फोंडा: अंत्रुज महालात आज (शुक्रवारी) होळी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. होळी उत्सवाने फोंडा तालुक्यातील बहुतांश गावातील शिगमोत्सवाला प्रारंभ होतो. हा शिगमोत्सव गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी समाप्त होतो. होळी उत्सवात फोंडा तालुक्यातील बहुतांश गावातील घराघरांसमोरील तुळशी वृंदावनासमोर नमन घालण्यात आले. आबालवृद्धांसह युवकांनी या नमन कार्यक्रमात भाग घेतला. विशेष म्हणजे फोंडा शहर परिसरात बिगर गोमंतकीयांनी होळी उत्सव रंगांची उधळून साजरा केला.
होळी उत्सवानिमित्त फोंडा शहर परिसराबरोबरच लगतच्या कुर्टी भागातही रंग उधळताना लोक दिसले. गावागावात पारंपरिक शिगमोत्सवाला सुरवात झाली असून ढोलताशांसह रोमट गावातील घराघरात फिरून खेळण्यास प्रारंभ झाला आहे. परंपरेप्रमाणे काही ठिकाणी अगोदर तर काही ठिकाणी होळीच्या पाचव्या दिवसापासून शिगमोत्सवाला प्रारंभ होत आहे.
रोमटामेळमध्ये युवावर्गाने भाग घेतला. ढोलताशांच्या गजरात यंदाचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. गेल्या वर्षी कोविड महामारीमुळे शिमगोत्सवावर विरजण पडले होते. पण यंदा कोविड महामारी आटोक्यात आल्याने शिगमोत्सवात मोठ्या उत्साहात युवायुवती व आबालवृद्ध भाग घेताना दिसले.
नेत्यांकडून शुभेच्छा
राजकीय नेत्यांची होळी उत्साहात साजरी झाली. फोंडा तालुक्यातील विजयी झालेल्या व पराभूत झालेल्या उमेदवारांनीही होळीत भाग घेतला. फोंड्याचे आमदार रवी नाईक, मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे व शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी होळी व शिगमोत्सवानिमित्त गोमंतकीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘तावेर्न'' झाले फूल्ल....
गेल्या वर्षी होळी सणाला कोविडचे गालबोट लागल्याने हा उत्सव मर्यादित स्वरुपात साजरा केला होता. पण यंदा कोविड महामारी आटोक्यात आल्याने गोमंतकीयांबरोबरच बिगर गोमंतकीय लोकही एकमेकांना रंग फासताना दिसले. फोंडा शहरात रंगांची उधळण मोठ्या प्रमाणात झाली. विशेष म्हणजे रंगांची पाकिटेही मोठ्या प्रमाणात विकली गेली तर दिवसभर आणि संध्याकाळी उशिरापर्यंत शहर व परिसरातील ‘तावेर्न'' अर्थातच बार ग्राहकांनी भरून वाहताना दिसले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.