म्हापसा: संततधार पावसामुळे तालुक्यातील विविध भागांत भातशेती पाण्याखाली आल्याने बार्देश येथील भातशेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, आतापर्यंत नुकसानीचे दावे करणारे ३०० अर्ज बाधित शेतकऱ्यांनी सादर केलेत. बार्देशात आजपर्यंत सुमारे ८०हेक्टर भात पिकाचे नुकसान झाले असून त्यामुळे ३०लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून या आकड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
जुलै महिन्यात प्रचंड पाऊस पडल्याने बार्देशमध्ये भात शेतीवर परिणाम झाला. बार्देश विभागीयकृषी कार्यालयाने आजपर्यंत केलेल्या पाहणीनुसार सुमारे ८० हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले असून ३०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तपासणी कृषी अधिकारी अजूनही प्रभावित भातशेतीची पाहणी करत असल्याने आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीचा परिणाम तालुक्याच्या विविध भागांत दिसून आला, परंतु सर्वाधिक प्रभावित भागांत सुकूर, हळदोणा, मयडे, सांगोल्डा, साल्वादोर दी मुंद यांचा समावेश आहे. इतर प्रभावित भागांत थिवी, शिवोली, आसगाव, नेरुळ, कळंगुट, कांदोळी यांचा समावेश आहे.
आम्ही जुलैच्या मध्यात भातशेतीचे प्राथमिक सर्वेक्षण सुरु केले होते व बाधित शेतकऱ्यांना अर्ज वाटपही केले होते. सध्या बाधित शेतांची अंतिम तपासणी सुरू आहे. आत्तापर्यंत आम्हाला नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांकडून सुमारे ३०० अर्ज प्राप्त झालेत. आणि आणखी अर्ज अपेक्षित आहेत, अशी माहिती बार्देश विभागीय कृषी अधिकारी संपत्ती धारगळकर यांनी दिली. त्यांनी पुढे माहिती दिली की, आमच्या निरीक्षणानुसार सुमारे ८०हेक्टर भात पिकांचे नुकसान झाले आहे, जे अंदाजे ३० लाख रुपये असेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.