पणजी: सत्तरीसह डिचोली तालुक्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. खासकरून सत्तरी तालुक्याला मोठा फटका बसला. राज्यात २४ तासांत सरासरी ८९.५ मि.मी. (३.५२ इंच) पाऊस कोसळला. त्यामुळे ७० टक्क्यांपर्यंत असलेली पावसाची तूट ११.२ टक्के तूट भरून निघाली.
काणकोण तालुक्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक ७.५५ इंच पावसाची नोंद झाली. यंदाच्या मान्सून हंगामातील एका दिवसातील आत्तापर्यंतची ही सर्वाधिक नोंद ठरली आहे. दुसरीकडे गोवा वेधशाळेने उद्या बुधवारी राज्यातील काही भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. गुरुवारी पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.
सत्तरी तालुक्यात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळी वाऱ्याने अक्षरशः थैमान घातले. सुमारे अर्धा तास कोसळलेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील विविध भागांत २० हून अधिक ठिकाणी झाडांची पडझड झाली. अनेक घरांवर, दुकानांवर आणि रस्त्यांवर झाडे कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या वादळामुळे अनेक ठिकाणी वीज खांब उन्मळून पडले, तर काही काळ वीजपुरवठाही खंडित झाला. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतली. वाळपई येथील सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीजवळ प्रदीप गावंडळकर यांच्या टेलरिंग दुकानावर भलेमोठे गुलमोहराचे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. धामशे-सत्तरी येथे शांतावती शांताराम मोर्लेकर यांच्या घरावर आंब्यासह अन्य झाडे कोसळून घराचे मोठे नुकसान झाले.
खडकी आणि नाणूस येथेही घरांवर झाडे पडल्याच्या घटना घडल्या. अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे नुकसान झाले. रेडीघाट-वाळपई मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ जंगली झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. केरी-अंजुणे धरण परिसरातही झाडे आणि वीज खांब रस्त्यावर कोसळल्याच्या घटना घडल्या. वाळपई अग्निशमन दल आणि ग्रामस्थांनी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत झाड हटविण्याचे काम केले.
बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलाचे जवान साईश सावंत आणि आणखी एक कर्मचारी जखमी झाले. साईश सावंत यांना वाळपई आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर गोमेको रुग्णालयात दाखल करण्यात आले. होंडा येथील गणपती मंदिराजवळ रस्त्यावर आणि अंशतः गॅरेजवर झाड कोसळल्याची घटना घडली.
सत्तरीत २० हून अधिक ठिकाणी झाडांची पडझड.
वास्को नजीकच्या परिसरात रात्रभर वीज पुरवठा खंडित.
डिचोलीत अनेक भागांत झाडे पडली, जेसीबी नाल्यात अडकलाताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे शक्य मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला
आल्तिनो-पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या ‘महालक्ष्मी’ या निवासस्थानाजवळ भलेमोठे झाड कोसळल्याने दोन मोटारगाड्यांचे नुकसान झाले. त्यात माजी मुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची एक गाडी होती. सुदैवानेच जीवितहानी टळली.
ब्रह्मा करमळी येथे नगरगाव ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुमित्रा यतींद्र नाडकर्णी यांच्या घरावर सुमारे ५०० वर्षे जुने पिंपळाचे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे चार लाख रुपयांची हानी झाली असून घरात पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचेही नुकसान झाले. झाड कोसळले त्यावेळी त्या घराबाहेरील पडवीत असल्याने मोठी दुर्घटना टळली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.