पणजी : इंधन दरवाढीसोबतच महागाईची झळ आता गोमंतकीय नागरिकांना बसू लागली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर दरदिवशी वाढत असतानात भाज्या आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे दुधाचे दरही वाढल्याने गोमंतकीय नागरिक त्रस्त झाले आहेत.
गोव्यात सध्या पेट्रोलचे दर 104 रुपये प्रतीलिटर वर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर 95 रुपयांवर पोहोचले आहेत. यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. पणजीच्या मार्केटमध्येही याचा परिणाम दिसू लागला आहे. अन्नधान्यांच्या दरासोबतच तेल आणि फळभाज्यांचे दरही गगनाला भिडू लागले आहेत.
खाद्यतेलांचे घाऊक बाजारातील दर गेल्या काही दिवसांमध्ये 195 रुपयांवरुन 220 रुपयांवर पोचले आहेत. तर भाज्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचे दर तुलनेने स्थिर असले तरीही शिमला मिरचीच्या दरात वाढ होत दर 60 रुपयांच्या पार गेले आहेत. लिंबांचे दर 10 रुपयांच्याही पुढे गेल्याने ऐन उन्हाळ्यात गोवेकर त्रस्त झाले आहेत. पणजीच्या बाजारात काही ठिकाणी 50 रुपयांना 6 लिंबू (Lemon) विकले जात असून त्यांचा आकारही लहान असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. मिरचीचे दरही 80 रुपयांवरुन 160 रुपयांवर गेल्याचं चित्र आहे.
दुसरीकडे मांसाहारी लोकांचं बजेटही कोलमडण्याची शक्यता आहे. चिकनमध्ये 10 रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे मागच्या आठवड्यात 170 रुपयांना मिळणारं चिकन (Chicken) आता 180 रुपयांना मिळत आहे. बॉयलर चिकनचा दर 240 वर पोहोचला असून मटण 850 रुपये किलो दराने विकलं जात आहे. अंड्यांच्या दरामध्येही थोडी वाढ झाल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसात गोवेकरांनी महागाई वाढल्याने भाजी खरेदीकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. कडक उन्हामुळे लोक कामाशिवाय घराबाहेर पडत नसल्याने काही भाज्यांचे दरही स्थिर आहेत.
मडगावात (madgaon) खाद्यतेलाचे दर सुमारे 20 रुपयांनी वाढले असून पामतेल 170 रुपयांना विकलं जात आहे. पामतेलाचा 15 लीटरचा डबा 2300 रुपयांना तर सूर्यफुल तेलाचा (Oil) 1 लीटरच्या 10 पिशव्यांचा बॉक्स 2500 रुपयांना विकला जात आहे. फोंड्यातही भाजीपाल्याचे दर वाढले असल्याचं चित्र आहे. हिरवी मिरची 120 ते 150 रुपये किलोने विकली जात आहे. तर सुकी मिरची 400-600 रुपयांना दिली जात आहे. मशरुमही महागले असून त्यांची विक्री 50-60 रुपये दराने होत आहे. तेलाचे दरही वाढले असून विविध तेलांची विक्री 180-200 रुपयांच्या दरम्यान केली जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.