Mhaje Ghar scheme launch: केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते सांताक्रूझ येथील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर 'म्हजे घर योजना' (Mhaje Ghar Yojana) चा भव्य शुभारंभ करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्याला गोमंतकीयांनी मोठी गर्दी केली असून यावेळी अमित शहा यांच्या हस्ते तब्बल २४११ कोटी किमतीच्या १९ प्रकल्पांचे डिजिटल पद्धतीने लोकार्पण करण्यात आले, ज्यामुळे गोव्याच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी योजनेच्या अंमलबजावणीबद्दल विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, "म्हजे घर योजने अंतर्गत सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे आणि मला खात्री आहे की सहा महिन्यांच्या आत प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाच्या घराची नोंदणी त्यांच्या नावावर होईल." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पित झालेल्या प्रकल्पांमध्ये ४७२ कोटी किमतीचा युनिटी मॉल, १२६ कोटी किमतीचा टाऊन स्क्वेअर (पणजी), १२५ कोटी किमतीचे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम (फोंडा), १९.३३ कोटी किमतीचे हरवळे धबधबा सुशोभीकरण आणि ५०२ कोटी किमतीच्या जीएमसी इमारत यासह अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे.
'म्हाजे घर योजने'च्या अंमलबजावणीबद्दल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे अभिनंदन केले. राणे म्हणाले, "या योजनेमुळे सत्तरीतील 'अल्वार' आणि 'कुमरी' जमिनींवर तसेच सरकारी जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांना आता त्यांच्या घराचे मालकी हक्क मिळणार आहेत." केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी या योजनेला गोव्याच्या जनतेसाठी 'एक मोठी भेट' असल्याचे म्हटले. तर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ही योजना 'गोमंतकीयांसाठी सुवर्ण क्षण' आणि युती सरकारने दिलेली 'ऐतिहासिक दसरा भेट' असल्याचे नमूद केले.
राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनी 'म्हजे घर योजने'ची तुलना काँग्रेसच्या जुन्या 'मतपेटी'च्या राजकारणाशी केली. ते म्हणाले, "मागील सरकारे निवडणुकीसाठी लोकांना घरांवरून धमकावत असत, पण भाजप मतपेटीचे राजकारण करत नाही. आम्ही जनतेच्या चांगल्या भविष्यासाठी आणि त्यांना खरा फायदा कसा होईल, यासाठी राजकारण करतो."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.