबो यांनी भाजपचा दिलेला राजीनामा अपेक्षितच होता असे सांगितले. तसेच आता ‘आप’च्‍या (AAP) विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा केला. येत्या विधानसभा निवडणुकीत कळंगुटच्या राजकीय पटलावरून लोबोंचा पत्ता कायमचा कट करण्यासाठी समविचारी लोकांनी तसेच विरोधकांनी एकत्रित येण्याचे त्‍यांनी मतदारांना आवाहन केले आहे.

दरम्‍यान, शिवोली काँग्रेस गट समितीचे माजी अध्यक्ष राजन घाटे यांनी लोबो यांना पक्षात प्रवेश दिल्यास उपोषणाचा इशारा दिलाय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com