मोरजी: मोपा विमानतळ लिंक रस्त्यासंबंधी वारखंड पंचायतीने रस्ता बनवणाऱ्या कंपनीला बेकायदा काम त्वरित बंद करावे, असा आदेश देणारी नोटीस दिली होती, त्या विरोधात कंपनीने पंचायत संचालनालयाकडे याचिका दाखल करून स्थगिती मिळवली होती. त्या स्थगितीवर आज पंचायत संचानालयात सुनावणी झाली असता कंपनीच्या प्रतिनिधीने न्यायालयाने आम्हाला मुदत द्यावी आमची बाजू मांडण्यासाठी आम्हाला वकिलाची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार आता ही सुनावणी 22 रोजी ठेवण्यात आली आहे.
तत्पूर्वी वारखंड ग्रामपंचायतीने आपला युक्तिवाद मांडत कंपनीने लिंक रस्त्याचे काम बेकायदा हाती घेतलेले आहे. ते त्वरित थांबवणे गरजेचे होते. मोपा विमानतळासाठी 2015 साली पर्यावरण दाखला मिळाला होता, परंतु रस्त्याला नाही अशी बाजू मांडली.
मोपा विमानतळ आणि लिंक रस्ता हे दोन वेगवेगळे प्रकल्प आहेत. मोपा लिंक रस्त्यासाठी गेल्या वर्षी सरकारने अधिसूचना जाहीर केली आणि त्या रस्त्यासाठी आजपर्यंत पर्यावरण दाखला घेतलेला नाही. त्यामुळे कंपनीने हे बेकायदा बांधकाम सुरू केले आहे आणि बेकायदा जमिनीत अतिक्रमण करून झाडे कापल्याचा युक्तिवाद पंचायतीच्या वकिलांनी यावेळी केला.
पंचायतीला आपल्या क्षेत्रात कोणतेही प्रकल्प किंवा काम करत असताना जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर करण्याचा अधिकार आहे. पंचायतीला विश्वासात न घेता कंपनीने बेकायदा पंचायत क्षेत्रातील जमिनीत अतिक्रमण करून मोठमोठी झाडे बुलडोझरच्या साहाय्याने कापून टाकलेली आहेत. त्यामुळे या कंपनीवर त्वरित कारवाई करावी आणि हे काम थांबवावे यासाठी पीडित शेतकऱ्यांनी पंचायतीकडे धाव घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा यासाठी लेखी निवेदन सादर केले होते.
त्यानुसार वारखंड पंचायतीने त्वरित कंपनीला नोटीस पाठवून काम बंद करण्याचा आदेश दिला होता. परंतु कंपनीने या आदेशाला कचऱ्याची टोपली दाखवून काम पोलिसांच्या उपस्थितीत युद्धपातळीवर सुरू करून मागच्या चार दिवसांपूर्वीच या रस्त्याच्या आड येणारी सर्व झाडे कापून टाकली आहेत.
मोपा लिंक रस्त्यासाठी झाडांची कत्तल करत असताना कंपनीने आणि सरकारने पर्यावरणाचा दाखला घेतला नसल्याची तक्रार मोपा पंचक्रोशी पीडित जन संघटनेने पर्यावरण खात्याकडे केली होती. त्यानुसार पर्यावरण खात्याने सार्वजनिक बांधकाम खात्याला विचारणा केली होती, की लिंक रस्त्यासाठी पर्यावरण दाखला घेतला आहे का आणि त्याचे उत्तर आठ दिवसाच्या आत द्यावे अशी मुदत दिली होती, परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याने आजपर्यंत कोणतेही उत्तर पर्यावरण खात्याला दिले नसल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे कार्यवाही करण्यासाठी पावले उचललेली आहेत.
झाडे गाढण्याचा प्रयत्न
सुकेकुळण धारगळ ते मोपा विमानतळपर्यंतच्या साडेसहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या आड येणारी लाखो विविध प्रकारची झाडे कापताना पर्यावरण नियम धाब्यावर बसविण्यात आले. काही झाडांचे पुरावे नष्ट करण्यासाठी मोठ्या यंत्राद्वारे खड्डे खणून ती झाडे मुळासकट गाढण्याचाही प्रयत्न कंपनीने केलेला आहे. हा लिंक रस्ता वजा उड्डाणपूल रस्ता करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू झाले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.