goa election 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Election: ‘या’ मतदारसंघांत काय होणार?

भाकिते सुरूच: 10 मार्च ठरणार राजकारणातील टर्निंग पॉईंट

दैनिक गोमन्तक

फोंडा: निवडणुकीच्या निकालाला आता चार दिवस राहिले असले तरी लोकांच्या उत्कंठतेचा अजूनही अंत झालेला नाही. यावेळी रिंगणात अनेक पक्ष व अपक्ष असल्यामुळे भविष्य वर्तविणे मतदारांच्या दृष्टीने बरेच कठीण होत आहे. असे असले तरी काही मतदारसंघांत लोकांनी ‘ठोकताळे’ बांधल्याचे दिसतात. नेहमीच्या मतांबरोबरच टपाली मतदानसुध्दा यावेळी सिंहाचा वाटा उचलणार आहे. हे सगळे पाहता 10 मार्च हा दिवस गोव्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ‘टर्निंग पॉईंट’ ठरणार हे निश्चित.

काही मतदारसंघ मात्र अजूनही खुले आहेत. मांद्रे, काणकोण, सांत आंद्रे, वेळ्ळी, सावर्डे, कुठ्ठाळी, फोंडा, प्रियोळ, नावेली यासारख्या काही मतदारसंघांत कोणाला विजय मिळणार हे सांगणे आकलनाच्या पलीकडे ठरत आहे. मांद्रे येथे भाजपच्या दयानंद सोपटेंचा विजय निश्चित वाटत असला तरी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर त्यांना धक्का देऊ शकतात, असे अनेकांना वाटते. काणकोणात तर रहस्य अधिकच गडद झाले आहे.

तेथे दोन अपक्ष माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस आणि माजी आमदार विजय पै खोत यांच्याबरोबर भाजपचे उमेदवार तथा माजी मंत्री रमेश तवडकर आणि कॉंग्रेसचे जनार्दन भंडारी रिंगणात आहेत. त्यामुळे विजयश्री नक्की कोणाच्या गळ्यात माळ घालणार, हे कळत नाही. तरीसुध्दा या बहुरंगी लढतीत इजिदोरचे पारडे जड वाटते.

सांत आंद्रेत माजी आमदार तथा भाजपचे उमेदवार फ्रान्सिस सिल्वेरा यांचा विजय मुश्कील वाटत असला तरी विजयी कोण होणार यावर तर्क-वितर्क व्यक्त होत आहेत. ‘आप’चे रामराव वाघ यांच्यासह कॉंग्रेसचे आंतोनिया फर्नांडिस यांच्यावर लोक फुल्या मारताना दिसत आहेत. त्यामुळे तिथेही धक्कादायक निकाल लागू शकतो.

वेळ्ळीत तर अनेक संभाव्य विजेते उमेदवार दिसत असून तिथेही विजय कोण होणार यावर संदिग्धता कायम आहे. राष्ट्रवादीतर्फे माजी मंत्री फिलिप नेरी, कॉंग्रेसतर्फे सावियो डिसिल्वा व तृणमूलतर्फे माजी आमदार बेंजामिन सिल्वा हे रिंगणात आहेत. तिघेही उमेदवार मातब्बर असल्यामुळे वेळ्ळीत ‘शॉर्ट लिस्ट’ करणे कठीण झाले आहे. तरीसुध्दा फिलीप नेरी यांचे पारडे जड असल्याचे संकेत मिळत आहेत.

सावर्डेमध्ये तर अटीतटीची लढत झाली असून तिथे धक्कादायक निकाल निघू शकतो. अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले माजी मंत्री दीपक पाऊसकर यांचे पारडे जड वाटत असले तरी त्यांच्यात व भाजपचे उमेदवार माजी आमदार गणेश गावकर तसेच अपक्ष म्हणून उतरलेले भाजपचेच निष्ठावंत कार्यकर्ते कुळेचे सरपंच मनीष लांबोर यांच्या लढतीत मगोपचे बालाजी गावस हे विजयी होऊ शकतात. त्यामुळे सध्या जरी लोक पाऊसकरांना हिरवा कंदील दाखवत असले तरी धक्कादायकरित्या मगोप विजयी होऊ शकतो, असे दिसते. कुठ्ठाळीत तर नक्की कोण विजयी होणार हे सांगणे जड जात आहे.

