Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: चिंताजनक! दीड वर्षात ड्रग्जसंबंधी गुन्ह्यात वाढ; 6 महिन्यांत 89 जण अटकेत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drug Case राज्यात दर तीन दिवसांनी ड्रग्जचे गुन्हे नोंद होत आहेत. दीड वर्षात हे प्रमाण वाढले आहे. यावर्षी आतापर्यंत जिल्हा, क्राईम ब्रँच तसेच अमलीपदार्थविरोधी कक्षाने एकत्रित मिळून ७० ड्रग्ज प्रकरणांची नोंद केली आहे.

या कारवाईत ८९ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये ५३ जण परप्रांतीय, तर २५ जण गोमंतकीय आहेत. पोलिस यंत्रणेने तशी माहिती जारी केली आहे.

याव्यतिरिक्त ११ जण विदेशी नागरिक असून त्यातील ५ जण नायजेरियन आहेत. विविध प्रकारचा सुमारे ७२ किलो अमलीपदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे २.१७ कोटी रुपये आहे.

राज्यातील किनारी भागातील युवा पिढी ड्रग्जच्या विळख्यात ओढली जात असल्याने ती चिंतेची बाब ठरली आहे. ड्रग्जचा वापर किनारपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात होत असल्याने तपास यंत्रणांची उत्तर गोवा किनारपट्टी भागात ड्रग्ज दलाल व विक्रेत्यांवर नजर ठेवत आहेत.

अमलीपदार्थविरोधी कक्षाने यावर्षी आतापर्यंत २० गुन्हे दाखल केले आहेत, तर क्राईम ब्रँचने ११ गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्या पाठोपाठ कळंगुट पोलिसांनी १०, तर हणजूण पोलिसांनी ८ प्रकरणे नोंद केली आहेत.

पोलिसांनी विदेशी नागरिकांचा व्हिसा तपासणी सुरू केल्यापासून ड्रग्ज प्रकरणात गुंतलेले अनेक नायजेरियन गोव्यातून पलायन करत आहेत. यावर्षी नोंद झालेल्या प्रकरणांमध्ये परप्रांतीय ड्रग्ज विक्रेत्यांची संख्या अधिक आहे.

गोव्याबाहेरील व्यक्ती गोव्यात ड्रग्ज व्यवसायातून झटपट पैसा कमावण्याच्या आमिषातून येतात व या व्यवसायात सामील होतात. हे ड्रग्ज विक्रेते मोठ्या प्रमाणात माल घेऊन फिरत नाहीत.

कारण त्यांच्याकडे ड्रग्ज कमी प्रमाणात सापडल्यास ते जामिनावर सुटू शकतात हे त्यांना माहीत असते. जामीन मिळाल्यावर ते पुन्हा त्याच व्यवसायाकडे वळतात.

गेल्यावर्षी २०२२ मध्ये १५५ ड्रग्ज प्रकरणे नोंद झाली होती व १८४ जणांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये १०१ परप्रांतीय, तर ५४ गोमंतकीयांचा समावेश होता. २९ विदेशी नागरिक होते. त्यात १४ नायजेरियन होते.

२०८ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आला होता. त्याची किंमत सुमारे ५.३५ कोटी रुपये होती. अमलीपदार्थविरोधी कक्षाने २५, तर क्राईम ब्रँचने २५, तसेच कळंगुट पोलिसांनी १६, हणजूण पोलिसांनी २० व पेडणे पोलिसांनी १० गुन्हे दाखल केले होते.

अधिक तर गुन्हे हे उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागातच दाखल झालेले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून या परिसरात वारंवार गस्त तसेच खबऱ्यांकडून माहिती मिळवून छापे टाकण्याचे सत्र सुरूच असते.

२०२१ मध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये १२१ प्रकरणे नोंद झाली होती. त्यामध्ये १३४ जणांना अटक झाली. त्यात ८९ परप्रांतीय, २४ गोमंतकीय तसेच २१ विदेशी नागरिक होते. सुमारे १२९ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आला होता. त्यामध्ये गांजाचे प्रमाण अधिक होते. त्याशिवाय एलएसडी, एक्स्टसी, चरस, कोकेन, हेरॉईन, हशिश, एमडीएमए, ॲम्फेटेमाईन या ड्रग्जचा समावेश होता.

अमलीपदार्थविरोधी दिनी आज जनजागृती रॅली

आज २६ जून हा आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थविरोधी दिन जगभर साजरा केला जातो. त्यानिमित्त अमलीपदार्थविरोधी कक्षातर्फे ताळगाव पठार येथून सकाळी ६ वाजता डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम ते पणजी फेरी धक्क्यापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे.

या रॅलीमध्ये अमलीपदार्थपासून सावध राहा असा संदेश त्यातून दिला जाणार आहे. त्याचबरोबर काही पोलिस स्थानकामार्फत शाळा व महाविद्यालयात ड्रग्जसंदर्भातची माहिती देऊन जनजागृती केली जाणार आहे.

रात्रीच्या पार्ट्यांना युवा पिढी पडते बळी

ड्रग्ज पकडला जातो; पण पुढे त्याचे काय होते? कधी ऑडिट झाले आहे का? ड्रग्स पकडला जातो तो तिथेच जागीच नष्ट केला पाहिजे. तसा सरकारने अध्यादेश काढावा; अन्यथा ही ड्रग्ज साखळी सुरूच राहील. कारागृहात किंवा प्रशासकीय प्रोटेक्टिव्ह होम असतात तिथे ड्रग्ज मिळतो, ही चिंतेची बाब आहे.

- डॉ. ब्रह्मा कुंकळकर, ‘आयपीएचबी’चे माजी अधीक्षक

गोवा ड्रग्जमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती, तसेच पोलिस यंत्रणाही दरवर्षी 26 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थविरोधी दिन राज्यात साजरा करताना शाळा व महाविद्यालयांत जाऊन ड्रग्ज सेवन किती घातक आहे याची जनजागृती करत आहेत.

राज्यात रात्रीच्या ड्रग्ज पार्ट्या सुरू असतात, त्यामध्ये ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून त्याला युवा पिढी बळी पडत आहे.

ड्रग्‍ज सेवनात गोमंतकीयांचा सहभाग वाढत असल्‍याचे आढळून आले आहे. ड्रग्‍ज सहज उपलब्‍ध होत असल्‍याने युवावर्ग सहजतेने त्‍याकडे ओढला जात आहे.

राज्‍यात ड्रग्‍ज डी ॲडिक्‍शन सेंटर्सची गरज आहे. ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशन मॉडेलिंग सर्वत्र उपलब्ध होत आहे, ही मात्र एक सकारात्मक बाब आहे.

- डॉ. प्रियांना सहस्रभोजनी, मनोविकार तज्‍ज्ञ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT