Special Olympics World Games Berlin 2023 : धावपटू गीतांजली नागवेकर हिच्या 400 मीटर लेव्हल सी शर्यतीतील रौप्यपदकाने स्पेशल ऑलिंपिक्स भारत-गोवा संघाच्या यावेळच्या स्पेशल ऑलिंपिक्स जागतिक उन्हाळी स्पर्धेतील सफल मोहिमेचा रविवारी जर्मनीतील बर्लिन येथे समारोप झाला.
या स्पर्धेत गोमंतकीय क्रीडापटूंनी नऊ सुवर्ण, पाच रौप्य व पाच ब्राँझ अशी एकूण १९ पदके जिंकून सुवर्णपदकांत दोन दशकांतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली.
स्पेशल ऑलिंपिक्समध्ये भारतीय संघाचे पदकांचे खाते गीतांजली हिने मागील सोमवारी ८०० मीटर शर्यतीतील सुवर्णपदकाने केली होती. रविवारी तिने ४०० मीटरमध्ये रौप्यपदकाची कमाई केली.
बर्लिनमधील ॲथलेटिक ट्रॅकवर तिघा धावपटूंत सुवर्णपदकासाठी चढाओढ होती. भारताची रवीमती अरुमूगम आणि इस्टोनियाची ट्रिन ट्रेयर यांनी समान १ः२९.८० मिनिट वेळ नोंदविल्यामुळे त्यांना संयुक्त सुवर्णपदक देण्यात आले, तर गीतांजली १ः३०.११ मिनिट वेळेसह रौप्यपदकाची मानकरी ठरली.
सुवर्णपदक हुकल्याची रुखरुख
स्पर्धेत सलग दुसरे सुवर्णपदक हुकल्याची खंत गीतांजली हिने शर्यतीनंतर व्यक्त केली. १९ वर्षीय गीतांजली पर्वरी येथील संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन केंद्राची विद्यार्थिनी आहे.
‘‘पदक जिंकण्याचा आत्मविश्वास होता आणि ते माझ्यासाठी आणि देशासाठी दुसरे सुवर्णपदक असावे ही अपेक्षा होती. अर्थातच मी रौप्यपदक स्वीकारत आहे. मात्र सुवर्णपदक मिळाले असते तर खूप चांगले झाले असते. शर्यतीत मी आवश्यक वेग घेतला नाही. तरीही ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदक ही कामगिरी निश्चितच खराब नाही,’’ असे गीतांजलीने सांगितले.
१३ गोमंतकीयांची सर्वोत्तम कामगिरी
बर्लिनमधील स्पर्धेत भारतीय संघात १३ गोमंतकीयांचा समावेश होता. त्यांची ही स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी असल्याची माहिती स्पेशल ऑलिंपिक्स भारतचे राष्ट्रीय क्रीडा संचालक व्हिक्टर वाझ यांनी दिली.
भारतीयांनी या स्पर्धेत पन्नास पदकांचा टप्पा ओलांडला. ‘‘स्पर्धेच्या आठ दिवसांत आमच्या क्रीडापटूंनी समर्पित वृत्ती प्रदर्शित केली. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आम्ही याहून मोठी अपेक्षा बाळगू शकत नाही,’’ असे वाझ खेळाडूंचे कौतुक करताना म्हणाले.
गोमंतकीय क्रीडापटूंच्या या मोहिमेत सहभागी असलेल्या प्रत्येकाप्रती आम्ही कृतज्ञ आहोत. प्रशिक्षक, अधिकारी आणि विशेष करून डॉन बॉस्को ओरेटरी व लुईस फर्नांडिस यांचे आम्ही आभारी आहोत. डॉन बॉस्को ओरेटरीने आम्हाला सरावासाठी सुविधा पुरविल्या, असे वाझ यांनी नमूद केले.
पदकविजेते गोमंतकीय
सुवर्णपदके (९) ः गीतांजली नागवेकर (८०० मीटर), सिया सरोदे (पॉवरलिफ्टिंगमध्ये २), मॅन्फिल फेर्राव (बास्केटबॉल), वीणा नाईक (व्हॉलिबॉल), व्हेन्सन पेस, अमन नदाफ, फ्रान्सिस पारिसापोगू व ज्योएल रॉड्रिग्ज (सर्व फुटबॉल).
रौप्यपदके (५) ः गीतांजली नागवेकर (४०० मीटर), सिया सरोदे (पॉवरलिफ्टिंग), आयुष गडेकर (व्हॉलिबॉल), तानिया उसगावकर (रोलर स्केटिंग), अस्लम गंजानावार (ज्युदो).
ब्राँझपदके (५) ः सिया सरोदे (पॉवरलिफ्टिंग), गेबान मुल्ला (भालाफेक), तानिया उसगावकर (रोलर स्केटिंग), गायत्री फातर्पेकर व काजल जाधव (दोघी महिला फुटबॉल).
गोव्याची दोन दशकांतील वाटचाल
वर्ष स्थळ सुवर्ण रौप्य ब्राँझ एकूण
२००३ डब्लिन ६ २ ३ ११
२००७ शांघाय ७ २ ३ १२
२०११ अथेन्स ६ ४ ६ १६
२०१५ लॉस एंजलिस ६ ३ १० १९
२०१९ अबुधाबी ५ ८ १० २३
२०२३ बर्लिन ९ ५ ५ १९
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.