तिथे ‘आप’तर्फे माजी आमदार एलिना साल्ढाणा रिंगणात असल्या तरी त्या विजयी होण्याची शक्यता कमी वाटते. त्यामुळे कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढविलेले ऑलेन्सियो सिमोईश व अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले आंतोनिओ वाझ यांच्यात अटीतटीची लढत झाल्याचे संकेत मिळत आहेत. येथे वाझ यांचे पारडे किचिंत जड असल्याचे दिसून येते.

प्रियोळात गावडे-ढवळीकरांत चुरस

प्रियोळात माजी मंत्री गोविंद गावडे व मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्यात चुरशीचा सामना झाल्याचे संकेत मिळाले असून थोड्या फरकानेच कोणीतरी जिंकेल, असे वाटते. त्याचबरोबर अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले उद्योजक संदीप निगळ्ये यांचे समर्थक निगळ्येच विजयी होणार असा दावा करताना दिसतात. तरीसुध्दा काटा ढवळीकर वा गावडे यांच्या बाजूने झुकणार असल्याचे प्राप्त झालेल्या माहितीवरून दिसत आहे.

नावेली, फोंडा येथे लक्ष्यवेधी लढती

नावेलीत अशीच परिस्थिती आहे. तिथे ‘आप’च्या प्रतिमा कुतिन्हो व तृणमूलच्या चर्चिल आलेमाव कन्या वालंका यांच्यामध्ये बाजी कोण मारणार, यावर तर्क-वितर्क सुरू आहेत. पण बारकाईने कानोसा घेतल्यास कुतिन्हो या थोड्या फरकाने का होईना जिंकण्याचे संकेत मिळत आहेत. फोंडा व प्रियोळ येथे सध्या लाखोंच्या पैजा लावल्या जात असून नक्की चित्र काय असणार याचा ठाव घेणे कठीण झाले आहे. फोंड्यात कॉंग्रेस व भाजप यांच्यात अटीतटीची लढत झाल्याची माहिती मिळाली असून भाजपतर्फे माजी मुख्यमंत्री रवी नाईक हे लढत असल्यामुळे या लढतीला वेगळीच धार प्राप्त झाली आहे.

फातोर्डात दामू नाईकांना लॉटरी

फातोर्डा मतदारसंघात गोवा फॉर्वडचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांची बाजू वरचढ वाटत असली तरी तृणमूल व ‘आप’ने त्यांच्या मतांचे विभाजन केल्यामुळे भाजपचे दामू नाईक धक्कादायक निकाल देऊ शकतात. कुंकळ्ळीतही युरी आलेमाव यांचा विजय निश्चित वाटत असला तरी या मतदारसंघात ‘आप’चे प्रशांत नाईक व तृणमूलचे डॉक्टर जॉर्सन फर्नांडिस यांना चांगली मते प्राप्त होण्याची शक्यता असल्यामुळे भाजपचे उमेदवार क्लाफासियो डायस हे ‘धक्‍का’ देऊ शकतात. रिव्होल्युशनरी गोवन्सचे उमेदवार जिंकण्याची शक्यता वाटत नसली तरी चांगली मते घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco ATM Scam: एटीएममध्ये पैसे भरणारेच निघाले चोर! खासगी कंपनीच्या 5 कर्मचाऱ्यांनी लंपास केले 14 लाख; वास्कोतील धक्कादायक प्रकाराने खळबळ

Goa Tiger Symbolism: वाघाच्या पुढच्या 2 पायांमध्ये रानडुक्कर, तर मध्ये छोटेखानी सिंह; वागऱ्यागाळ येथील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती

Vaibhav Suryavanshi Century: 15 षटकार 11 चौकार...! 32 चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास, कतारमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं वादळ VIDEO

Viral Video: भर रस्त्यात काकाची 'दारु पार्टी'! कुणाचीही हटवण्याची हिंमत नाही, व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, "काका ऑन रॉक"

VIDEO: बुमराहच्या तोंडून निघाली शिवी, बावुमाच्या उंचीवर केलेलं वक्तव्य व्हायरल; म्हणाला, 'बौना भी तो है यह...'

SCROLL FOR NEXT