

कोलंबो: टी-२० विश्वचषक २०२६ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, २८ फेब्रुवारीच्या सायंकाळी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना होणार आहे. 'ग्रीन आर्मी'साठी हा सामना म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकण्यासाठी पाकिस्तानला केवळ विजयच नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वीच पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याच्यावर निवृत्तीचे सावट पसरले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने बाबरला टी-२० क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा धक्कादायक सल्ला दिला आहे.
मायकल वॉन यांनी 'क्रिकबझ'शी बोलताना बाबरचे कौतुक केले, परंतु सध्याच्या आक्रमक क्रिकेटमध्ये तो मागे पडत असल्याचे स्पष्ट केले. वॉन यांच्या मते, टी-२० क्रिकेट आता ताकदीचा खेळ झाला असून तो एखाद्या 'बेसबॉल'सारखा वाटू लागला आहे.
फिन ॲलनसारखे शारीरिकदृष्ट्या बलवान खेळाडू मैदानात धुमाकूळ घालत असताना, बाबरची संथ फलंदाजी पाकिस्तानसाठी कमकुवत दुवा ठरत आहे. जर बाबरला त्याचे कसोटी आणि एकदिवसीय करिअर वाचवायचे असेल, तर त्याने टी-२० फॉरमॅटला कायमचा रामराम ठोकणेच हिताचे ठरेल, असे वॉन यांनी म्हटले आहे.
बाबर आझमच्या बॅटमधून या विश्वचषकात धावांचा दुष्काळ पाहायला मिळत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठ्या अपेक्षेने त्याचा संघात समावेश केला होता, मात्र त्याने ६ सामन्यात केवळ २२.७५ च्या सरासरीने अवघ्या ९१ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट (११२.३४) हा टी-२० च्या मानकांनुसार अत्यंत खराब मानला जात आहे. या कामगिरीमुळे केवळ माजी क्रिकेटपटूच नव्हे, तर पीसीबीदेखील भविष्यात बाबरच्या निवडीबाबत कठोर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कर्णधार सलमान अली आगाच्या टीमसाठी आजचा सामना 'करा किंवा मरा' असा आहे. यजमान श्रीलंकेला त्यांच्याच घरात नमवणे सोपे नाही. एका बाजूला संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे, तर दुसरीकडे अनुभवी खेळाडू बाबर आझमच्या फॉर्मवरून वाद सुरू आहेत. अशा दबावाच्या परिस्थितीत बाबर टीकाकारांना आपल्या बॅटने उत्तर देणार की वॉन यांचा सल्ला खरा ठरणार, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.